Skip to main content
x

व्हटकर, अशोक नामदेव

     अशोक व्हटकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे झाला. शालेय जीवनापासून त्यांना लेखनाची आवड होती. त्यांनी संस्कृत विषय घेऊन एम.ए. केले. संस्कृत साहित्यावर संशोधनपूर्ण लेखन करणार्‍या मोजक्या दलितवर्गीय व्यक्तींपैकी अशोक व्हटकर हे एक प्रमुख नाव आहे. ऋग्वेदाचा काळ ठरविण्यासाठी त्यांनी संशोधन केले. संस्कृत विषयात पीएच.डी. घेऊन त्यांनी राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे संस्कृत विभागप्रमुख म्हणून काम केले.

     रुद्रदेवतेच्या संशोधनासाठी हिमालय ओलांडून चिनी तिबेटमधील मानस सरोवर व कैलास पर्वतावर जाऊन संशोधन करणारा अलीकडच्या काळातील हा एकमेव भारतीय होय. त्या पार्श्वभूमीवर ‘कैलास-मानस’ (१९८८) हे त्यांचे अनुभव कथन करणारे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

     महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना गूढकथा, साहसकथा किंवा तत्सम कथा लिहिण्याची सवय होती. यांतील कथा वेळोवेळी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या. मात्र, पुढे व्हटकर यांनी प्रामुख्याने कादंबर्‍याच लिहिल्या. ‘अथर्वीय जग’ ही १९८० साली प्रसिद्ध झालेली त्यांची कादंबरी साहसकथेशी नाते सांगणारी आहे. त्यांच्या इतर कादंबर्‍या अशा, ‘फॉस्कर’ (१९८०), ‘क्रॅब’ (१९८३) ‘पब्लिक’ (राजकीय पार्श्वभूमी असलेली कादंबरी, १९८३) तसेच ‘गोरी बायको’ (१९८४) व ‘बगाड’ (१९८४). ‘मेलेले पाणी’ या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी लेखनाचा पुरस्कार (१९८४) मिळाला आहे. ‘सलामी’ (१९८८), ‘विलक्षण विद्यापती’ १९९० ह्या त्यांच्या इतर कादंबर्‍या होत. त्यांची अगदी पहिली कादंबरी, ‘मंगळावरचा प्रवास’ ही १९७४ साली प्रसिद्ध झाली, जिच्यात विज्ञान आणि गूढकथा यांचे मिश्रण आहे.

     ‘७२ मैल’ या १९८९मध्ये प्रसिद्ध झालेल्या आत्मकथनात्मक कादंबरीत त्यांच्या बालपणापर्यंतचा कालखंड चित्रित केला आहे. ‘मेलेले पाणी’ (१९८४) ही कादंबरीही आत्मकथनात्मक आहे.

     व्हटकर यांनी दलितांच्या आणि एकूणच शोषितांच्या व्यथावेदनांना शब्दरूप दिले आहे. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती, सहिष्णूता-असहिष्णुता इ.चे वेधक दर्शन त्यांच्या कादंबर्‍यांतून प्रभावीपणे चित्रित झाले आहे. लेखनगुण असूनही त्या मानाने दलित साहित्यिक म्हणून ते काहीसे दुर्लक्षित राहिले.महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत स्थायी समितीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले.

- मधू नेने

व्हटकर, अशोक नामदेव