फुलंब्रीकर, कृष्णराव गणेश
एक ढंगदार ख्यालिये, रंगदेवता प्रसन्न असणारे संगीतनट, सिद्धहस्त नाट्य-चित्र-संगीतकार, प्रतिभावान बंदिशकार म्हणून महाराष्ट्राच्या जनमनावर पाच दशके अधिराज्य गाजवणारे कृष्णा मास्तर म्हणजे ‘संगीतकलानिधी’ कृष्णराव गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म औरंगाबादजवळच्या फुलंब्री गावातील पाठक या भिक्षुक घराण्यातील गणेशपंत व मथुराबाई यांच्या पोटी, पुण्याजवळील देवाची आळंदी येथे झाला.
नाट्यकलाप्रवर्तक मंडळीच्या ‘संत सखू’ या नाटकातील विठ्ठलाच्या भूमिकेत ‘भक्तजन सदा’ या गाण्याला ‘वन्स मोअर’ मिळवत कृष्णरावांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांनी कंपनीतील सवाई गंधर्वांकडे संगीताचे जुजबी शिक्षण घेतले. त्यांना १९०९ साली न.चिं. केळकर यांनी ‘मास्टर कृष्णा’ अशी पदवी दिली व पुढे याच नावाने लोक त्यांना ओळखू लागले.
फुलंब्रीकरांचे भास्करबुवा बखले यांच्याकडे १९११ सालापासून संगीत शिक्षण सुरू झाले. भास्करबुवांनी त्यांना मैफली गाण्याची तालीम दिली. मास्तरांचा आवाज मुळात हलका, पातळ, पण चपळ असल्याने भास्करबुवांनी त्यांच्यावर मर्दानी, जोरदार, घरंदाज गायकीचे संस्कार केले. ऐन उमेदीच्या काळात मास्तर हुबेहूब भास्करबुवांसारखे गात. वझेबुवा, अल्लादिया खाँ, फैयाझ खाँ अशा अनेक ज्येष्ठ गवयांनी त्यांचे गायन वाखाणले. भास्करबुवांची ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तीन घराण्यांचा संगम असणारी गायकी मास्तरांनी पुढे चालवली. अर्थात स्वतःचा गळा व बुद्धी यांनुसार ते आपली खास मुद्रा असणारी गायकी मांडत. त्यांच्याकडे आम व अनवट रागांतील अनेक उत्तमोत्तम चिजांचा खजिना होता.
ख्यालगायकीबरोबर ठुमरीसाठीही मास्तर प्रसिद्ध होते. त्यांची ठुमरी ही ख्यालीठुमरी वा मध्यमग्राम ठुमरी म्हणून ओळखली जायची. भैरवीतील अनेक सुंदर रचनांच्या गायनामुळे ‘भैरवीचे बादशाह’ म्हणूनही त्यांची ख्याती होती. पारंपरिक अभंगगायनाला रागदारीची चौकट देऊन भक्तिसंगीताचा वेगळा ढंग त्यांनी निर्माण केला. त्याचे पुढच्या पिढीतील संगीतकार व गायकांनी अनुकरण केले.
धुळ्याला चौदाव्या वर्षी त्यांची पहिली जाहीर मैफल झाली. भास्करबुवांच्या पश्चात जालंधरचा हरवल्लभ मेळा, कराची-लाहोरपासून ब्राह्मणसभेतील मैफलींचा वारसा मास्तरांनी सांभाळला. त्यांनी १९२२ ते १९६८ असा प्रदीर्घ काळ मुंबईतील ब्राह्मणसभेच्या गणेशोत्सवातील मैफलींत लोकांना भरभरून गाणे ऐकवले. अनेक संस्थानिक, राजेरईस, राजकीय नेत्यांनी त्यांना मानाने निमंत्रित करून, वेळोवेळी त्यांच्या मैफली केल्या.
मास्तरांचा स्वभाव त्यांच्याच एका बंदिशीतल्याप्रमाणे ‘मेरो मन अत उल्हासा’ असा मुळातच खेळकर व हसरा होता. त्यांची मैफलही सदाबहार असे. त्या काळात ‘हमखास रंग भरणारे मैफलीचे बादशाह’ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या गाण्यात विद्वान गवयांपासून माळकरी-मळेकरी वर्गाला झुलवायला लावणारी विद्वत्ता व रंजकता होती.
