Skip to main content
x

देशमुख, केशव रघुनाथ

देशमुख, केशव महाराज

    नामवंत समाजसेवक लोकहितवादी तथा गोपाळ हरी देशमुख यांचे नातू केशव रघुनाथ देशमुख यांचे वारकरी संप्रदायामध्ये विशेष स्थान व विशेष योगदान आहे. देशमुख घराण्याला उच्चशिक्षणाचे व समाजसेवेचे वरदानच लाभलेले होते. केशवराव हे या परंपरेप्रमाणेच एलएल.बी. व नंतर एम.ए. झाले होते. ब्रिटिश काळात एवढे शिक्षण उच्चपदस्थ अधिकाऱ्याची नोकरी मिळवण्यास पुरेसे होते; पण ब्रिटिश सरकारची नोकरी न करता त्यांनी पारमार्थिक क्षेत्राला प्राधान्य दिले.

केशवरावांचे शिक्षण मुंबईत झाले. ते एलएल.बी करीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले व त्यांना कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर केशवराव यांनी ‘ज्ञानेश्वरी’ विषय घेऊन एम.ए. पूर्ण केले. ज्ञानेश्वरीतील ज्ञान, भक्ती व काव्याने ते प्रभावित होऊन ते ज्ञानेश्वरीमयच होऊन गेले. पुण्यात त्यांचा संपर्क थोर सत्पुरुष विष्णुपंत जोग यांच्याशी आला. जोग यांच्या प्रभावाने ते नगरकर तालमीतही जाऊ लागले. ज्ञानेश्वरीवरील जोग यांचा अधिकार केशवरावांना नव्या-नव्या प्रेरणा देणारा ठरला. जोग महाराजांची कीर्तने व प्रवचने आवडीने ऐकून ते बहुश्रुत झाले.

केशवरावांचा धर्मपरायण, सोज्ज्वळ स्वभाव पाहून आळंदीच्या राममंदिराच्या व्यवस्थापकाची कन्या सांगून आली, या विवाहाचे सुख फार काळ त्यांच्या नशिबी नसल्यामुळे अल्पकाळातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. केशवरावांनी पत्नी वियोगाचे दु:ख करत बसण्याऐवजी इष्टापत्तीच मानून परमार्थ जवळ केला; पण त्यांच्या परिवाराच्या आग्रहाने केशवरावांना दुसरे लग्न करावे लागले. नाशिकचे मामलेदार वाघ यांची कन्या रुक्मिणीसमवेत केशवरावांचा दुसरा विवाह झाला. अत्यंत धर्मपरायण व सेवाभावी वृत्तीच्या रुक्मिणीबाईंना केशवरावांकडे ज्ञानेश्वरी ऐकण्यास येणारे भाविक लोक ‘आईसाहेब’ म्हणूनच मान देऊ लागले.

संतसंग हा केशवरावांच्या भाग्ययोगातच होता. ह.भ.प विष्णुपंत जोग यांच्याप्रमाणेच केशवरावांना ह.भ.प नानामहाराज साखरे यांचाही संतसंग लाभला. यामुळे त्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास अधिकच सखोल व चतुरस्र झाला. ज्ञानेश्वरी चिंतन हेच त्यांचे जीवन होते. त्यांच्या अवस्थेमुळे भाविक लोक त्यांना ‘ज्ञानेश्वरसुत’ म्हणू लागले.

केशवरावांना पंढरीच्या वारीची आवड निर्माण झाली. त्या काळी आळंदी-पंढरपूर जाणाऱ्या पालखी सोहळ्यात उच्चशिक्षित, शहरी भाविकांचा-वारकऱ्यांचा फारसा सहभाग नव्हता. केशवराव यांनी पुढाकार घेऊन स्वत:च एक दिंडी तयार केली.

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात रथापुढे चालणाऱ्या ‘शेडगे पंच मंडळ’ दिंडीबरोबर ते आपली दिंडी घेऊन आळंदी-पंढरपूर वारी करू लागले. त्यांच्या दिंडीचा पंढरपुरात श्रीमंत खासगीवाले यांच्या वाड्यात मुक्काम असे. ह.भ.प खंडूजीबाबा यांना केशवराव देशमुख यांनी आपले गुरू मानले होते. पुण्याच्या लकडी पुलाजवळील खंडूजीबाबा चौकात नदीकाठी त्यांचे समाधी मंदिर आहे. त्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय केशवराव अन्नग्रहण करीत नसत. हा त्यांचा नित्यनेम अखेरपर्यंत चालू होता. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांसमवेत केशवराव यांनी पंढरीच्या अनेक वाऱ्या केल्या. गुलाबरावांचे केशवरावांच्या जीवनात एक विषेश स्थान होते. त्यांनी केशवरावांना ‘नारद भक्तिसूत्र’ ग्रंथ भेट दिला होता व त्यावर सुंदर मराठी विवरण लिहून तो ग्रंथ केशवरावांनी गुलाब महाराजांना अर्पण केलेला होता.

खरे तर, घराण्याची थोरवी, उच्च-शिक्षण यांवर केशवराव मोठे सरकारी अधिकारी होऊन सुखासीन आयुष्य जगू शकले असते; पण त्यांनी कीर्तनकार, प्रवचनकार होण्याचा, जन-प्रबोधनाचा व आत्मकल्याणाचा मार्ग निवडला.

प्रेय आणि श्रेय यांचा विवेक प्रारंभापासूनच केशवरावांच्या ठायी होता. भक्ति-प्रबोधनाचा मार्ग स्वीकारल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी अनेक छोटेमोठे उद्योग-व्यवसाय करावे लागले; पण ते कष्ट त्यांनी आनंदाने उपसले. ‘स्वकष्टार्जित मिळवावा ग्रसु आपुला’ ही त्यांची वृत्ती होती.

केशवरावांंनी स्वदेशी चाकू, कात्र्या, बटणे निर्माण करण्याचा व विक्रीचा व्यवसाय केला. एक पिठाची गिरणीही चालविली. खाली गिरणी आणि माडीवर केशवरावांचे ज्ञानेश्वरी चिंतन-निरूपण चाले.

१९२० मध्ये थोर निरूपणकार विष्णुपंत जोग यांचे निर्वाण झाल्यावर केशवरावांनी नित्य प्रवचन सेवेचे व्रत, त्याच ठिकाणी नित्य प्रवचन करीत सुमारे २२ वर्षे निष्ठेने चालविले. १९४२ साली श्री गुरू ह.भ.प खंडूजीबाबा समाधी मंदिरात रामनवमीनिमित्त केशवरावांचे शेवटचे कीर्तन झाले. त्यानंतर केशवरावांची प्रकृती ढासळली आणि ते ज्ञानेश्वर चरणी लीन झाले. पुण्यात ओंकारेश्वर जवळील श्री काळेबुवा समाधीशेजारीच केशवरावांची समाधी आहे.

  — विद्याधर ताठे

देशमुख, केशव रघुनाथ