Skip to main content
x

वेंकटवर्धन, व्ही.एस.

       गोलभौतिकी विषयातील संशोधक असलेले डॉ.व्ही.एस. वेंकटवर्धन यांचा जन्म तामीळनाडूच्या सालेम गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर मद्रास (आता चेन्नई) विद्यापीठातून भौतिकी विषयात एम.एस्सी. केल्यावर ते मुंबईत त्यांची अनुशक्ती मंडळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. १९६१ सालच्या या केंद्राच्या पाचव्या तुकडीतील विद्यार्थी असलेल्या वेंकटवर्धन यांचे एक वर्षाचे प्रशिक्षण संपल्यानंतर १९६२ साली ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टी.आय.एफ.आर.) संशोधक म्हण्ाून कामाला लागले. त्यांनी १९७० साली प्रा. देवेंद्र लाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. केली. पीएच.डी.च्या त्यांच्या संशोधनाचा विषय ‘आयसोटोपिक चेंजेस इन्ड्यूस्ड बाय कॉस्मिक रेज इन इंटरप्लॅनेटरी मॅटर’ असा होता. दोन ग्रहांमधील अवकाशात निव्वळ पोकळी नसून तेथेही अनेक प्रक्रिया सतत होत असतात या त्यांच्या निरीक्षणामुळे खगोलशास्त्रातील त्यांची आवड वाढीसच लागली. १९६२ ते १९७९ या सतरा वर्षांच्या काळात त्यांनी टी.आय.एफ.आर.मध्ये भूभौतिकी, वैश्विक किरण (कॉस्मिक रेज), अशनी, चंद्र आणि वेगवेगळ्या ग्रहांचे भौतिकशास्त्र यांवर संशोधन केले. अपोलो मोहिमेने चंद्रावरून आणलेल्या खडकांवर अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये जे संशोधन चालू होते, त्यावर टी.आय.एफ.आर.तर्फे ते समन्वयक म्हणून काम करीत होते. ‘नासा’च्या ‘स्कायलॅब’ अंतराळ प्रकल्पात त्यांनी सौर आणि दीर्घकीय वैश्विक किरणांवर संशोधन केले.

     ग्रहांचे भौतिकशास्त्र, वैश्विक किरण, क्चार्क, बोसॉन आणि पदार्थ हे भौतिकीतील गहन विषय वेंकटवर्धन यांच्याकडून ऐकताना खूप सोपे वाटतात. त्याचे कारण, त्यांचा त्या विषयाचा व्यासंग खूप मोठा आहे. वेंकटवर्धन हे उत्तम विज्ञान प्रसारक आहेत.

     १९७९ ते १९९७ अशी १८ वर्षे मुंबईच्या नेहरू तारांगणाचे ते संचालक होते. नेहरू केंद्राच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’चेही ते एप्रिल १९८३ ते नोव्हेंबर १९८४, अशी अडीच वर्षे प्रभारी संचालक होते. नेहरू तारांगणाच्या त्यांच्या अठरा वर्षांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत (१९७९-१९९७) त्यांनी तारांगणाचे एकोणीस कार्यक्रम तयार केले. त्या सर्व कार्यक्रमांची संहिता त्यांनी स्वत: तर लिहिलीच, पण त्याचे दिग्दर्शनही त्यांनी स्वत: केले. त्यात गॅलिलिओपासून गॅलिलिओ, नियतीशी भेट (ट्रिस्ट विथ डेस्टिनी), विश्वातील जीवन (कॉस्मिक लाइफ), विध्वंसक ब्रह्माण्ड (धिस व्हायोलंट युनिव्हर्स), खगोलशास्त्राची उत्क्रांती (इव्हॉल्यूशन ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी), सात पावलांत ब्रह्माण्ड (युनिव्हर्स इन सेव्हन स्टेप्स), धूमकेतूपासून तार्‍यापर्यंत (कॉमेट्स टू स्टार्स),  ए स्टार दॅट विल शाइन फॉर एव्हर, २५० वर्षांचे आकाश (स्काइज ऑफ २५० इयर्स), आकाशातील आतषबाजी (फायरवकर्स इन स्पेस), जेव्हा दीर्घिकांची टक्कर होते (व्हेन गॅलॅक्सिज कोलाइड), विश्वाचे आत्मचरित्र (ऑटोबायॉग्रफी ऑफ द युनिव्हर्स),  स्काय ऑफ २००० एडी, अर्थ इन द युनिव्हर्स, २० तेजस्वी तारे (ट्वेन्टी ब्राइट स्टार्स),  स्टार्स इन द लाइम लाइट, अण्ाूपासून तार्‍यापर्यंत (अ‍ॅटम टू स्टार्स) इत्यादी कार्यक्रम आहेत. डॉ.वेंकटवर्धन खगोलशास्त्रावर सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत, अनेक ठिकाणी जाऊन व्याख्याने देत असत.

     तारांगणात आकाशदर्शनाच्या कार्यक्रमांशिवाय भौतिकीच्या विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रातील आवड वाढीला लावण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम सुरू करून दिले. त्यामुळे तरुण-तरुणींचा एक मोठा ओघ नेहरू तारांगणाकडे सुरू झाला. हा कार्यक्रम इतक्या मजबूत पायावर आधारलेला आहे, की वेंकटवर्धन तारांगणातून निवृत्त होऊन तेरा वर्षे होऊन गेली तरी तो अजून त्याच उत्साहात चालू आहे. एवढेच नव्हे, तर या कार्यक्रमाला येणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञानात आपली कारकीर्द यशस्वीपणे चालू केली आहे.

     १९९७ साली तारांगणातून निवृत्त झाल्यावर परत तामीळनाडूतील सालेम या आपल्या मूळ गावी जाऊन तेथील सोना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ते भौतिकी विषयाचे जे अध्यापन करू लागले.

     डॉ. वेंकटवर्धन यांनी ‘एक्स्प्लोरिंग युनिव्हर्स- द प्लॅनेटोरियम वे’ या नावाचा एक चित्रपट बनवला आहे. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनतर्फे त्यांनी विज्ञानविषयक अनेक फिल्म्स बनवल्या. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून त्यांनी सत्तरच्यावर भाषणे दिली, तर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर चाळीस कार्यक्रमांत भाग घेतला.

     जगातल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी भाग घेऊन आपले निबंध सादर केले आहेत. डॉ.वेंकटवर्धन हे १९८६ ते १९९० या काळात चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या मध्यवर्ती समितीवर सभासद होते. १९८७ ते १९९० या काळात ते राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या समितीवर होते. ‘विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल’ या नावाच्या विद्यापीठ अनुदान मंडळाच्या समितीचे ते सभासद होते. बंगळुरू, लखनौ, गोरखपूर इत्यादी ठिकाणच्या तारांगणाच्या समित्यांवर ते होते. १९८९ ते ९१ या काळात ‘बॉम्बे असोसिएशन फॉर सायन्स एज्युकेशन’ या संस्थेचे ते अध्यक्ष होते आणि त्याच काळात ते ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. असा त्यांचा सामाजिक कामाचा व्यापही दांडगा होता.

     ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’चा (इन्सा) विज्ञान प्रसारासाठी असलेला इंदिरा गांधी पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

     विज्ञान प्रसार आणि संशोधन, याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक ठळक बाजू म्हणजे त्यांचे कवितेचे अंग. ते एक उत्तम कवी आहेत आणि त्यांनी अनेक कविता केलेल्या आहेत.

सुहास नाईक-साटम

वेंकटवर्धन, व्ही.एस.