बालपणी केलेल्या ‘संत सखू’ या नाटकातील विठ्ठलाच्या भूमिकेनंतर मास्तरांनी १९१५ मध्ये बडोदा येथे शारदेच्या भूमिकेद्वारे रंगभूमीवर पुनश्च पाऊल टाकले. त्यांनी १९१५ ते १९३३ पर्यंत बालगंधर्वांच्या ‘गंधर्व नाटक मंडळी’त सोळा संगीत नाटकांतून भूमिका केल्या. आपल्या रंगगायनाने त्यांनी रंजन केलेच; पण ‘आशानिराशा’मधील ‘वेडी लंका’, ‘एकच प्याला’तील शरद, ‘मेनका’तील बालमूर्ती, ‘सौभद्रा’तील नारद या भूमिकांतील अभिनयानेही ठसा उमटवला.
भास्करबुवांच्या सांगण्यावरून ‘नयनाला विषय’ (स्वयंवर) व ‘विराट ज्ञानी’ (द्रौपदी) या पदांच्या चालीही त्यांनी लावल्या. त्यांनी ‘गंधर्व संगीत नाटक मंडळी’च्या सात नाटकांतील मुख्यत्वे बालगंधर्वांच्या तोंडच्या पदांना संगीतकार म्हणून चाली दिल्या व त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या. रागदारीतील अधिकार व नाट्यसंगीतातील प्रतिभा या दोन्हींमुळे बालगंधर्वही या आपल्या गुरुबंधूस आदराने ‘बुवासाहेबांनंतर तुम्हीच माझे गुरू’ असे म्हणत. ‘तिमिरपटल भार’ (नंदकुमार, १९२५), ‘मजला घडावी’ (सावित्री, १९३३), ‘भूषण संसारा’, ‘अजि पुरवा ही हौस’ (मेनका, १९२६), ‘पतितपावना भेट नच’ (विधिलिखित, १९२८), ‘धाव घाली विठू’, ‘अवघाची संसार’, ‘नुरले मानस’, ‘देवा धरिले चरण’, ‘पतित तू पावना’, ‘जोहार मायबाप’, ‘अगा वैकुंठीच्या राया’ (कान्होपात्रा, १९३१), ‘गमते सदा’, ‘धावत येई सख्या’, ‘तुम बिन मेरी’ (अमृतसिद्धी, १९३३), ‘नाचत रसा रसिका’, ‘तात करी’, ‘दिलरुबा हा या जिवाचा’ (आशानिराशा, १९३३) ही बालगंधर्वांनी गायलेली, मास्तरांनी संगीतबद्ध केलेली काही प्रसिद्ध नाट्यपदे होती.
मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनच्या ‘कुलवधू’ (१९४२), ‘एक होता म्हातारा’ (१९४८), ‘कोणे एके काळी’ (१९५०), ‘भाग्योदय’ (१९५७) या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. जुन्या संगीत नाटकांपेक्षा ही नाटके आशय व सादरीकरण यांत भिन्न आहेत व लोकाभिरुचीही बदलली आहे हे लक्षात घेऊन त्यांनी रागदारीतच, पण पाल्हाळिक वाटणार नाहीत अशी भावगीताच्या बाजाची नाट्यगीते दिली. ‘क्षण आला’, ‘मनरमणा’, ‘बोला अमृत बोला’, ‘का रे ऐसी माया’ या स्वररचना सहज गुणगुणण्याजोग्या असल्याने फारच गाजल्या.
