Skip to main content
x

गर्गे, सदाशिव मार्तंड

 

. मा. गर्गे

कोशकार, पत्रकार

४ नोव्हेंबर १९२०   ४ नोव्हेंबर २००५

सदाशिव मार्तंड गर्गे यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात निजामाच्या राज्यातील लहूरी या लहानशा गावात झाला. त्यांनी उर्दू भाषेत प्राथमिक शिक्षण कसेबसे पुरे केले. त्याच वेळी वडिलांच्या आग्रहामुळे हरिविजय, पांडवप्रताप अशा धार्मिक पोथ्यांचे वाचन झाले. त्यामुळे वाचायची गोडी लागली. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना तालुक्याच्या गावी जावे लागले. तेथे स्वामी दयानंद सरस्वतींचा सत्यार्थप्रकाशहा आर्य समाजाचा प्रमुख ग्रंथ वाचायला मिळाला. त्याचा विशेष परिणाम म्हणजे ते पोथी वाङ्मयातून बाहेर पडून ललित वाङ्मय, वैचारिक लेख वाचू लागले.

शालेय शिक्षण संपल्यावर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गर्गे हैदराबादला गेले. या निराळ्या जगात त्यांना आगरकरांचे लेखन वाचायला मिळाले. त्याचबरोबर लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री.. माटे, पु.. सहस्रबुद्धे यांचे वैचारिक लेखनही त्यांनी वाचले. कायद्याचे शिक्षण घेत असताना गर्गे यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून ते नोकरीसाठी औरंगाबादला आले.

औरंगाबादला गर्गे यांनी १९४०-१९४५मध्ये सरस्वती भुवन शाळेत पाच वर्षे नोकरी केली. या काळात मराठवाड्यात निजामविरोधी चळवळ फार जोरात होती. त्यात सहभागी असलेल्या गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या विचारवंताचा सहवास त्यांना लाभला. तेथील अभ्यास वर्तुळात त्यांना मार्क्सवादाची ओळख झाली. तसेच समाजवाद, लोकशाही, रॉयिस्ट विचार यासंबंधी खूप ऐकायला मिळाले. त्याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे गर्गे यांच्यावर नवीन पुरोगामी विचारांचे संस्कार घडू लागले. मात्र ते या चळवळीत अडकून पडले नाहीत.

१९४५ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे; ज्येष्ठ पत्रकार ग.त्र्यं. माडखोलकर अध्यक्ष होते; तर गर्गे संमेलनाचे कार्यवाह होते. माडखोलकरांच्या संपर्कामुळे गर्गे यांनी पत्रकारितेच्या नव्या क्षेत्रात उडी घेतली. माडखोलकरांबरोबर दै. तरुण भारतमध्ये काम करताना गर्गे यांचे समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचे वाचन, आकलन आणि व्यासंगही वाढला. या विषयांवर स्वतंत्र लेखन करण्याची कल्पना त्यांच्या मनात येथेच रुजली. मात्र १९४८ च्या गांधीखुनानंतर गर्गे यांनी नागपूर सोडले आणि ते पुण्याला आले.

पुण्यात आल्यावर गर्गे दै. सकाळमध्ये रुजू झाले. सकाळचे संस्थापक, संपादक कै. ना.भि. परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पत्रकारितेचा उत्तम अनुभव मिळाला. दहा वर्षे दै. सकाळमध्ये काम केल्यावर ते दै. विशाल सह्याद्रीत गेले. १९७० मध्ये त्यांनी वृत्तपत्रातील नोकरी सोडून स्वतंत्र लेखन सुरू केले. मधल्या काळात इंग्रजी लेखक कर्नल मनोहर माळगावकर आणि कोल्हापूरचे शहाजी महाराज यांच्या प्रेरणेने गर्गे यांनी करवीर रियासतहा ग्रंथ लिहिला. त्यातून त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी करवीरच्या इतिहासाच्या कागदपत्रांचे संपादन केले.

स्वतंत्र लेखन सुरू केल्यावर गर्गे यांनी समाज-विज्ञान कोशाचा बृहद प्रकल्प हाती घेतला. १९७६ ते १९८६ या कालखंडात समाज-विज्ञान कोशाचे एकूण सहा खंड प्रकाशित झाले. भारतीय भाषांतील समाजशास्त्रावरील उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ म्हणून या कोशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

ज्ञानलालसेसाठी केलेला संघर्ष आणि सरस्वतीची उपासना या दोन बाबी त्यांच्या जीवनाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. एक समाज-विज्ञान कोशकार, पत्रकार, प्रज्ञावंत आणि स्थितप्रज्ञ अशा विविध अंगांनी त्यांची नोंद घेता येते. त्यांनी केलेले ठळक काम म्हणून भारतीय समाज-विज्ञान कोशाच्या एकूण ६ खंडांकडे बघावे लागते.

