Skip to main content
x

व्यास, शंकर गणेश

पं.विष्णू दिगंबर पलुसकरांच्या ज्येष्ठ शिष्यांपैकी एक असलेले शंकर गणेश व्यास यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील गणेशपंत हे कीर्तनकार पुराणिक होते व  संगीताचे प्रेमी होते आणि ते स्वतः सतार व हार्मोनिअम ही दोन वाद्ये वाजवत असत. त्यांचे हे वैशिष्ट्य शंकर व्यासांमध्ये वारसारूपाने आले.
व्यासांचे पितृछत्र त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षीच हरपले. पं. विष्णू दिगंबर कोल्हापूर येथे आले असताना त्यांचे लक्ष व्यासबंधूंकडे गेले. शंकर व त्यांचे धाकटे बंधू नारायण त्यांच्याकडे शिकण्यास गेले. शंकर व्यासांनी पलुसकरांच्या नियमानुसार नऊ वर्षे शिक्षण घेतले. त्या शिक्षणात गायनाबरोबर वाद्यवादनाचाही अंतर्भाव होता. त्यांच्या शिक्षण काळात त्यांनी ‘सतार लहरी’ नावाचे पुस्तक लिहिले आणि गुरू पं.विष्णूबुवांनी ते छापून प्रकाशितही केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर शंकर व्यास गुजरातेत अहमदाबादला पं. ना.मो. खरे यांच्याबरोबर गांधी आश्रमात कार्य करू लागले. पुढे त्यांनी गुजरात विद्यापीठात शिकवले. गुजरात प्रांतात संगीत प्रचारार्थ गांधर्व महाविद्यालयाची १९३१ साली स्थापना करताना त्यांनी गुरुबंधू ना.मो. खरे व गोपाळराव जोशी यांचे सहकार्य घेतले. त्यांनी १९३७ साली बंधू नारायण व्यास व डॉ. वसंतराव राजोपाध्ये यांच्या मदतीने मुंबईत व्यास संगीत विद्यालयाची स्थापना दादर येथे केली.
शंकर व्यासांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ते ग्वाल्हेर घराण्याचे घरंदाज गायक होते. नारायण व्यासांच्या सोबतीने शंकर व्यासांनी एच.एम.व्ही.साठी जलतरंग व मॅण्डोलिन अशी वाद्यांच्या जुगलबंदीची ध्वनिमुद्रिका केली. शंकर व्यास मॅण्डोलिन फार सुरेख वाजवत असत. रसदीप, भवानी, भवानी केदार हे राग त्यांचीच निर्मिती होय. गुंजीकानडा, मालगुंजी अशा अवघड रागांत त्यांनी प्रासादिक रचना केल्या. ‘प्राथमिक’ व ‘माध्यमिक संगीत’ ही पुस्तके लिहून त्यांनी विद्यार्थ्यांची सोय केली. 
त्यांनी १९३७ ते १९५५ या कालखंडात चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणूनही कारकीर्द गाजवली. त्यांनी ३५ हिंदी, ५ मराठी व ३ गुजराती बोलपटांचे संगीत, तसेच १५ चित्रपटांचे पार्श्वसंगीत दिग्दर्शनही केले. ‘नरसी भगत’ (१९४०), ‘भरत भेट’ (१९४१), ‘रामराज्य’ (१९४३) हे चित्रपट त्यांच्या संगीतामुळेही खूप गाजले. ‘रामराज्य’ सिनेमातील ‘वीणा मधुर मधुर कछु बोल’ हे सरस्वती राणे यांनी गायलेले पद त्या काळी  अत्यंत लोकप्रिय झाले. ‘नरसी मेहता’ या सिनेमातले ‘झुलना झुलावे नंदलाल’ हे असेच गाजलेले सिनेगीत होय. चित्रपटातील वाद्यवृंदासाठी त्यांनी भारतीय वाद्ये वापरली आणि आपल्या भारतीय, महाराष्ट्रीय कलाकारांना त्या वाद्यवृंदात स्थान दिले.  शंकर व्यास हे हसतमुख, मनमिळाऊ व संघटक वृत्ती असलेले व्यक्तिमत्त्व होते. पं. विष्णू दिगंबर  पलुसकरांच्या निधनानंतर सर्व भारतभर विखुरलेल्या आपल्या गुरुबंधूंना एकत्र आणणे व गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना करणे यांत त्यांचा सिंहाचा वाटा होता. नंतर ते या मंडळाचे अध्यक्षही झाले. त्याचप्रमाणे मंडळाचे मुखपत्र असलेले ‘संगीत कला विहार’ हे मासिक काढण्यातही त्यांनी पुढाकार  घेतला, तसेच या मासिकाचे ते आद्य संपादक झाले. पं. शंकर व्यासांचे चिरंजीव रत्नाकर व्यास हे उत्तम सरोदवादक झाले. कन्या रोहिणी चांदेकर गायिका होत्या. शंकर अभ्यंकर हे प्रसिद्ध सतारिये त्यांचेच शिष्य होत. अहमदाबाद येथे साठ वर्षे पूर्ण होण्याआधीच शंकर व्यास यांचे निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

व्यास, शंकर गणेश