Skip to main content
x

यरगट्टीकर, रामभाऊ अंताजी

चिमड महाराज

      चिमड महाराज म्हणून ओळखले जाणारे साक्षात्कारी सत्पुरुष रामभाऊ अंताजी यरगट्टीकर यांचा जन्म ‘यरगट्टी’ गावी ज्येष्ठ शुद्ध दशमी, शके १७७५ मध्ये झाला. त्यांचे खरे आडनाव हुद्दार होते; पण पुढे यरगट्टीकर म्हणूनच रूढ झाले. त्यांच्या वडिलांचे नाव अंताजी त्र्यंबक हुद्दार आणि आईचे नाव कृष्णाई होते.

     रामभाऊ यरगट्टीकर यांनी चिमड गावी आपले जीवन व्यतीत केले व तेथे चिमड संप्रदाय स्थापन केला, त्यामुळे त्यांचे नाव ‘चिमड महाराज’ म्हणूनच सर्वत्र प्रसिद्ध झाले. रामभाऊ बालपणापासून शिवोपासक होते. एकदा ते सज्जनगडाला गेले असता एका रामदासी साधकाने त्यांना ‘दासबोध’ ग्रंथ सांभाळण्यास दिला आणि नंतर तो अदृश्य झाला. हा ‘दासबोध’ ईश्वरी प्रसाद समजून रामभाऊ यांनी दासबोधाची अनेक पारायणे केली. रामभाऊंचे शिक्षण यरगट्टी येथेच झाले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वयाच्या चौदाव्या वर्षीच (इ.स. १८४७) खानापूर-बलवडी (सांगली जिल्हा) येथील बचारामपंत यांची कन्या येसूबाई हिच्याशी रामभाऊंचा विवाह झाला. त्यांना १८५७ मध्ये सातारच्या न्यायालयात कारकून म्हणून सरकारी नोकरी मिळाली. पुढे विटे, जत येथे त्यांची बदली झाली. जत येथे त्यांचा संपर्क उमदीच्या श्री निंबरगीकर महाराजांशी झाला. त्यांच्या मनात आध्यात्मिक बीज अंकुरले. पुढे निंबरगीकर महाराजांचे शिष्य साधू महाराज यांचा रामभाऊंना अनुग्रह लाभला.

     ‘प्रपंचात समाधानाने राहून परमार्थ सुख लुटावे’ या गुरूंच्या शिकवणीनुसार रामभाऊ यांनी प्रपंचात राहून आध्यात्मिक साधना आरंभली.

     अखंड साधना व अनुसंधानामुळे  रामभाऊ अल्पावधीतच सिद्धावस्थेस पोहोचले. त्यांचा हा अधिकार पाहून खुद्द निंबरगीकर महाराज यांनी रामभाऊंना योग्य त्या पात्र भाविकांना दीक्षा-अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. १९८० साली निंबरगीकर महाराज व गुरू साधू महाराज यांच्या आज्ञेने रामभाऊ नोकरीचा राजीनामा देऊन पत्नी व मुलीसह ‘चिमड’ गावी जाऊन स्थायिक झाले.

     चिमड येथे स्मशानभूमीजवळ एक पर्णकुटी बांधून रामभाऊ यांनी संसार थाटला. तेथे त्यांनी श्रीगुरू साधू महाराज समाधी मंदिर बांधण्याचा संकल्प केला. पाया बांधणीसाठी जागेत खोदकाम सुरू असतानाच एक प्रचंड झरा लागला. त्या जलप्रवाहात विहिरीसारखी भिंत घालून त्या जलाशयावरच श्री साधू महाराज, श्री निंबरगीकर महाराज आणि श्री काडसिद्ध सद्गुरू अशा त्रयीचे मंदिर बांधले. तेथून ‘चिमड’ हे स्थान परम पावन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस पावले. नित्य प्रवचन, पंचपदी आणि उपासना यांमुळे साधकांमध्ये ‘चिमड’ हे फार मोठे श्रद्धास्थान झालेले आहे. रामभाऊ यरगट्टीकर तथा चिमड महाराजांच्या भाविकांना आलेल्या अतर्क्य अनुभवांच्या अनंत कथा ऐकावयास मिळतात. भक्त  संकटमोचक दुःखनिवारक अशा चिमड महाराजांच्या अनेक आठवणी सांगतात.

