Skip to main content
x

सावंत, मोहन वासुदेव

     कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेल्या भीरतंडे या खेडेगावात मोहन सावंत यांचा जन्म झाला. घरात अठराविश्‍व दारिद्य्र, वडील व्यसनी अशा परिस्थितीत आई सरस्वतीने मोलमजुरी करुन त्यांचे एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राजापूर, कणकवली येथे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक व पुढे पदवीधर शिक्षक म्हणून २० वर्षे काम केले. नोकरी करत असतानाच त्यांनी एम.ए. एम.एड्. पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणूनही काम पाहिले.

     शिक्षक ते शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी हा प्रवास करीत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले. प्रयोग केले व ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा कसा सुधारेल यासाठी प्रयत्न केला. त्यात शैक्षणिक व मूल्यशिक्षण पथक, आदर्श पाठ लेखन व अध्यापन, शाळा समूह योजना, शैक्षणिक शिबिरे व नवी दिशा, ग्रामवाचनालय, जादा तासांचे नियोजन, बोलके व्हरांडे, स्वाध्याय निर्मिती व व्यापार असे अनेक उपक्रम राबविले, ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा  प्रचंड प्रतिसाद लाभला व या उपक्रमांमुळे शाळांमध्ये चैतन्य निर्माण झाले. याचबरोबर विविध राज्यव्यापी प्राथमिक शिक्षण भरीव प्रशिक्षण कार्यक्रमांत राज्य विभाग जिल्हा स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. आणि या कामात त्यांनी उत्कृष्ट नियोजन व कार्यवाही केल्याबद्दल त्यांचा संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गौरव केला आहे.

     याबरोबर त्यांनी प्रशासक म्हणूनही शाळेतील शिक्षकांची सेवा पुस्तके अद्ययावत व बायंडिंग करून त्याची एक प्रत प्रत्येक शिक्षकाकडे दिली. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या देय रकमांचा पाठपुरावा करुन व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन अनेक प्रकरणे निकालात काढली आहेत. नवीन नवीन गोष्टी शिकायच्या व त्या शिकवायच्या हा त्यांचा छंद. यातूनच त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रस्तरीय प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षण घेतले आहे. त्याबरोबरच प्रौढ निरंतर शिक्षण, श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन, प्राथमिक शाळांना प्रयोग व अन्य साहित्याची उपलब्धता, साक्षरता अभियान, अल्पबचत, अभियान, त्याचबरोबर कुंभवडे येथे ग्रामविकास मंडळातर्फे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी गौरव पुरस्काराची व शिष्यवृत्तीची प्रथा पाडून दिली.

     मोहन सावंतांना इतिहास संशोधनाची आवड आहे. गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर अनेक गड-किल्ल्यांची भ्रमंती करून त्याच्या संशोधन कार्यात मदत केली आहे. तसेच पुराण वस्तु संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांच्या सोबत पुराण वस्तु, संशोधनाचे कार्य केले आहे. तसेच ऐतिहासिक व पुराणवस्तूंची प्रदर्शने भरवून व त्यावरील व्याख्याने देऊन समाजाला सामाजिक व राष्ट्रीय परंपरांचे स्मरण करून दिले आहे. याचबरोबर साने गुरूजी कथामालेतून ‘शाळा तेथे कथामाला’ उपक्रम राबविण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे.

     आजही राष्ट्रपुरुषांचे चरित्र, ऐतिहासिक परंपरा, संस्कृती आपल्या व्याख्यानातून संपूर्ण समाजापर्यंत पोहचविण्याचे त्यांचे काम व्रत घेतल्याप्रमाणे अविरत चालू आहे.

- विवेक कुलकर्णी 

सावंत, मोहन वासुदेव