साळुंखे, गोविंद ज्ञानोजी
गोविंद ज्ञानोजीराव तथा बापूजी साळुंखे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर गावातील सरदार घराण्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रामापूरमध्ये झाले. हे शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे माध्यमिक शिक्षण इस्लामपूरला झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूरला पूर्ण केले. पदवीसाठी इतिहास हा त्यांचा एक विषय असल्याने प्रा. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या सांगण्यावरून बापूजी सोंडूर येथील घोरपडे राजघराण्याचा इतिहास लिहिण्यासाठी सोंडूरला गेले व काही काळ त्यांनी तेथेच राजगुरू म्हणून काम केले. १९४२ च्या चळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून दिली. काँग्रेसची विद्यार्थी संघटना, सेवादल यांचे कार्य केले. याच काळात कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या शिक्षणकार्यास मदत म्हणून विद्यार्थी काँग्रेसने लाख रुपयांची थैली देण्याचे ठरविले. या समितीचे बापूजी अध्यक्ष होते.
१९४८ ते १९५४ या काळात बापूजींनी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक-मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. ते संस्थेचे आजीव सेवक झाले. पण तात्त्विक मतभेद झाल्याने त्यांनी संस्था सोडली व मोजके सहकारी, विद्यार्थी यांच्या सहकार्याने ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था’ स्थापन केली. सामान्य समाजात सुसंस्कारी शिक्षण प्रसारातून समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या मुख्य उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी ६ जून १९५५ रोजी संस्थेची पहिली पाच माध्यमिक विद्यालये कोल्हापूर, तासगाव (जिल्हा सांगली), चाफळ, तारळे, उंडाळे (जिल्हा सातारा) या ठिकाणी सुरू केली. कराड येथे स्त्रियांचे अध्यापक विद्यालय, कोल्हापूर व चाफळ येथे वसतिगृहे काढली.
ग्रामीण भागातील मुले महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी संस्थेचे पहिले महाविद्यालय मराठवाड्यात उस्मानाबाद येथे सुरू केले. त्यानंतर मिरज, सातारा, तळमावले अशी महाविद्यालये स्थापन केली. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालय महाराष्ट्रात गुणवत्तेत अव्वल दर्जाचे महाविद्यालय ठरले आहे. उस्मानाबाद, कराड, तासगाव येथे शिक्षणशास्त्र महाविद्यालये व काही अध्यापक विद्यालये सुरू केली.
हे सर्व करीत असताना खेडोपाडी हिंडून बापूजींनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांना उद्युक्त केले. अनेक शाळा ग्रामस्थांच्या, समाजाच्या मदतीने उभ्या केल्या. नि:स्पृहपणे कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण केले. संस्थेचा विस्तार करीत असताना बापूजी अनेक अडचणींना सामोरे जात होते.
बापूजींच्या हयातीत संस्थेचा रौप्यमहोत्सव साजरा होईपर्यंत संस्थेचा व्याप अकरा जिल्ह्यात पसरला होता. दहा महाविद्यालये व शिक्षणशास्त्र महाविद्यालये, आठ अध्यापक विद्यालये, अठ्ठावीस उच्च माध्यमिक शाळा, एकशे चाळीस माध्यमिक विद्यामंदिरे, सराव शाळा, विस्तार सेवा केंद्रे, मुलांची बावीस व मुलींची तीन वसतिगृहे एवढी संस्कृती केंद्रे कार्यरत होती. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे बापूजींची राहणी साधी, आचरण शुद्ध होते. संस्थेचे संस्थापक व नंतर कार्याध्यक्ष म्हणून काम करीत असतानाही त्यांनी अखेरपर्यंत स्वत: बी. ए. बी. एड. शिक्षकाचे वेतन घेतले. स्वत:चे शैक्षणिक तत्त्वज्ञान स्पष्ट करणारी व सर्वधर्मसमभाव शिकविणारी संस्थेची प्रार्थना बापूजींनी रचली, तिला चालही लावली. आज ही प्रार्थना संस्थेच्या सर्व संस्कृतीकेंद्रांतून म्हटली जाते.
बापूजींना समाजाकडून, शासनाकडून अनेक सन्मान मिळाले. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचे मानपत्र दिले. महाराष्ट्र शासनाचा ‘दलित मित्र पुरस्कार’ त्यांना मिळाला. १९८६ मध्ये शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. १९८० मध्ये सर्व संस्था सेवकांनी त्यांना षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त पाच लाख रुपयांची थैली अर्पण केली. बापूजींनी त्यात स्वत:चे एकशे एक रुपये घालून ती संस्थेच्या कार्यासाठी दिली.
बापूजी शिक्षक होते, कवी होते, लेखक होते, स्वातंत्र्यसैनिक होते, संत साहित्याचे अभ्यासक होते, भगवद्गीतेचे उपासक होते, स्थितप्रज्ञ कर्मयोगी होते, मानवतेचे पुजारी होते, खऱ्या अर्थाने आधुनिक काळातील शिक्षण महर्षी होते. आज त्यांच्या संस्थेची तीनशे त्रेपन्न केंद्रे आहेत. या संस्कृती केंद्रांच्या माध्यमातून समाजातील नाकारल्या गेलेल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण नेण्याचे ह्या शिक्षणमहर्षींचे स्वप्न संस्था साकार करीत आहे.