Skip to main content
x

वरपुडकर, अंबादास गणेश

            अंबादास गणेश वरपुडकर यांचा जन्म वरपुड (परभणी) येथे झाला. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण परभणी येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथे सरकारी माध्यमिक शाळेत पूर्ण केले. उस्मानिया विद्यापीठात त्यांनी महाविद्यालयीन एक वर्ष पूर्ण केले, परंतु वडिलांचा शेतीचा व्याप मोठा असल्याने (१६०० एकर जमीन व जवळजवळ १५० जनावरे) त्यांच्या मदतीसाठी त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांचे लहान बंधू बबनराव यांच्या मदतीने वरपूड, पेडगाव, परभणी, माखणी येथील शेती ते पाहू लागले. शेतीबरोबरच समाजकारण व राजकारणातही ते भाग घेऊ लागले. १९६१ साली काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष झाले व या पदावर १९६५पर्यंत कार्यरत होते. या काळात त्यांनी शेती खात्याच्या मदतीने शेती सुधारणेचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू केले, त्यात बागायती वाढवण्यासाठी विहिरी खोदल्या, विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत रासायनिक खतांचा, कीटक/रोगनाशकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केला. १९६५पर्यंत खरीप/रब्बी ज्वारी, तूर, मूग ही कडधान्ये व कापूस हीच पिके मुख्यत: मराठवाड्यात घेतली जात असत, मात्र रासायनिक खते व औषधांचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने उत्पादन कमी असावयाचे. मात्र वरील निविष्ठांच्या सोयीमुळे एकरी उत्पादकता व एकूण उत्पादन वाढण्यास मोठा हातभार लागला, त्याचप्रमाणे अ‍ॅस्पीचे पावर स्प्रेअर्सही मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना पुरवले गेले.

            महाराष्ट्रात १९६३-६४पासून संकरित ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या लागवडीस प्रारंभ झाला. त्या वेळी संकरित बीजोत्पादन कमी असल्यामुळे या पिकांचा प्रसार मर्यादित क्षेत्रावरच होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अन्नधान्यात स्वयंपूर्णता आणण्याची घोषणा केली व संकरित बीजोत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना दिली. परभणी हे वरील पिकांचे राज्यातील मुख्य संशोधन केंद्र असल्याने या केंद्रातील डॉ. द.र. बापट यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी व मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्रातही घेण्यात आला. अंबादास हे त्यात आघाडीवर होते, त्यांनी १९६५मधील उन्हाळी हंगामातही २०-२५ एकर क्षेत्रांवर ज्वारी बीजोत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून दाखवले. त्यामुळे सबंध जिल्ह्यात बीजोत्पादनाच्या कार्यक्रमास चालना मिळाली. पुढील काळात हजारो एकरावर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येऊन बीजनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. वरपुडकरांनी त्यांचे बंधू व डॉ. द.र. बापट यांच्या सहकार्याने १९६७ साली ७०० एकरांवर ज्वारीचे (सी.एस.एच. १) बीजोत्पादन घेऊन त्या वेळी ७.५ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर त्यांनी सी.एस.एच. ४ चे मादी वाणाचे  (१०३६ अ) पायाभूत पातळीवरचे बियाणेही मोठया प्रमाणावर  (योग्य आनुवंशिक शुद्धतेचे) वाढवण्यास मदत केली. बाजरीचे संकरित वाण १ व २ यांचाही प्रमाणित बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला.  १९७० साली कापसामध्ये एच ४ हा पहिला संकरित वाण निर्माण केला गेला. या संकरात मादी व नर वाणाचा संकर हाताने परागकण स्त्री केशरावर टाकून करावे लागते. हेही काम त्यांनी व इतर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यामुळे संकरित कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत केली.

            वरील पिकाबरोबरच त्यांनी १९६१ साली सुरू केलेले ज्यूटचे बीजोत्पादन आजही मोठ्या प्रमाणावर करत असून, त्याचे विपणन पश्‍चिम बंगालमध्ये करतात. अशा तर्‍हेने अंबादास यांनी आपल्या पुढील पिढ्यांसाठी शेती उद्योगाचा मोठा वारसा निर्माण केला.

- संपादित

वरपुडकर, अंबादास गणेश