अशा खंडातील कामात येणार्या अडचणींचा विचार करता, एखादी विशिष्ट नोंद केल्यावर त्या संदर्भात वेगळा अभिप्राय देणे शक्य असते. पण एखादी नोंद करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा काम पूर्ण करून देणारी मंडळी मात्र अभावानेच आढळतात आणि संपादक म्हणून अंतिम निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. नोंदीतील वस्तुनिष्ठता आत्यंतिक तटस्थतेने पाहावयाला हवी. काम उभे करताना सातत्याने परिश्रम घ्यावयाचे आणि शेवटी निरर्थक टीकेचे धनीही व्हायचे. असे असले तरी आपल्या कामावरची निष्ठा कुठेही ढळू न देणारा हा तपस्वी होता. कुठलाही अभिनिवेश आणि किंचितही गर्व त्यांना कधीही स्पर्श करू शकला नाही.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या कामाविषयी नोंद करताना म्हणतात, ‘‘भारतीय समाज-विज्ञान कोश हा उपयुक्त साधनग्रंथ संपादन करून श्री. .मा. गर्गे यांनी मराठी भाषेत महत्त्वाचे कार्य केले आहे. समाजव्यवस्था, राजकीय जीवन, आर्थिक स्थिती अशा सर्व क्षेत्रांत या देशात मोठे परिवर्तन घडून येत आहे. त्याचा अन्वयार्थ समजण्यासाठी व समाजाचा सखोल अभ्यास करण्यासाठी या कोशाचा फार मोठा उपयोग होईल. सद्य:स्थितीत भारतीयांना समाजसेवेच्या अनेक क्षेत्रांत ज्या जबाबदार्या पार पाडावयाच्या आहेत, त्यांचे सांगोपांग ज्ञान होण्यासाठी तर या कोशाच्या रूपाने मराठी भाषेला एक उत्कृष्ट शास्त्रीय संदर्भ ग्रंथाचे वरदानच लाभले आहे.’’

.मा. गर्गे या समाज-विज्ञान कोशाच्या कामामुळे चिरंजीव झाले असले, त्यांची अन्य कामेही त्याच तोडीची आहेत. विशेषतः रियासतकार सरदेसाई यांनी लिहिलेल्या रियासतीम्हणजे इ.. ११०० ते इ.. १८५७ या कालखंडाचा इतिहास आहे. या रियासतीच्या बारा खंडांचे नव्या संदर्भासह संपादनाचे काम त्यांनी हाती घेतले. यातील आठ खंडांचे काम ते पूर्ण करू शकले. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्याचा इतिहास त्यांनी करवीर रियासतीच्या स्वरूपात लिहून पूर्ण केला. त्यामध्ये सन १७१० ते १९४९ या काळातील इतिहास त्यांनी लिहिला. कर्नल मनोहर माळगावकर यांची प्रेरणा या कामी होती. याशिवाय हिंदूराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेकडील इतिहासया महत्त्वपूर्ण ग्रंथाबरोबरच त्यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात केलेले लेखन आणि राज्यशास्त्राचा विकास’ (१९५४), समाजवादी समाजरचना (१९५६), ‘भारतीय राज्यघटनेचा इतिहास’ (१९६१), ‘स्वप्न आणि सत्य’ (१९६५) सुलभ राज्यशास्त्र’ (१९६७) यासारखे अन्य काही ग्रंथ त्यांनी लिहिले.

त्यांची पत्रकारिता विधायक आणि पुरोगामी विचारांची होती. शांतिपर्वातील कथायामध्ये त्यांनी रूपक कथा लिहून समाजस्थितीवर भाष्य केले. .मा. गर्गे यांना जे सन्मान प्राप्त झाले आणि त्या वेळी त्यांनी जे विचार व्यक्त केले, ते नवी दिशा देणारे ठरले. आकांक्षा पत्रकारितेच्यायाविषयी त्यांचे चिंतन मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षीय भाषणांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करताना त्यांनी असेच मूलगामी चिंतन केल्याचे दिसते. संपूर्ण इतिहासाच्या व्याख्येत बहुजन समाज स्थितीचा उल्लेख महत्त्वाचा आहे. राजवाडे यांच्या पुढे जाऊन समाजाचा संपूर्ण इतिहास म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा इतिहास, तात्पर्याने बहुजन समाज स्थितीचा आणि त्या स्थितीत परिवर्तन घडवून आणणार्या विचारांचा इतिहास असायला हवा. इतिहासाच्या घडणीत मुख्य घटक असतो तो समकालीन वैचारिक प्रेरणांचा. अशा प्रेरणांचा शोध घेण्यानेच सामाजिक घटनांचा अर्थ समजू शकतो. तसेच समाज परिवर्तनाची दिशा, गती, कार्य आणि परिणाम यांचेही आकलन होऊ शकते, अशा मूलगामी बाबी ते स्पष्ट करतात.

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात १३ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत ७०० वर्षांच्या कालखंडात तीन प्रमुख सामाजिक परिवर्तने घडली, असे ते स्पष्ट करतात. यादवकालाच्या उत्तरार्धात इस्लामी आक्रमणाच्या वेळी पहिले परिवर्तन घडले. त्याला ज्ञानदेव आणि त्यांच्या समकालीन तत्त्वचिंतकांनी केलेल्या परिवर्तनाचे स्थान आणि कार्य महत्त्वाचे होते. त्यातून निर्माण झालेला भक्तिमार्गाचा प्रवाह समाजजीवन ढवळणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी दुसरे परिवर्तन घडले व १९ व्या शतकाच्या प्रारंभी पाश्चात्त्य विचारांच्या आणि विज्ञानाच्या, तत्त्वज्ञान्यांच्या प्रेरणेतून तिसरे परिवर्तन झाले. अशा प्रकारचे त्यांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांच्या सातत्याने केलेल्या सखोल चिंतनाचा परिपाक ठरतो. .मा. गर्गे वयाच्या ८५ व्या वर्षी अनंतात विलीन झाले.

एकूण आपल्या चिंतनशील शैलीने आणि सततच्या ज्ञानसाधनेने महाराष्ट्राच्या इतिहास अभ्यासकांना आणि एकूणच बहुविध क्षेत्रात कार्य करणार्या अनेकांना प्रेरणादायी ठरणारे मोठे काम स.मा. गर्गे यांच्या हातून झाले आहे.

कविता भालेराव