Skip to main content
x

कुलकर्णी, शकुंतला रवी

चित्रकार

कुंतला रवी कुळकर्णी (पूर्वाश्रमीच्या शकुंतला मुर्डेश्‍वर) यांचा जन्म धारवाड येथे एका सुशिक्षित, सुसंस्कृत व कलासक्त कुटुंबात झाला. वडील मारुतीराय दत्तात्रेय मुर्डेश्‍वर, गोदीमध्ये (नेव्हल डॉक) व्यवस्थापक होते. आई शालिनी रागदारी संगीत शिकल्या होत्या, शिवाय चित्रकला, शिवणकला (पॅचवर्क) आदी कलाकौशल्याचा छंदही त्यांनी जोपासला होता. आईमुळे घरात संगीताचे वातावरण होते. भगिनी चित्रा यांनी रंगभूमी-चित्रपट हे क्षेत्र निवडले होते, तर अनुराधा या नृत्यप्रवीण होत्या. शकुंतला यांचाही रंगभूमीशी संबंध होता. या सर्व वातावरणाचा त्यांच्या कलाकार म्हणून घडण्यावर व आविष्कारावर परिणाम झाला. सुप्रसिद्ध चित्रकार आरा हे त्यांचे कुटुंबमित्र होते.

मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९७२ साली शकुंतला कुळकर्णी यांनी पेंटिंगचा डिप्लोमा घेतला. त्यानंतर त्यांनी एक वर्ष ‘भित्तिचित्र’ या विषयाचे शिक्षणही घेतले. बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी मुद्राचित्रण आणि पेंटिंग यांकरिता असलेली दोन वर्षांची (१९७५-७७) शिष्यवृत्ती मिळवली. चित्रकार शंकर पळशीकर व अकबर पदमसी हे त्यांचे मुंबईतील मार्गदर्शक होते, तर शांतिनिकेतनमध्ये त्यांना सोमनाथ होर यांचे मार्गदर्शन लाभले.

शकुंतला कुळकर्णी यांनी १९७२ साली जहांगीरमध्ये एका समूह प्रदर्शनातून आपली चित्रे प्रदर्शित केली. त्यांचे पहिले एकल प्रदर्शन १९७८ साली झाले.  भारतातील आणि परदेशातील विविध समूह प्रदर्शनांतून त्यांनी सहभाग घेतला आहे. लंडन येथील ब्रेवरी आर्ट सेंटरची निवासी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती, तसेच अनेक कार्यशाळांतही त्यांनी सहभाग घेतला होता.

शकुंतला कुळकर्णींचा चित्रकलेतील प्रवास हा अमूर्त चित्रशैलीपासून सुरू होऊन व्हिडिओ इन्स्टॉलेशनपर्यंत झाला आहे. सुरुवातीला अमेरिकन चित्रकारांच्या अमूर्तशैलीचा त्यांच्यावर पगडा होता. शांतिनिकेतनमध्ये जाऊन आल्यावर त्यांना रेखाटनात विशेष रस निर्माण झाला. याच दरम्यान त्यांना प्रभाकर बरवे यांचा सहवास  लाभला. आसपास वावरणारी दैनंदिन जीवनातील माणसे, वृद्ध जोडपे, घरातील नोकरचाकर, निवृत्त माणसे असे सगळे भावना हरवून बसलेले लोक हा त्यांचा सुरुवातीचा विषय होता. त्यानंतर दैनंदिन जीवनाबरोबरच आजूबाजूचे वातावरण हा विषय घेऊन त्यांनी जलरंगात काम केले.

‘बियाँड प्रोसेनिअम’ हे १९९४ सालचे प्रदर्शन शकुंतला कुळकर्णींच्या कलाकारकिर्दीतील महत्त्वाचे म्हणता येईल. यानंतरचे त्यांचे आविष्कार द्विमित चित्रापुरते न राहता, वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करीत झालेले दिसतात. ‘बियाँड प्रोसेनिअम’मध्ये त्यांनी स्वत:चा रंगमंचीय अनुभव आणि द्विमित चित्र यांची सांगड घालत आविष्कार केला. हा एक सहयोगी प्रकल्प   (कोलॅबोरेटिव्ह प्रॉजेक्ट) होता. चित्रांची रंगमंचावरील नेपथ्यासारखी उभारणी, त्याबरोबर कवी, संगीतकार, लेखक, नृत्यकार यांसारख्या वेगळ्या कलाशिस्तीतील लोकांचे प्रतिसादात्मक आविष्करणही या प्रदर्शनातून झाले.

शकुंतला कुळकर्णींच्या प्रदर्शनमालिकेतून मानवी आकृतीचे स्थान महत्त्वपूर्ण होतेच. त्यातूनही पुढे ‘स्त्री’ या घटकावर त्यांचा अधिक भर राहिला. स्त्रीची मानसिकता, तिचे विश्‍व, पुरुषप्रधान व्यवस्थेतील तिचे स्थान, तिचा आंतर-बाह्य शारीरिक, मानसिक झगडा, समाजाचा घटक, या नात्याने स्त्रीचे बलस्थान इत्यादींचा आविष्कार त्यांनी आपल्या प्रदर्शनांतून रेखाटन, व्हिडिओ इन्स्टॉलेशन, कट-आउट्स आदी माध्यमतंत्रांचा वापर करून, तसेच काही रूपकात्मक कल्पना वापरून केलेला दिसतो.

