Skip to main content
x

तळपदे, शिवकर बापूजी

     आधुनिक भारतातील विमानोड्डाणाचा पहिला प्रयत्न करणारे तंत्रविशारद. प्राचीन विमानविद्या ही वेदकाळापासून प्रचलित होती. भारतीय विमान कला केवळ पठणविद्या नव्हती. प्रत्यक्ष प्रयोगविद्या आणि यंत्रविद्या होती. परंतु ही पुरातनकालीन विद्या, मधल्या हिंसक व विध्वंसक आघाताच्या युगात जवळजवळ नाहीशी झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कृष्णाजी विनायक वझे व भुसावळ विद्यालयाचे मुख्याध्यापक परशुराम थत्ते या दोघा समकालीन संशोधकांनी विमानशास्त्रावर बरेच लिखाण केले; परंतु त्यासंबंधी प्रयोग मात्र केले नाहीत. विमानशास्त्राचे पठण करून व त्यानुसार यंत्र निर्माण करून पहिले विमान हवेत उडविण्याचा यशस्वी प्रयोग करण्याचे श्रेय मात्र त्यांच्या समकालीन पं. शिवकर बापूजी तळपदे ह्यांना जाते.

     तळपदे एक संशोधक व विज्ञानशाखेतील तंत्रविशारद होते. मुंबईच्या प्रसिद्ध ज.जी. कला महाविद्यालयामध्ये ते ‘आर्ट आणि क्राफ्ट’ या विषयाचे अध्यापक होते. त्यांना व त्यांच्या पत्नीला संस्कृत भाषेचे ज्ञान अवगत असून, त्यायोगे त्यांनी विमानविद्येचा अभ्यास करून आपल्या घरातीलच प्रयोगशाळेत एक ६ मीटर × १.२ मीटर असा पक्ष्याच्या आकाराचा सांगाडा बनविला. वर्गात शिकविताना चालत्या गाड्या व फिरती चक्रे तयार करण्यासाठी ते पाठ देत असत. हवेत उडणाऱ्या पक्ष्यांचे चित्र काढताना पंखांची उघडझाप यंत्राच्या साहाय्याने करता आली, तर असे पक्ष्याच्या आकाराचे विमान हवेत निश्चितच झेप घेईल, अशी त्यांची धारणा होती.

     त्यांच्या या प्रयोगात त्यांनी पाऱ्याचा ऊर्जेसाठी वापर केला व १८९५ साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या चौपाटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्री. पिटकर यांच्या साहाय्याने व पोलिसांच्या परवानगीने आपले ‘मरुत्सखा’ हे विमान अवकाशात उडविले. त्या वेळी नामदार गोखले, जगन्नाथ शंकरशेट आणि इतर मान्यवर मंडळी तेथे उपस्थित होती. अर्वाचीन विमानशास्त्राच्या इतिहासात तळपदे एक यशस्वी संशोधक म्हणून नावारूपाला आले. सूर्यकिरण व पारा यांच्या संयोगाने पाऱ्याचे विभाजन होते व हायड्रोजन वायू तयार होतो. हायड्रोजन वजनाने हलका असल्यामुळे वर जातो. शिवकरजींच्या विमानाला त्यानेच गती मिळाली. पक्ष्याच्या आकाराच्या सांगाड्याला क्रँकशाफ्ट व चक्र लावल्यामुळे त्यांचे विमान पुढे सरकत गेले. त्यांचे विमान काही सेकंदांतच खाली आले. पुढील तत्सम प्रयोगांसाठी अर्थसाहाय्य न मिळाल्यामुळे हा प्रयोग तेथेच संपुष्टात आला. त्यांच्या या प्रयोगाला त्यांच्या एका तत्कालीन प्रसिद्ध  विद्यार्थ्याने - पं.श्री.दा. सातवळेकर - यांनी पुष्टी दिली आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्तमानपत्रांतून व नियतकालिकांमधून त्यासंबंधी लेख लिहिले गेले.

     प्रा. केळकर यांनी त्यांच्या ‘आधुनिक भारतीय वैज्ञानिक’ या ग्रंथात शिवकरजींच्या चरित्रलेखात खालीलप्रमाणे लिहिले आहे: ‘पारतंत्र्यात असताना स्वतंत्र बुद्धीने केलेली शास्त्रीय प्रगती दुबळ्या पक्ष्यासारखी, पंख कापलेल्या पक्ष्यासारखी कीर्तीची झेप घेऊ शकत नाही.’

डॉ. सदानंद कुलकर्णी

तळपदे, शिवकर बापूजी