प्रभात फिल्म कंपनीत १९३५ साली ‘धर्मात्मा’ या चित्रपटाच्या निमित्ताने मास्तरांचा प्रवेश झाला व त्यांच्या यशाला चंदेरी झळाळी मिळाली. संगीतकार म्हणून मास्तरांनी १९३५ ते १९६२ या काळात पंधरा मराठी व हिंदी चित्रपटांना संगीत दिले व भारतभर नाव मिळवले. ‘अमरज्योती’मधील ‘सुनो सुनो बन के प्राणी’ या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेने ८०,००० असा विक्रीचा १९३६ साली उच्चांक गाठला होता. ‘प्रभात’च्या ‘धर्मात्मा’ (हिंदीसह, १९३५), ‘अमरज्योती’ (हिंदी, १९३६), ‘वहां’ (हिंदी, १९३७), ‘गोपाळकृष्ण’ (हिंदीसह, १९३८), ‘माणूस’ व ‘आदमी’ (मराठी व हिंदी, १९३९), ‘शेजारी’ व ‘पड़ोसी’ (मराठी व हिंदी, १९३९), ‘लाखारानी’ (हिंदी, १९४५) या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
नंतर अत्रे पिक्चर्ससाठी त्यांनी ‘वसंतसेना’ (हिंदीसह, १९४२), ‘राजकमल’साठी ‘भक्तीचा मळा’ (हिंदीत ‘माली’, १९४४), शिवाय ‘मेरी अमानत’ (हिंदी, १९४७), ‘संत रामदास’ (१९४९), ‘ताई तेलीण’ (१९५३), ‘कीचकवध’ (हिंदीसह, १९५९) व ‘विठू माझा लेकुरवाळा’ (१९६२) या चित्रपटांनाही संगीत दिले. ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटात फुलंब्रीकरांनी साकारलेली ‘सावता माळी’ ही मुख्य भूमिका व पदे गाजली. ‘मेरी अमानत’मध्ये त्यांनी शिक्षकाचीही भूमिका केली. बालगंधर्वांच्या ‘अमृतसिद्धी’ या नाटकाची चित्रावृत्ती १९३७ साली ‘साध्वी मीराबाई’ नावाने निघाली, त्यातही त्यांनी मूळ नाटकासाठी दिलेल्या चाली होत्याच.
‘गोपालकृष्ण’ ही तर एक संगीतमय चित्रकथाच होती. त्यातील ‘वंदित राधाबाला’, ‘भाग्यवती ही कपिला’, ‘गौळणी गे’, ‘तुझाच छकुला’, ‘उमगायाची नाही कुणा’, ‘हासत नाचत जाऊ’ ही गीते अविस्मरणीय आहेत. बालगंधर्वांपासून सुधीर फडके, मन्ना डे, महंमद रफी हे गायक आणि ज्योत्स्ना भोळे, दुर्गा खोटे, शांता आपटेंपासून लता मंगेशकर, आशा भोसले या गायिकांनी त्यांची नाट्य-चित्रगीते गायली. मास्तरांची ‘भाव तोची देव’, ‘आवडीने भावे’, ‘रोडगा वाहीन तुला’, ‘सुनो सुनो बन के प्राणी’, ‘हर गली में’, ‘कशाला उद्याची बात’, ‘दिवाळी आली’, ‘मन पापी भूला’, ‘राधिका चतुर बोले’, ‘हासत वसंत ये’, ‘लखलख चंदेरी तेजाची’, ‘श्याम बजाए’, ‘राजा पंढरीचा’, ‘विश्वाचे हे अमुचे वैभव’, ‘धुंद मधुमती रात’, ‘असा नेसून शालू’ इ. चित्रपटगीते गाजली.
एक बंदिशकार म्हणूनही मास्तरांनी कीर्ती मिळवली. त्यांच्या बंदिशी सहजस्फूर्त असत. भर मैफलीतही त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. मास्तरांच्या बंदिशींत साहित्यिक सौंदर्य अभावानेच असले, तरी रागाचे सुंदर रूप, पकड घेणारा मुखडा, लयीचा खेळकरपणा अशा गुणांमुळे त्या अत्यंत आकर्षक व गेय असत. त्यांनी अनवट व जोडरागांत बांधलेल्या बंदिशींतही अवघडलेपणा जाणवत नाही, तर ओघवतेपणा, सहजपणातले माधुर्य प्रत्ययास येते. उदा. ‘रंग रंग मुख पे’ (अडाणा), ‘चहु बरसन लागी’ (भूप), ‘काहू की रीत’ (मालकंस), ‘होरी खेलत बहार’ (पटदीप), ‘रतिया मैं जागी’ (नायकी कानडा), ‘लालन तुमबिन’ (कौशी कानडा), ‘सदा चिरंजीव रहो’ (सोहनी भटियार), ‘मधुवा पीवन’ (बसंती केदार), ‘महादेव की बानी’ (अजद हिंडोल), ‘माई री आज’ (हिंडोलबहार), इ. त्यांनी ‘तुम मत जावो मुरारी’, ‘सावरिया मत रोको’, ‘मोरा मेंदी का रंग’, ‘श्याममोहन प्यारे’ अशा ठुमर्याही रचल्या. तिलककेदार, मंगल तोडी, देवीकल्याण, शिवकल्याण, बिल्वबिभास, जौनकली असे नवे जोडरागही त्यांनी निर्माण केले.
