Skip to main content
x

वाशीकर, शिवराम श्रीपाद

     शिवराम श्रीपाद वाशीकर यांचा जन्म कोल्हापुरात झाला. सुरुवातीच्या काळात वाशीकरांनी  ‘इंदुप्रकाश’, ‘विविधज्ञान  विस्तार’, ‘ज्ञानप्रकाश’ अशा अनेक वृत्तपत्रांत कामे केली. ते भारत सेवक समाजाच्या ‘ज्ञानप्रकाश’च्या संपादकीय विभागात काम करत असतानाच प्रभातसाठी लेखनही करत होते. प्रभातसाठी त्यांनी सर्वप्रथम ‘चंद्रसेना’ या बोलपटासाठी कथा व संवाद लिहिले. हा बोलपट ८ जून १९३५ रोजी मुंबईच्या कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला. चित्रपट चांगला चालला आणि वाशीकर प्रभातचे हुकमी लेखक बनले.

      १९३६ साली प्रभात फिल्म कंपनीने ‘तुकाराम’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाची पटकथा व संवाद वाशीकरांनी लिहिले. या चित्रपटाने इतिहास घडवला. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्या वर्षीच्या तीन उत्कृष्ट चित्रपटात ‘तुकाराम’ चित्रपटाची निवड झाली.

      शिवराम वाशीकर यांनी नंतर प्रभातसाठी ‘ज्ञानेश्वर’, ‘गोपाळकृष्ण’, ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ या चित्रपटांच्या पटकथा व संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेले बहुतेक चित्रपट धार्मिक आणि पौराणिक आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना वाशीकर यांचा अभ्यास सखोल आणि चौफेर होता. चित्रपटाच्या संपूर्ण विषयाचाच ते अभ्यास करीत. त्यांची भाषा साधी पण ठाशीव होती. त्यांच्या पटकथेत संयत विनोदाचाही शिडकावा असे.

     ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटाची पटकथा-संवाद शिवराम वाशीकरांनीच लिहिले होते. न्यूयॉर्कमधल्या कार्नोजी हॉलमधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्या वेळी फ्रँक काप्रासारख्या विश्‍वविख्यात दिग्दर्शकानेही या चित्रपटाची स्तुती केली होती. पुढे वाशीकर यांनी रणजीत फिल्म कंपनीसाठी ‘संत तुलसीदास’, मोहन पिक्चर्ससाठी ‘चोखामेळा’, देवकी बोस यांच्यासाठी ‘आपले घर’, बाबूराव पेंटरांसाठी ‘रुक्मिणी स्वयंवर’, अर्देशीर इराणींसाठी ‘मायामच्छींद्र’ असे चित्रपट लिहिले. वाशीकरांनी मुंबईत ‘राष्ट्रवैभव’ हा छापखाना आणि ‘इंदिरा प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था काढली. ‘भक्त प्रल्हाद’, ‘कच देवयानी’, ‘पंढरीचे वारकरी’, ‘संत जनाबाई’, ‘सावता माळी’ अशी पुस्तके प्रकाशित केली. आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्येही शिवराम वाशीकर यांनी लिहिली. ‘नाट्यलहरी’ या त्यांच्या पुस्तकातही या नभोनाट्यांचा समावेश केला आहे.

     - द.भा. सामंत

वाशीकर, शिवराम श्रीपाद