Skip to main content
x

चिटणीस, लीला गजानन

     लीला गजानन चिटणीस यांचा जन्म कर्नाटकातल्या धारवाड येथे झाला. लीला नगरकर हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होय. त्यांचे वडील शिक्षक होते. नंतरच्या काळात - म्हणजे १९१९-२० सालात ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. लीला यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ होते. प्रॉक्टर रोडवर इमॅन्युएल गर्ल्स स्कूल या स्कॉटिश मिशनच्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.

      महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांनी डॉ. गजानन यशवंत चिटणीस यांच्याशी विवाह केला. डॉ. चिटणीस ध्येयवादी, समाजसुधारक होते. ते प्रार्थना समाजच्या सुबोधपत्रिकेचे काम पाहत. तत्कालीन राजकीय प्रश्‍न, समाजवाद-मार्क्सवाद या विषयात त्यांना रस होता. विवाहानंतर लीलाही त्यांच्या सामाजिक कार्यात रस घेऊ लागल्या. त्यांनी बी.ए. पदवीपर्यंत शिक्षण पूर्णही केले होते. संसाराची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्या मारवाडी गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करू लागल्या.

     याच सुमारास नाट्यमन्वंतर संस्थेच्या ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचे प्रयोग धूमधडाक्यात सुरू होते. डॉ. चिटणीस या संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक होते. त्यांच्या ओळखीने लीला यांनी नाट्यमन्वंतर संस्थेच्या ‘आंधळ्यांची शाळा’ नाटकात काम करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर ‘उसना नवरा’, ‘लपंडाव’ याही नाटकात त्या काम करू लागल्या.

     १९३५ साली आदर्श चित्र संस्थेच्या ‘धुँवाधार’ या बोलपटात अभिनय करण्यासाठी त्यांना बोलावले गेले. हाच त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘हंस चित्र’च्या ‘छाया’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. ‘छाया’ची कथा वि.स.खांडेकर यांची होती. रत्नप्रभा, मा. विनायक, बाबूराव पेंढारकर, दादा साळवी व इंदिरा वाडकर या कलाकारांनी यात भूमिका केल्या होत्या. या चित्रपटानंतर त्या मुंबईला स्थायिक झाल्या आणि प्रभात फिल्म कंपनीच्या ‘वहाँ’ या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली. नंतर दर्याना प्रॉडक्शन या चित्रपटसंस्थेशी महिना ८०० रुपये वेतनावर वर्षभर त्यांचा करार झाला. या संस्थेच्या ‘जंटलमन डाकू’, ‘इन्साफ’ या चित्रपटांत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. या चित्रपटांच्या दरम्यान ‘गुली’ नामक चित्रपट वितरकाबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला.

     नंतर मिनर्व्हा मुव्हिटोनच्या सोहराब मोदी यांनी त्यांना ‘जेलर’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटातल्या भूमिकेनंतरच चित्रपट व्यवसायात लीला चिटणीस यांची दखल घेतली गेली. पुढे रणजित फिल्म कंपनीच्या ‘संत तुलसीदास’ चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. विष्णुपंत पागनीस नायकाच्या भूमिकेत काम करणार होते. नंतर त्यांचा बॉम्बे टॉकीजशी तीन वर्षांचा करार झाला आणि ‘कंगन’, ‘बंधन’, ‘झूला’ या चित्रपटांत त्यांनी काम केले. नायक होते अशोककुमार. ‘कंगन’ चित्रपटाला यश मिळाल्यामुळे त्यांना ‘आजाद’ हा चित्रपट मिळाला. तसेच ‘हंस’ चित्रच्या ‘अर्धांगी’, ‘दिल की रानी’ या मा. विनायक दिग्दर्शित चित्रपटांत त्यांनी भूमिका केली. मधल्या काळात त्यांनी ‘कंचन’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटाचे कथानकही लिहिले. त्यांनी चित्रा प्रॉडक्शन ही स्वत:ची संस्था सुरू केली होती. ‘कंचन’नंतर या संस्थेद्वारे त्यांनी ‘किसीसे ना कहना’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘शहीद’ या फिल्मिस्तानच्या चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम दिलीपकुमारच्या आईची भूमिका केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटात त्यांनी चरित्रभूमिका केल्या. १९५१ साली बिमल रॉय दिग्दर्शित ‘माँ’ या चित्रपटातली त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली. दरम्यान १९४१ साली ‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या   भारतीय अभिनेत्री होत्या.

     लीला चिटणीस यांनी दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, सुनील दत्त, संजीवकुमार, राजेश खन्ना, राजेंद्रकुमार या त्या काळी गाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केले. १९५५ साली ‘आज की बात’ या हिंदी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शनही केले. ‘एक होता राजा’ (१९५२), ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६१), ‘आधी कळस मग पाया’ (१९६१), ‘पाहू रे किती वाट’ (१९६३) या मराठी चित्रपटांबरोबर ‘वक्त’, ‘जिंदगी’, ‘गाईड’, ‘प्रिन्स’, ‘गुनाहोंके देवता’, ‘इन्तकाम’, ‘दुल्हन एक रातकी’, ‘औरत’, ‘मुहब्बत इसको कहते है’, ‘दोस्ती’, ‘पूजा के फूल’, ‘काला बाजार’, ‘मनमौजी’, ‘असली नकली’, ‘पलकोंकी छावमें’, ‘जीवनमृत्यू’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतही काम केले.

     १९८० साली प्रदर्शित झालेला ‘रामू तो है दिवाना’ हा लीला चिटणीस यांचा शेवटचा चित्रपट. पुढे त्यांनी अमेरिकेत काही काळ स्थलांतर केले आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून पाळणाघर चालवू लागल्या. पण तिथे त्या फार काळ रमल्या नाहीत. पुन्हा भारतात परतल्यावर १९८१ साली त्यांनी ‘चंदेरी दुनियेत’ हे आत्मवृत्त लिहिले. त्याची बरीच चर्चा झाली.

     पण चित्रपटात भूमिका मिळणे या काळात बंद झाल्याने त्या भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाल्या आणि तेथेच त्यांचे निधन झाले.

- स्नेहा अवसरीकर

चिटणीस, लीला गजानन