Skip to main content
x

खाँ, अमान अली

. अमान अली खाँ भेंडीबाजार घराण्याच्या तीन संस्थापक बंधूंपैकी सर्वांत मोठे उ. छज्जू खाँ यांचे सुपुत्र होत. घरात संगीताचे वातावरण असूनही अमान अली खाँ यांना बालपणी संगीतात रुची नव्हती. त्यामुळे तीनही बंधूंना या गोष्टीचे दु:ख होत असे. परंतु एकदा उ. नजीर खाँ साहेबांच्या शिष्या अंजनीबाई मालपेकर यांचे गायन अमान अली खाँनी ऐकले आणि त्या गायनाने ते प्रभावित झाले. या संधीचा फायदा घेऊन अंजनीबाईंनी घराण्याच्या उज्ज्वल परंपरेची त्यांना कडक शब्दांत जाणीव करून दिली व घराण्याची परंपरा चालवण्यास उद्युक्त केले. त्यानंतर त्यांचे आपल्या वडिलांकडे व काकांकडे संगीताचे अध्ययन सुरू झाले. जन्मत: तीक्ष्ण बुद्धी, गोड आवाज व अंगभूत लयीची ईश्वरी देणगी आणि तीव्र ग्रहणशक्ती या गुणांमुळे काही वर्षांतच अमान अलींनी घराण्याची गायकी आत्मसात केली.

उ. अमान अली खाँनी त्यांना मिळालेल्या घराण्याच्या परंपरागत गायकीव्यतिरिक्त इतर गायन वैशिष्ट्येही आपल्या गायकीत समाविष्ट केली. संगीतशास्त्र आणि हिंदी साहित्य यांचा अभ्यास केला. विविध स्वरावलींच्या नोटेशन करण्याचाही त्यांनी सराव केला. वडील धृपद उत्तम गात, तसेच त्यांचा ब्रजभाषेचा अभ्यासही दांडगा होता. अमान अली खाँ यांचाही ब्रजभाषेचा अभ्यास होत गेला. कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध विद्वान कृष्णाप्पा बिडार यांच्याकडे ते कर्नाटक संगीत शिकले. घरातील आध्यात्मिक वातावरणाचाही त्यांच्यावर प्रभाव होता.

भेंडीबाजार गायकीमध्ये त्यांनी आपल्या कल्पकतेने व चिंतन-मनन करून काही सौंदर्यपूर्ण वैशिष्ट्यांची भर घातली. आवाजाचा अतिमोकळा लगाव, अत्यंत विलंबित लयीची गायकी व अतिदीर्घ मींड या गोष्टींमध्ये त्यांनी बदल केला. स्वाभाविक मृदू स्वरलगाव, मध्य लयीची गायकी व संयमित मींड या गोष्टींचा समावेश केला. मध्य लयीतील सुरतालाचे वेगळेच परिमाण या गायकीला लाभले. कर्नाटक संगीतातील ‘सरगम’चा प्रस्तुतीकरणात बदल करून त्यांनी ती आपल्या गायनात आणली. त्याचप्रमाणे त्यांनी कर्नाटक संगीतातील हंसध्वनी, प्रतापवराळी, नागस्वरावली इत्यादी रागांमध्ये उत्तमोत्तम बंदिशीही बांधल्या.

अमान अली खाँ हे उत्तम रचनाकारही होते. वडिलांची काव्यप्रतिभा वारशाने त्यांच्यातही आली होती. वल्लभ संप्रदायाशी त्यांचा संपर्क होता. आपल्या वडिलांचे ‘अमर’ हे उपनाव घेऊन त्यांनी श्रीगणेश, शंकर, देवी सरस्वती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या लीलांचे वर्णन, तसेच ‘तत्त्वज्ञान’ या विषयावर साहित्यिक मूल्ये जपणार्‍या बंदिशींची रचना केली. काव्यगुण व नादमयव्यंजने, शब्द असणार्‍या व उच्च साहित्यिक गुण असलेल्या विविध विषयांवरील अनेक बंदिशी त्यांनी बांधल्या.

‘जय माता विलंब तज’ व ‘लागी लगन सखी’ (हंसध्वनी), ‘सुगम रूप सलोने’ व ‘जागे एरी लालन’ (यमन), ‘मनवारन रीझन’ (खेम), ‘मध मदन बावरी’ (पटबिहाग), ‘अत सोहत चंद्रवदन’ (दुर्गा), ‘पती देवन महादेव’ (झिंझोटी), ‘जय श्रीशंकरसुत गणेश’ (गुणक्री), ‘जमुना जमुना कित’ (रागेश्री), ‘अंगना रसिक सहेलन’ (पंचम), ‘ए मोरवा करही पुकार’ (शुद्धसारंग), ‘बन पंछी डोलन’ (गौरी), ‘बनरा बन आयो’ (जोग) या त्यांच्या काही प्रचलित, लोकप्रिय बंदिशी होत. खाँ साहेबांचा तालाचा व्यासंग दांडगा होता. साडेसात मात्रांपासून ते ५५ मात्रांपर्यंत तालांची रचना करून अशा सर्व तालांत त्यांनी रचना केल्या.

खंडमेर पद्धतीची सौंदर्यपूर्ण बढत, स्वरांचे गुंजन, बीन अंगाची मींडयुक्त आलापी, इ. भेंडीबाजार गायकीच्या मूळ वैशिष्ट्यांबरोबरच, कर्नाटक ढंगाच्या लयदार सरगमचा कौशल्यपूर्ण उपयोग, सूत, मींड उचक-समेट यांसारख्या क्रियाव भावपूर्ण शब्दोच्चार ही त्यांच्या गायकीची ठळक वैशिष्ट्ये होत. प्रत्येक वेळी बंदिशीचा मूळ मुखडा तसाच न म्हणता आलापानुसार वेगवेगळ्या प्रकारे मुखडा पेश करून समेवर आकर्षकपणे येणे (मुखविलास) हेही त्यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य होते. त्यांना लेखनाची आवड होती. खाँसाहेबांनी संगीतशास्त्रावर उर्दू भाषेत एक मोठा ग्रंथ लिहिला होता. दुर्दैवाने घराला लागलेल्या आगीत तो ग्रंथ नष्ट झाला.

खाँसाहेबांनी उदारहस्ते विद्यादान करून घराण्याची गायकी पुढील पिढीला सुपूर्त केली. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये उ. अमीर खाँ, पं. शिवकुमार शुक्ल, डॉ. वसंतराव देशपांडे, पं. त्र्यंबकराव जानोरीकर, मास्टर नवरंग, पांडुरंग आंबेरकर, रमेश नाडकर्णी आणि उस्ताद मोहम्मद हुसेन खाँ यांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकरांनाही खाँ साहेबांकडून गायनाची तालीम मिळाली आहे. भेंडीबाजार गायकीचा प्रचार-प्रसार आणि सौंदर्यपूर्ण सादरीकरणात अमान अली खाँसाहेबांचा प्रमुख वाटा आहे.

       — शरद करमरकर

खाँ, अमान अली