कमीतकमी स्वरांत, पण चटकन पकड घेणारी चाल, रसाळ प्रासादिकता, सहज-सोपेपणा ही वैशिष्ट्ये फुलंब्रीकरांच्या चालींत प्रकर्षाने जाणवतात. त्यांनी स्वतःच्या नाट्य-चित्रगीतांच्या चालींवरून बांधेसूद बंदिशी केल्या! ‘नुरले मानस’ (मन में मोहन), ‘गमते सदा’ (कवन बताई), ‘प्रियकर वश’ (बन बन देखे), ‘कृष्णकन्हैया निकले’ (भाग्यवती ही कपिला), ‘दे मज देवा’ (प्रीतम सैया लागी रे), ‘मानो पूजा ये’ (वंदित राधाबाला), इ. काही नाट्य-चित्रगीते व या बंदिशीही ते आपल्या मैफलीत रंगवून पेश करत!
एक संगीतकार म्हणून मास्तरांना कोणत्या माध्यमासाठी काय स्वरूपाचे संगीत असावे याची, त्या- त्या माध्यमाच्या वैशिष्ट्यांची, सामान्यजनांच्या अभिरुचीची नेमकी समज होती. त्यांनी १९३४ पर्यंत दिलेल्या नाट्यपदांच्या चाली मुख्यतः भारदस्त रागदारीवर आधारित, तर १९४० नंतर नाट्यनिकेतनच्या नाटकांसाठीच्या चाली भावगीतसदृश आहेत. त्यांच्या चित्रपटसंगीताचा गौरव पाश्चात्त्य कलाकारांनीही केला होता.
फुलंब्रीकरांच्या अडाणा, मालकंस, बागेश्री, तोडी, हिंडोल, पूरिया, देस, जयजयवंती, तुम मत जाओ — खमाज ठुमरी, काफी होरी, इ. ध्वनिमुद्रिकाही गाजल्या. जौनपुरी व ‘मोपे डार गयो’ ही खमाज ठुमरी या गाजलेल्या ध्वनिमुद्रिकांमुळे ते लाहोर-कराची, पंजाब या ठिकाणी ‘बाजे झनन मास्टर’ आणि निजाम संस्थानात ‘पिचकारीवाले मास्टर’ म्हणून ओळखले जायचे. ‘लपविला लाल’, ‘हजरत सलाम घ्यावा’, ‘सनातन नाद हा’, ‘कुसुमाविधी चारुकांत’, ‘तेजा नभीच्या’, ‘ताराया दीन अबलांना’, ‘मानभंग दाही’ इ. त्यांनी गायलेली व गाजलेली नाट्यगीते; ‘परब्रह्म निष्काम’, ‘तुझिये निढळी’, ‘कृष्ण माझी माता’, ‘जो पिया जोडूं’, ‘म्हारा रघुवीर रे’, ‘विदुर घर जावे’ अशा त्यांच्या भक्तिरचना अत्यंत लोकप्रिय होत्या.
‘रागसंग्रह’च्या सात भागांतून मास्तरांनी पारंपरिक व स्वरचित बंदिशी प्रसिद्ध केल्या. तसेच राष्ट्रसंगीत, शालेय शिशु संगीत, मोहनमाळ, नाट्य-चित्रगीतांच्या स्वरलिपींची पुस्तकेही प्रसिद्ध केली. सुधाकर अनवलीकर यांनी शब्दबद्ध केलेले त्यांचे ‘बोला अमृत बोला’ हे आत्मकथन १९८५ मध्ये, त्यांच्या मृत्युपश्चात प्रसिद्ध झाले.
