Skip to main content
x

बोधे, जनार्दन गणपत

     जनार्दन गणपत बोधे यांचा जन्म पाचगणी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई आणि पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते १९३८ साली मे. के. आर. इराणी अ‍ॅण्ड कंपनी या मुंबईतील स्थापत्य-अभियांत्रिकी सल्लागार कंपनीत रुजू झाले. त्याच कंपनीत ते कालांतराने, आपल्या कर्तृत्वाने कंपनीचे भागीदार झाले.

     बोधे हे कर्तबगार अभियंता व वास्तुरचनाकार होते. फक्त इमारतीच नव्हे, तर सिमेंट कारखाने, सूतगिरण्या, साखर कारखाने, औषधी कारखाने, विविध पूल इ. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. त्यांसाठी त्यांनी भारताबाहेरही काम केले, ही त्यांच्या कामाची गुणवत्ता दर्शवणारी बाब आहे. अहमदाबाद येथील नेहरू पुलाचा आराखडा बोधे यांनी केलेला होते. मुंबई ते उरण यादरम्यान समुद्रावर एक झुलता पूल बांधण्याची कल्पना त्यांनी मांडली. इतकेच नव्हे, तर त्याचा अभिकल्प आणि प्रतिकृती शासनाला तयार करून दिली; पण त्या वेळी शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर तसा पूल बांधण्याचे ठरले ही बोधे यांच्या दूरदृष्टीची साक्ष पटवणारी बाब ठरते.

     बोधे अनेक देशी-विदेशी संस्थांचे सदस्य व पदाधिकारी होते. इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स- लंडन, अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स, फ्रेंच सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सभासद होते. तत्कालीन बॉम्बे बिल्डींग रिपेअर बोर्डाचे सदस्य, महाराष्ट्र टेक्निकल एक्झामिनेशन बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई व पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त, फ्रेंड्स ऑफ ट्रीज आणि छत्रपती शिवाजी वस्तु संग्रहालयाचे पदाधिकारी अशा भिन्न प्रकारच्या समित्यांवर त्यांनी काम करून आपल्या ज्ञानाचा लाभ जनतेला मिळवून दिला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आणि नंतर विश्वस्त म्हण्ाूनही त्यांनी काम केले. शासनाने त्यांना जेस्टिस ऑफ पीस आणि ऑनररी प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट नेमले होते. १९७१-७२ आणि १९७२-७३ अशी दोन वर्षे ते इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष होते. १९७२-७३ साली  शासनाने त्यांना मुंबईचे नगरपाल (शेरिफ) म्हण्ाून नेमले. त्या वेळी त्यांनी खूप कामे केली.

     डिसेंबर १९८९ मध्ये भुवनेश्वरला मोक्षगुंदम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीनिमित्त बोधे यांनी दिलेल्या व्याख्यानाला दहा हजार अभियंते उपस्थित होते. त्यांचा जनसंपर्क प्रचंड आणि सर्व क्षेत्रांत पसरलेला होता. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, पर्शियन, पंजाबी, गुजराती , रशियन, फ्रेंच अशा अनेक भाषा अवगत होत्या. त्यामुळेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी बोधे हे अभियंत्यांचे पुढारी आहेत, असे केलेले विधान सार्थ ठरते.

     बोधे जातीने नामदेव-शिंपी होते. संत नामदेव भजने करत-करत भागवत धर्म प्रसारार्थ पंजाबात गेले आणि त्यांचे अभंग शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात समाविष्ट झाले.  हे अभंग मुळातून वाचावे, अशी बोधेंना इच्छा झाली. त्याकरिता ते गुरुमुखी लिपी शिकले आणि गुरुग्रंथसाहेबातील नामदेवांची भजने त्यांनी जाणून घेतली. त्याबाबत पंजाबातील प्रतिष्ठित नागरिकांशी ते बोलले. ह्याच कारणाने शीख समाजाशी त्यांचा जवळचा संबंध होता.

     १९८३-८४ साली महाराष्ट्रात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये निघू लागली. ही महाविद्यालये सुरू करण्याच्या समितीवर त्यांनी काम केले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन त्यांनी पायाभूत सोयी-सुविधा काय आहेत, त्या पाहून त्यांत सुधारणांविषयी सूचना केल्या. त्यांची अंमलबजावणी झाली किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी दोनेक वर्षांत पुन्हा त्या महाविद्यालयांना भेटी दिल्या.

     मराठी विज्ञान परिषदेच्या १९७२ साली कोल्हापूर येथे भरलेल्या सातव्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय ‘स्थापत्य आणि संस्कृती’ होता. त्यामध्ये त्यांनी इजिप्तचे पिरॅमिड व सूर्यस्तंभ यांचा, तसेच पर्शियन बॅबिलोन यांची छते व कमानी या बांधकामांचा सुरेख आढावा घेतला. ग्रीक स्थापत्यतज्ज्ञांची कामगिरी सांगितली, तसेच त्यांनी भूमितीचा केलेला वापर विशद केला.

     त्यांनी रोमन संस्कृतीमधील राजवाडे, नगरचौक, सभागृहे इत्यादी रचनांची माहिती दिली. त्याचबरोबर, भारतातील १००० स्तंभांचे मंडप, यज्ञशाळा, लाकूड-विटा, पाषाण यांच्या साहाय्याने बांधलेली घरे, बुद्धविहार, भुवनेश्वर, मदुराई, खजुराहोची मंदिरे, विजापूरच्या गोलघुमटाची रचना, दीपमाळा, झुलते मनोरे इ. सर्व तपशिलांत वर्णन करून सांगितले. हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशिला, पाटलीपुत्रच्या वेळच्या नगररचनांची ओळख त्यांनी करून दिली. प्राचीन बांधकामाचा अभ्यास इथपासून झुलत्या पुलाच्या रचनेपर्यंत बोधे यांचा आवाका होता, हे यावरून निदर्शनास येते.

     बोधे हे जसे कर्तबगार अभियंते होते, तसेच एक रसिक व विचारवंत होते. ‘मानवी शरीर : एक ईश्वरी साधन’ या विषयावर वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रबंध लिहिला होता.

     १९६८ साली जयपूरला त्यांच्या प्रबंधाला जवाहरलाल नेहरू सुवर्णपदक मिळाले होते. तसेच कोलकत्याला १९७० साली त्यांच्या प्रबंधाला के.एफ. आन्टिआ स्मारक पारितोषिक मिळाले होते. संस्कृत आणि भारतीय संगीत या विषयांमध्येही त्यांचा व्यासंग होता. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

दिलीप हेर्लेकर

बोधे, जनार्दन गणपत