Skip to main content
x

वॉटल, चंदर मोहन

चंद्रमोहन

     चंदर मोहन वॉटल ऊर्फ चंद्रमोहन यांचा जन्म काश्मीरमधल्या नरसिंगपूर गावात झाला. त्यांनी दिल्ली इथे एका वितरणसंस्थेत नोकरी केली. त्या वितरणसंस्थेसाठी काम करत असताना त्यांनी दिल्ली, पंजाब, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत या प्रदेशांसाठी प्रभातच्या चित्रपटांच्या वितरणाचे हक्क मिळतात का? हे पाहण्यासाठी पुण्यात प्रभातला भेट दिली. शांतारामबापूंनी त्यांचा चेहरा, डोळे, बोलण्याची लकब, उलटे फिरवलेले काळेभोर केस पाहूनच त्यांना चित्रपटात काम करण्याची विचारणा केली आणि दरमहा साठ रुपये पगारावर प्रभातमध्ये त्यांची वर्णी लागली. ‘अमृतमंथन’ (१९३४) हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी सनातनी वृत्तीचा महंत रंगवला होता. ‘धर्मात्मा’मध्येही ते कर्मठ प्रवृत्तीचा महंत होते. ‘अमर ज्योती’त (१९३६) कुबड्या घेऊन वावरणारा ‘दुर्जय’ हा खलनायक त्यांनी रंगवला, तर ‘वहाँ’मध्ये (१९३७) आर्यांचा कोदंडधारी राजा झाले होते. त्यांचे सारे बोलपट हिंदी भाषेतील होते.

      बाबूराव पेंढारकर यांनी चंद्रमोहन यांना ‘ज्वाला’ (१९३८) बोलपटासाठी  कोल्हापूरला आणले. मराठी व हिंदी अशा दोन भाषेत ‘ज्वाला’ हा बोलपट निर्माण केला होता. चंद्रमोहन यांचा हा पहिला मराठी चित्रपट. त्यात त्यांनी ‘अंगार’ ही भूमिका साकारली होती.

       त्यानंतर चंद्रमोहन यांनी मुंबईच्या सिर्को चित्रसंस्थेसाठी ‘गीता’ (१९४०) आणि ‘आपुले घर’ (१९४२) हे दोन मराठी चित्रपट केले. ‘गीता’त त्यांची दुहेरी भूमिका होती आणि नायिका होत्या दुर्गा खोटे. त्यांचा पुढला चित्रपट होता ‘आपुले घर’, त्यात नायिका होत्या शांता आपटे.

     चंद्रमोहन यांचे हे तिन्ही बोलपट बहुचर्चित ठरले. त्यानंतर त्यांनी ‘पुकार’ (१९३९), ‘भरोसा’ (१९४०), ‘रोटी’, ‘हुमायून’ (१९४५), ‘शहीद’ (१९४८), ‘रामवाड’, ‘बडे नवाब साहेब’ यासारखे हिंदी चित्रपट केले आणि गाजवले. ‘रोटी’मधली शेठ धरमदास ही त्यांची भूमिका अजरामर ठरली.

      शांतारामबापूंचा ‘शकुंतला’ हा मुंबईतला पहिला चित्रपट. त्यात चंद्रमोहन यांनी राजा दुष्यंतची भूमिका केली होती. बाहेरच्या चित्रपटात काम करण्यासाठी लाखो रुपये बिदागी घेणाऱ्या चंद्रमोहन यांनी आपल्या गुरूंकडून म्हणजे शांतारामबापूंकडून अवघे तीन हजार रुपये मानधन घेतले. मद्यपानाच्या अतिरेकामुळे तरुण वयातच चंद्रमोहन यांचा मृत्यू झाला.

- संपादित

वॉटल, चंदर मोहन