Skip to main content
x

सहस्रबुद्धे, गणेश दत्तात्रय

दासगणू महाराज

सहस्रबुद्धे, गणेश दत्तात्रेय

संतकवी, संतचरित्रकार, कीर्तनकार

 ६ जानेवारी १८६८ २५ नोव्हेंबर १९६२

आधुनिक महिपती म्हणून मराठी सारस्वतामध्ये ज्यांचा मोठ्या आदराने उल्लेख केला जातो, त्या संतकवी दासगणू महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर गावी आजोळी, दाभोळकर यांच्या घरात, पौष शुद्ध एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयासमयी झाला. त्यांचे नारायणनाव ठेवून बारसे करण्यात आले; पण आजोबांनी त्यांचे नाव गणेशठेवले व पुढे तेच नाव सर्वत्र झाले.

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे तथा दासगणू महाराजांच्या आईचे नाव सई ऊर्फ सावित्री होते. दासगणूंची बुद्धी लहानपणापासूनच तल्लख होती; पण त्यांना शालेय शिक्षणाची गोडी वाटत नव्हती. वयाच्या सोळाव्या वर्षी ते इंग्रजी इयत्ता तिसरीतच होते. अखेर वयाच्या विसाव्या वर्षी इंग्रजी चौथी पूर्ण करून त्यांनी शिक्षणास रामराम केला. वडीलधार्यांनी त्यांना नोकरीसाठी बडोद्यास मावशीकडे (श्री. बळवंत गोडबोले) पाठविले; पण केवळ नऊ महिन्यांतच ते नोकरीला कंटाळले व नोकरी सोडून नगरला (कोडत गल्लीत सहस्रबुद्धे वाडा होता) परत आले. दासगणू यांचे १८९१ साली बोरले आष्ट्याचे जहागीरदार नारायणराव रानडे यांच्या कन्येशी लग्न झाले. हा लग्नसोहळा पुण्यात जहागिरदारी थाटाने पार पडला. दासगणूंचे समाजाच्या तळागाळातील, तमाशाची आवड असणारे मित्र, नोकरी न करता दिवसरात्र भटकंती यांमुळे घरातील वडीलधार्यांशी तीव्र मतभेद झाले व दासगणूंनी घराचा त्याग केला.

चुलते मामलेदार असल्यामुळे दासगणूंना कोठेही उत्तम नोकरी मिळणे शक्य होते; पण यापुढे मी कोणाचेही नाव न सांगता स्वत:च्या हिमतीवरच जगेन व नाव कमवून दाखवेनया निर्धारानेच त्यांनी घर सोडले.

पुढे नगरचे पोलीस अधिकारी श्री. एम. केनेडी यांची दासगणूंशी भेट झाली व त्यांनी दासगणूंना पोलीस खात्यात भरती करून घेतले. त्या काळी ब्रिटिश लोक उच्चवर्णीय प्रतिष्ठितांना नोकरीत थेट भरती करून घेत होते. दासगणूंना पोलिसांचे ७२७ क्रमांकाचे बक्कल मिळाले. दासगणूंनी एकूण अकरा वर्षे पोलीस हवालदार म्हणून नोकरी केली व थोर संत, शिर्डीचे साईबाबा यांच्या सांगण्यावरून त्यांनी ब्रिटिश चाकरीचा राजीनामा दिला. नोकरीच्या काळातील कान्ह्या भिल्लाचे प्रकरण हे दासगणूंच्या मूळच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला वेगळे वळण देणारे ठरले. पोलीस खात्यात नोकरीस असतानाच त्यांची भेट वामनशास्त्री इस्लामपूरकर या विद्वान अधिकारी, सत्पुरुषाशी झाली. या शास्त्रीजींकडून त्यांनी अनुग्रह घेतला व पूर्वाश्रमीच्या गणेश सहस्रबुद्धे यांचे नाव दासगणूझाले. दासगणूकिंवा गणूदासअशा प्रकारे हे नाव त्यांच्या सर्व काव्यांत-लेखनांत दिसून येते. वामनशास्त्री हे स्वत: रामदासी असूनही त्यांनी शिष्य दासगणूला पंढरीची वारी नित्यनेमाने करण्यास सांगितली. दासगणू मूळचे कट्टर शिवभक्त; पण गुरु- आज्ञेमुळे ते पंढरीची वारी करू लागले व कालांतराने त्यांना हरिहरा नाही भेदअशी प्रचिती आली.