हरिभाऊ देशपांडे, माणिकराव ठाकुरदास, बापूराव अष्टेकर, अंजनीबाई कलगुटकर, डॉ. पाबळकर, सुहास दातार, रंगनाथ करकरे, शिवराम गाडगीळ, नारायण फुलंब्रीकर, सुधाकर जोशी यांना मास्तरांचे मार्गदर्शन मिळाले. मात्र, मास्तरांची गायकी खर्या अर्थाने आत्मसात करून राम मराठे यांनी पुढे नेली. ज्योत्स्ना भोळे यांना संगीत दिग्दर्शनाच्या निमित्ताने मास्तरांचे मार्गदर्शन मिळाले. शिवाय त्यांच्या सहवासातून दिनकर अमेंबल, मधुसूदन कानेटकर, मोहनराव कर्वे, छोटा गंधर्व, इत्यादींनी गायकीचा प्रभाव घेतला. संगीतकार सुधीर फडके, वसंत देसाई, स्नेहल भाटकर, गजानन वाटवे, पु.ल. देशपांडे यांनीही आपल्या संगीतावर मास्तरांची छाप असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या कन्या वीणा चिटको यांनी वडिलांचा संगीत दिग्दर्शनाचा वारसा चालवला.
राष्ट्रप्रेमाने भारलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळात फुलंब्रीकरांनी ‘वंदे मातरम्’ या गीतास समूहास म्हणता येईल अशी सोपी, पण भारदस्त चाल लावली. ब्रिटीश राजवटीत आकाशवाणीवरून गाण्याचा आग्रह मास्तरांनी धरला व त्या कारणाने आकाशवाणीवर चार वर्षे बहिष्कारही टाकला. ‘वंदे मातरम्’ गाऊनच पुन्हा मुंबई आकाशवाणीवर गायनाला आरंभ झाला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४७ साली ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत व्हावे म्हणून नेहरू, राजेंदप्रसाद इ. नेत्यांनाही ते फैजपूरच्या अधिवेशनात भेटले. ही चाल पोलीसदलाच्या बॅण्डवर बसवून त्याचेही त्यांनी ध्वनिमुद्रण केले. हे गीत राष्ट्रगीत झाले नाही, मात्र मास्तर आपल्या मैफलीतही ‘वंदे मातरम्’ गात असत. ‘वंदे मातरम्’सह ‘अमर हिंदुस्थान’, ‘सबको अपना धर्म ही प्यारा’ अशा देशभक्तिपर गीतांची त्यांची ध्वनिमुद्रिकाही गाजली होती.
शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी फुलंब्रीकरांना १९३३ साली ‘संगीतकलानिधी’ ही पदवी दिली, तर देवासचे महाराज ‘राजगंधर्व’, सरोजिनी नायडू ‘वंदे मातरम्वाले मास्तर’ अशा नावांनी त्यांचा उल्लेख करीत. १९५३ मध्ये भारत सरकारने आयोजित केलेल्या चीनच्या दौर्यातील सांस्कृतिक मंडळात फुलंब्रीकरांचा समावेश होता व तेथेही त्यांनी गायन पेश केले. पुणे भारत गायन समाजाचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते. त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त १९५८ साली नऊ दिवस झालेला व ७० कलाकारांची हजेरी असलेला समारंभ पुण्यात खूप गाजला. त्यांना ‘विष्णुदास भावे सुवर्णपदक’ (१९६९) मिळाले. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ (१९७१), संगीत नाटक अकादमी रत्न सदस्यत्व (१९७२) देऊन त्यांचा गौरव केला.
त्या काळच्या कलाकारांत अभावानेच असणारा निर्व्यसनीपणा, व्यवहारी वृत्ती यांमुळे कलेच्या क्षेत्रातील देदीप्यमान यशाबरोबरच मास्तरांना सांसारिक सुख व समाधानी आयुष्य लाभले. त्या काळात पुण्यातील लिमयेवाडीतील ‘गणेशभुवन’ हा त्यांचा सुंदर बंगला लोकांच्या कौतुक व अभिमानाचा विषय होता.
मास्तरांनी १९५१ पासून मधुमेह व १९६१ मध्ये अर्धांगवायूचा झटका यांमुळे मैफली कमी केल्या. त्यांनी १९६९ साली भास्करबुवांच्या स्मृतीनिमित्त अखेरचे जाहीर गायन केले. पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या स्मृतिदिनी पुणे भारत गायन समाज व मुंबईस ट्रिनिटी क्लब येथे संगीतसभा होतात. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात त्यांचा अर्धपुतळा १९७५ साली उभारण्यात आला. त्यांची जन्मशताब्दी १९९८ साली साजरी करण्यात आली. साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे संगीतविषयक लेखकास त्यांच्या नावे पुरस्कारही देण्यात येतो.