‘कॅरिएटेड - ए व्ह्यू पॉइंट’मधील मांडणी ही ‘स्त्री ही भारवाहिका, समाजाचा तोल सावरणारी सशक्त स्त्री आहे, ती स्वतंत्र आहे, तसेच ती समाजाची आधारस्तंभही आहे, या आशयातून झाली आहे. ‘गोधडी-रूपबंध-भावबंध’ या प्रदर्शनातून पारंपरिक भावबंध व बालपणीच्या उबदार आठवणींच्या स्मरणरंजनात्मक व रूपाचा आधार घेऊन अभिव्यक्ती केलेली दिसते. कला आणि कारागिरीच्या एकत्र रूपाबरोबरच सामाजिक व कौटुंबिक बांधीलकीचे भान, पारंपरिकता, आधुनिकता, प्रतिकात्मकता अशा अनेक अर्थच्छटा सूचित करणारी ही अभिव्यक्ती आहे.

‘अ‍ॅनॉनिमसली युवर्स’, ‘रिड्युस्ड स्पेसेस’, ‘आजीच्या गोष्टी’ आणि ‘अ‍ॅण्ड व्हेन शी रोअर्ड दि युनिव्हर्स केक्ड’ यांत त्यांनी फिल्म, व्हिडिओ रेखाचित्रे, पेंटिंग अशी विविध माध्यमे हाताळली आहेत. ‘अ‍ॅनॉनिमसली युवर्स’ यातून बंद अवकाशाबद्दल वाटणारी भीती आणि अस्वस्थता फिल्ममधून दाखविली आहे. मनामध्ये प्रचंड भीती असलेली, कशातून तरी सुटका करून घेण्यासाठी अरुंद अशा चिंचोळ्या रस्त्यातून सारखी पळत जाणारी तरुणी त्यांनी इथे चित्रित केली आहे. ‘रिड्युस्ड स्पेसेस’मध्ये ‘ताई-ची’ या योग- व्यायाम पद्धतीचा वा नृत्याचा वापर करून स्त्री स्वत:च्या अवकाशातही मुक्तपणे जगू शकते, तिचा अवकाश व्यापक आहे, असा काहीसा आशय सांगण्याचा प्रयत्न आहे; तर आजीच्या गोष्टींमध्ये वृद्धत्वाकडे झुकलेल्या, कौटुंबिक जबाबदारी हीच महत्त्वाची मानणार्‍या स्त्रियांना बोलते केले आहे.

‘अ‍ॅण्ड व्हेन शी रोअर्ड दि युनिव्हर्स केक्ड’ या २००७ मधील त्यांच्या प्रदर्शनात रेखाचित्रण-व्हिडिओ इन्स्टॉलेशन, तसेच छोटी, अ‍ॅक्रिलिकमधील काचचित्रे यांचा समावेश होता. ‘स्त्री’ हाच महत्त्वाचा घटक आणि तिचे काहीसे रौद्र व आक्रमक रूप, स्त्रीच्या स्वत:च्या शरीरात आणि शरीराबाहेर चालणारी लढाई, अदृश्य अशा वाईट शक्तींशी झगडा यात दाखविला आहे.

‘इट इज जस्ट ए गेम’ या व्हिडिओ मालिकेत लहानपणी खेळलेल्या कबड्डी, रस्सीखेच, आंधळी कोशिंबीर यांच्या रूपकात्मक वापरातून पुरुष-स्त्री भेदाचे समाजातील असंतुलन दाखविण्याचा प्रयत्न दिसून येतो. शकुंतला कुळकर्णी यांची स्त्री-रेखाटने थोडी विरूपीकरणाकडे झुकलेली असतात. काहीशी       ओबडधोबड, पण भक्कम व ठसठशीत असतात. काहीशा शिल्पसदृश जाणवणार्‍या रेषा ठोस असतात. स्त्रिया या उपभोग्य वस्तूसारख्या दिसणार नाहीत, तसेच इंद्रियोद्दीपक संवेदना जागृत होऊ न देता तिच्या ठायी असलेला निग्रह व ठामपणा दिसावा हा त्यांच्या रेखाटनाचा हेतू असतो. स्त्रीच्या आदिम प्रतिमेचे रूप त्यातून दिसते.

कृष्णधवल रेखाटनापासून ते व्हिडिओ इन्स्टॉलेशनपर्यंतचा प्रवास अतिशय संवेदनक्षमतेने व जिद्दीने करणारी समकालीन ‘स्त्री-वादी’ चित्रकार, असे त्यांचे वर्णन करता येईल.

- माधव इमारते