गुरू वामनशास्त्र्यांनी काशीला जाऊन उर्वरित काळ गंगातीरी घालवण्याचे ठरविले तेव्हा शिष्य दासगणूला ‘‘शिर्डीचे साईबाबा व मी एकच आहोत, आता यापुढे तेच तुझे कल्याण करतील,’’ असे सांगून शिर्डीला जाण्यास सांगितले. नगरच्या कलेक्टरचे चिटणीस नानासाहेब चांदोरकर हे दासगणूंना शिर्डीच्या साईबाबांकडे घेऊन गेले आणि अशा प्रकारे पुढे दासगणू साईबाबांच्या प्रमुख शिष्यांपैकी मुख्य शिष्य बनले. साईबाबांच्या निर्वाणानंतर म्हणजे १९१८ ते १९३६-३७ पर्यंत दासगणू महाराज हेच शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष होते. या काळात होणार्या उत्सवांना थोडेच साईभक्त असत व उत्सवाचा खर्च भागविण्यासाठी दासगणू उसने पैसे आणून नंतर आपल्या कीर्तन सेवेच्या बिदागीतून फेडत असत हा इतिहास आहे. आज शिर्डीच्या साईबाबांची जी भक्ती पसरलेली दिसते, त्यामागे दासगणू महाराजांच्या प्रभावी कीर्तनाचे फार मोठे योगदान आहे. तसा स्पष्ट उल्लेख श्री साईसच्चरितातही करण्यात आलेला आहे.

श्री दासगणू यांना ९२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले होते. त्यांनी अखेरपर्यंत पारमार्थिक लेखन केले. त्यांच्या या प्रचंड लेखनामुळे व संतचरित्रांमुळे त्यांचा आधुनिक महिपतीया नावाने गौरव केला जातो. या सर्व लेखनामागे श्री साईबाबांची प्रेरणा आहे, असे त्यांनी वेळोवेळी काव्यात नमूद केलेले आहे. शिर्डी माझे पंढरपूर । साईबाबा रमावर ॥ही शिर्डीत सतत गायली जाणारी साईबाबांची आरती दासगणू यांनीच लिहिलेली आहे. दासगणू यांच्या साहित्याचे दहा खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यांमध्ये अनेक अज्ञात, अपरिचित संतांची चरित्रे, आख्यान काव्ये, अनेक ग्रंथांवरच्या टीका अशी विविधता आहे. संतकथामृत’, ‘भक्तिलीलामृत’, ‘भक्तिरसामृत’, ‘गजानन विजयहे त्यांचे ग्रंथ भाविक वर्गात विशेष लोकप्रिय आहेत.

दासगणूंच्या कीर्तनाचा प्रभाव एवढा होता, की ३०-४० हजार लोक जवळपासच्या गावांतून बैलगाड्या घेऊन येत असत. महामहोपाध्याय द.वा. पोतदार, थोर विचारवंत शि.. परांजपे यांनी असा प्रभावी कीर्तनकार आम्ही दुसरा पाहिलेला नाही,’ अशा शब्दांत दासगणूंच्या कीर्तनाचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्राचार्य अनंतराव आठवले यांनी दासगणूंचे समग्र वाङ्मय अनेक खंडांत प्रकाशित केलेले आहे. स्वामी रामकृष्ण-विवेकानंद, संत निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणेच दासगणू व प्राचार्य अ.दा. आठवलेया गुरु-शिष्याची जोडी असून शिष्याच्या कार्यकर्तृत्वाने गुरूचा महिमा वाढविणारे शिष्य व उत्तराधिकारी प्राचार्य अ.दा. आठवले यांच्या रूपाने दासगणूंना लाभले. कार्तिक वद्य १३, १९६२ साली संत ज्ञानदेव पुण्यतिथीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे संतकवी दासगणूंनी आपला देह ठेवला. पंढरपूर येथे त्यांचा दामोदर आश्रमअसून नांदेड जिल्ह्यातील गोरटे येेथे त्यांचे स्मृती मंदिर व दासगणू प्रतिष्ठाननावाची संस्था कार्यरत आहे.

                                                                                                                           — विद्याधर ताठे

संदर्भ :

.     प्रा. आठवले अ.दा.; ‘दासगणू चरित्र व काव्य विवेचन’.

.     जोशी, ..; संपादक : दासगणू दर्शन’.

.     जोशी, प्र..; ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’.

.     दाभोळकर; ‘श्रीसाईसच्चरित’.

संदर्भ :
१.     प्रा. आठवले अ.दा.; ‘दासगणू चरित्र व काव्य विवेचन’. २.     जोशी, म.द.; संपादक : ‘दासगणू दर्शन’. ३.     जोशी, प्र.न.; ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’. ४.     दाभोळकर; ‘श्रीसाईसच्चरित’.