Skip to main content
x

वंजारी, केशव बाळाभाऊ

         कडधान्याच्या सुधारित वाणांची निर्मिती करणाऱ्या कृषि-संशोधकांमधील महत्त्वाचे नाव म्हणजे केशव बाळाभाऊ वंजारी हे होय. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील आमनेर येथे झाला. त्यांनी १९६८मध्ये बी.एस्सी. (कृषी) ही पदवी संपादन केली व १९७०मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी वनस्पतिशास्त्र या विषयात मिळवली. त्यांनी १९८६मध्ये रोप-पैदास या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली.

         डॉ. वंजारी यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १९७१-९८ या काळात डॉ. पं.दे.कृ.वि. येथे साहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या पदांवर कार्य केले. पुढे त्यांनी १९९८ ते २००९ या काळात प्राध्यापक-वनस्पतिशास्त्र, विभागप्रमुख-वनस्पतिशास्त्र आणि सहयोगी अधिष्ठाता ही पदे भूषवली. त्यांनी तुरीच्या ३, संकरित तुरी २, मुगाचे ९, उडीद ४, देशी हरभऱ्याचे ४, काबुली हरभऱ्याचे २, गुलाबी हरभऱ्याचे - १, पोपटवालाच्या २ अशा नवीन जाती निर्माण केल्या. या वाणांच्या निर्मितीपैकी मुगाच्या टर्म-१ व टर्म-२ या वाणांच्या गुणवत्तेमुळे आणि उत्पादन क्षमतेमुळे त्यांचा विशेष नावलौकिक झाला. त्यांची एकूण ९ पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी ‘कडधान्याचे सुधारित लागवड तंत्र’ व ‘संकरित तूर बीजोत्पादन तंत्र’ ही दोन पुस्तके विशेष लोकप्रिय झाली. तसेच त्यांचे शेतकऱ्यांसाठी ९२ लेख, तांत्रिक शिक्षणासाठी ९ व परिषदांसाठीचे ३३ लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. वंजारी इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, महाराष्ट्र सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, इंडियन सोसायटी ऑफ पल्सेस रीसर्च अँड डेव्हलपमेंट-कानपूर, फोरम फॉर प्लँट फिजिओलॉजिस्ट, महाराष्ट्र अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस-पुणे या संस्थांवर सल्लागार सदस्य आहेत. त्यांनी एम.एस्सी.च्या १२ विद्यार्थ्यांना, तर पीएच.डी.च्या २ विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले आहे.

         केशव वंजारी यांना इंडियन सोसायटी ऑफ पल्सेस रीसर्च अँड डेव्हलपमेंटचा पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठापनचा उत्कृष्ट कृषिशास्त्रज्ञ पुरस्कार (१९९३), कानपूर येथून उत्कृष्ट कडधान्य संशोधक पुरस्कार (१९९८), बहुमोल संशोधक म्हणून के.गो. जोशी पुरस्कार (२०००-२००१), सर श्रीहरी किशनशास्त्री स्मृती उत्कृष्ट संशोधक पुरस्कार (२००२) आदी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

- मिलिंद कृष्णाजी देवल

वंजारी, केशव बाळाभाऊ