     चिमड महाराजांच्या गुरूंचे गुरू श्री निंबरगीकर महाराज १८८५ साली चैत्र शुद्ध द्वादशीला शिवस्वरूपी लीन झाले. चिमड महाराज यांचा शिष्यपरिवारही मोठा आहे. वामनकाका, गोपाळराव दीक्षित, अप्पाराव भावे, विनायक हरी साठे अशा अनेक साधकांना त्यांनी दीक्षा देऊन मार्गदर्शन केले. तात्यामहाराज कोटणीस हे त्यांचेच शिष्य होत. चिमड महाराज यांच्या पत्नी येसूबाई ऊर्फ सीताबाई यांचीही साधना सिद्धावस्थेस पोहोचलेली होती. भाविक साधक त्यांना माईसाहेब म्हणत. चिमड महाराज यांना एक कन्या व तीन पुत्र झाले. चिमड महाराज समाधिस्थ झाल्यावर या पुत्रांनीच चिमड संप्रदायाची परंपरा समर्थपणे पुढे चालविली.

     दाजी महाराज (१८८१ ते १९००), नारायण महाराज (१८८५ ते १९६३), उद्धव महाराज (१८८९ ते १९३२) अशी ही परंपरा आहे. चिमड मठामध्ये चिमड महाराजांनंतर लक्ष्मीबाई अक्का या शिष्या सर्वांना अनुग्रह देत. अक्कांच्या निर्वाणानंतर हा अधिकार माईसाहेबांकडे आला. रामभाऊ यरगट्टीकर ऊर्फ चिमड महाराज यांचे पूर्व कथनानुसार, पूर्वज्ञात तिथीला इ.स. १८९१ मध्ये निर्वाण झाले. श्री निंबरगीकर महाराज यांनी रामभाऊंना ‘हत्तीवर कधीही बसू नको; ज्या दिनी तू हत्तीवर बसशील, त्यानंतर तुझा मृत्यू होईल,’ असे मृत्यूचे पूर्वज्ञान दिले होते. रबकवीच्या अतिआग्रहाने रामभाऊ मिरवणुकीत हत्तीवर बसले आणि कोणत्याही आजाराविना मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला त्यांचे निर्वाण झाले. रामभाऊ गेले तेव्हा त्यांचा ज्येष्ठ मुलगा रघुनाथ ऊर्फ दाजी हा बरोबर दहा वर्षांचा होता. चिमड येथे श्रीगुरू साधू महाराज यांच्या समाधीजवळच रामभाऊ यांच्या स्मरणार्थ औदुंबराचे एक झाड लावण्यात आलेले आहे.

      रामभाऊ यरगट्टीकर यांच्यानंतर चिमड संप्रदायाची गादी त्यांचे सुपुत्र दाजी महाराज यांच्याकडे आली. १८९७ साली ते मठाधिपती झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे १७ वर्षांचे होते. ते अल्पायुषी होते. केवळ तीन वर्षांनी, १९०० मध्ये त्यांचे विसाव्या वर्षीच निर्वाण झाले. त्यानंतर चिमड मठाची जबाबदारी रामभाऊंचे द्वितीय पुत्र नारायण महाराज यांनी सांभाळली. ते स्वतःला मठाधिपती न मानता मठातील एक सेवेकरी समजत होते. त्यांचे १९६३ साली निर्वाण झाले. विशेष म्हणजे मामा महाराज केळकर हे त्यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी एक आहेत.

विद्याधर ताठे

यरगट्टीकर, रामभाऊ अंताजी