Skip to main content
x

तेंडूलकर, विजय धोंडोपंत

पटकथा-संवाद लेखक

६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८

ऋ मुख्य नोंद - साहित्य खंड

विजय तेंडुलकर नाट्य व्यवसायात  प्रस्थापित झाल्यावर त्यांनी चित्रपट-पटकथा लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे त्यांच्या पटकथा लेखनाकडे फारसे लक्ष गेले नाही. त्यांनी नाटक स्वत:साठी लिहिले आणि चित्रपट अर्थार्जनासाठी, असे एका मुलाखतीत सांगितल्यामुळे कदाचित मराठी अभिजनांनी त्यांच्या पटकथा लेखनाकडे दुर्लक्ष केले असावे. वस्तुत: ग.दि. माडगूळकरांनंतर विजय तेंडुलकर हा समर्थ पटकथाकार चित्रपटाला लाभला. मराठीत पटकथा लेखन करण्यार्‍या लेखकांची यादी डोळ्यासमोर आणली तर त्यात फक्त विजय तेंडुलकर एकमेव पटकथा लेखक असे आहेत, ज्यांना चित्रपट हे प्रादेशिक माध्यम नसून वैश्‍विक माध्यम आहे, याची जाणीव होती. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना विजय तेंडुलकर हजेरी लावीत आणि जगातील उत्तम चित्रपटांचा आस्वाद घेत असत. लेखक म्हणून वाढत्या वयात चित्रपटावर तेंडुलकरांची जडणघडण पोसली गेली हे कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही, इतका नाटककारम्हणून त्यांच्यावर शिक्का बसला आहे.

तेंडुलकर १२/१५ वर्षांचे असताना, म्हणजे तीसच्या दशकात बोलपट आल्यामुळे नाटक पार कोसळले होते. त्या काळात माणूस’, ‘कुंकू’, ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकारामइ. प्रभातच्या चित्रपटांनी लेखक म्हणून त्यांची जडणघडण झाली. एका मुलाखतीत स्वत: तेंडुलकरांनीच याची कबुली दिलेली आहे. दैनिकात काम करत असताना त्यांनी नाटके लिहिली आणि  हॉलिवूडचे चित्रपट पाहून पटकथा लेखनाचा अभ्यास केला. दै. मराठात रविवारची पुरवणी संपादित करत असतानाच मराठाचे इंग्रजी चित्रपटाचे दर आठवड्याला ते सदर लिहीत असत. त्या निमित्त त्यांनी असंख्य हॉलिवूड चित्रपट पाहिले.

तेंडुलकरांची पहिली पटकथा हिंदी होती, ‘प्रार्थना’. वसंत जोगळेकर त्याचे दिग्दर्शक होते. १९७१ साली त्यांनी आपल्याच शांतता, कोर्ट चालू आहेया नाटकावरून त्याच नावाचा चित्रपट लिहिला. त्या वेळी तरुण असलेले सत्यदेव दुबे आणि गोविंद निहलानी हे त्याचे दिग्दर्शक होेते. मराठीतला हा पहिला समांतर चित्रपट. पण तमाशा चित्रपटात गर्क असलेल्या मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाचे थंड स्वागत केले.

तेंडुलकरांची पहिली यशस्वी पटकथा म्हणजे सामना’. डॉ. जब्बार पटेल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाची जुगलबंदी समोर ठेवून तेंडुलकर यांनी तो लिहिला. एका साखरसम्राटाची ही कथा होती. तोपर्यंत मराठी साहित्यातही साखरसम्राटावर कादंबरी लिहिली गेली नव्हती. तेंडुलकर यांनी या साखरसम्राटाला खलनायक बनवले नाही. १९७६ च्या बर्लिन महोत्सवात या चित्रपटाने भारताचे प्रतिनिधित्व केले. तेंडुलकर यांनी जब्बार पटेलांसाठी त्यापाठोपाठ सिंहासनआणि उंबरठाहे उत्कृष्ट मराठी चित्रपट लिहिले. याच काळात श्याम बेनेगल यांच्यासाठी निशांतमंथनहे दोन हिंदी चित्रपट लिहिले. मंथनसाठी विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.

मानवत खून खटल्यावरत्यांनी अमोल पालेकरांसाठी आक्रीतहा चित्रपट लिहिला. फ्रान्सच्या नाण्टस महोत्सवामध्ये या चित्रपटालाही उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नंतर त्यांनी गोविंद निहलानींसाठी आक्रोशलिहिला. या चित्रपटाला भारताच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णमयूर पारितोषिक मिळाले आणि श्री.दा. पानवलकरांच्या लघुकथेवरून गोविंद निहलानींसाठी अर्धसत्यलिहिला. हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला. राज कपूर यांना अर्धसत्यएवढा आवडला की त्यांनी पुढचा चित्रपट लिहायला तेंडुलकरांना निमंत्रण पाठवले. पैशासाठी चित्रपट लिहितो असे म्हणणार्‍या तेंडुलकरांनी हे निमंत्रण साभार नाकारले. कोणता विषय नाटकासाठी घ्यायचा आणि कोणता चित्रपटासाठी घ्यायचा याची अचूक जाण तेंडुलकरांना होती. प्रतिमामाध्यमावर त्यांची हुकमत होती.

तेंडुलकरांचे निधन झाले, तेव्हा नाटककार तेंडुलकर गेलेअशी वार्ता छापून आली. वास्तविक ते नाटककार म्हणून जेवढे श्रेष्ठ होते त्याहून अधिक पटकथाकार म्हणून श्रेष्ठ होते. पण चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने तेंडुलकरांकडे म्हणावे तसे लक्ष गेले नाही.

- सुधीर नांदगावकर