Skip to main content
x

वर्णेकर, श्रीधर भास्कर

     श्रीधर भास्कर वर्णेकर हे अर्वाचीन काळातील श्रेष्ठ संस्कृत साहित्यकार, संस्कृत भाषेचे अस्खलित, धाराप्रवाही दशसहस्रेषु वक्ता व पंडित होते. श्री कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘प्रज्ञाभारती’ उपाधी प्रदान केली, जी मोठ्या अभिमानाने त्यांनी आजन्म आपल्या नावापुढे आवर्जून धारण केली. कारण, त्यामुळे उपाधी प्रदात्याचाच बहुमान होत असतो, असे दादा म्हणत. भूतपूर्व अर्थमंत्री डॉ. सी.डी. देशमुखांच्या शब्दांत, ‘‘श्री वर्णेकर हे संस्कृतचे प्रगाढ व्यासंगी, ध्येयनिष्ठ व प्रतिभावान उपासक, लेखक तसेच प्रसाद, कल्पना-वैचित्र्य, पदलालित्य अशा दुर्मीळ गुणांनी युक्त काव्यनिर्मिती करणारे कवीही आहेत!’’

     महाकवी डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांचा जन्म नागपुरातील एका सुसंस्कृत, मध्यमवर्गीय परिवारात झाला. वडील भास्करराव वास्तुविशारद व ज्योतिषी होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी प्रत्यक्ष रा.स्व. संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांना विचारून त्यांनी संघात प्रवेश घेतला व विविध जबाबदार्‍या मोठ्या कर्तृत्वाने पार पाडीत हे व्रत आजन्म पाळले. श्रीधर शाळेत असताना महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वत्र चालणार्‍या स्वातंत्र्य आंदोलनाचे चैतन्यमय वातावरण होते. अशाच एका ‘पिकेटिंग’च्या चळवळीत भाग घेतल्यामुळे बाल श्रीधरला पोलिसांनी पकडून कोतवाली ठाण्यात ठेवले. या प्रकरणातून श्रीधरची सरकारी शाळा जरी सुटली, तरी पुत्राच्या शिक्षणाची काळजी घेणार्‍या प्रेमळ पित्याने त्याला घराजवळील केवलेशास्त्र्यांच्या पाठशाळेत टाकले. तेथे गुरुकुल पद्धतीने ‘अमरकोश’, ‘लघुसिद्धान्त कौमुदी’, पंचमहाकवींचे साहित्य श्रीधरने लवकरच कंठस्थ करून संस्कृत भाषेवर बरेच प्रभुत्व मिळविले व तो छोटी छोटी, स्फुट काव्यरचना करू लागला. पुढे खाजगीरीत्या ज्या वेळी श्रीधर शालान्त (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण झाला, त्याच सुमारास दुर्दैवाने कॉलरा रोगाच्या साथीत केवळ आठ दिवसांच्या अंतराने त्याचे आई-वडील निधन पावले! चार भावंडांसह श्रीधर अनाथ झाला! परिवाराचा योगक्षेम वाहण्यासाठी खारीचा वाटा देत स्वतःचे शिक्षण पूर्ण करावे या उद्देशाने श्रीधररावांनी स्थानीय अंधविद्यालयात शिक्षक-सहायकवृत्ती घेतली व यथावकाश स्नातक आणि पुढे स्नातकोत्तर (एम.ए.) पदव्या प्राप्त केल्या. १९४१ ते १९५९ पर्यंत धनवटे नॅशनल महाविद्यालयात व नंतर नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात ते प्राध्यापक होते. १९७९ साली ते संस्कृत विभागाध्यक्ष पदावरून सेवानिवृत्त झाले. या दरम्यान मा. बाबासाहेब आपट्यांच्या प्रेरणेतून त्यांनी आधुनिक काळातदेखील अक्षुण्णपणे चालणार्‍या संस्कृत भाषेच्या विकासकार्याविषयी विशेष संशोधन करीत डी.लीट.ची सर्वोच्च पदवी प्राप्त केली. तसेच, संस्कृत भाषेत सात शतककाव्ये (‘वात्सल्य रसायनम्’, ‘विनायक वैजयन्ती’, ‘कालिदास रहस्यम्’, ‘रामकृष्ण परमहंसीयम्’, ‘जवाहर तरङ्गिणी’, ‘मन्दोर्मिमाला’, ‘सङ्घगीता’), याशिवाय अडुसष्ट सर्गांचे, चार हजार श्लोकांचे ‘शिवराज्योदयम्’ हे महाकाव्य, तीन गीतिकाव्ये, दोन नाटके, सतरा कथा व विपुल प्रमाणात स्फुट साहित्याची निर्मिती केली. यांतील ‘विवेकानंद-विजयम्’ या महानाट्याचे प्रयोग सर्वत्र सादर करण्यात आले व ते खूप गाजले.

     ‘राष्ट्रशक्ती’ या मराठी साप्ताहिकाचे, तसेच ‘भवितव्यम्’ या संस्कृत साप्ताहिकाचे सम्पादकपद त्यांनी अनेक वर्षे भूषविले. तीन खंडांत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या संस्कृत वाङ्मयकोशाचे लोकार्पण डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते, तसेच ‘प्रज्ञाभारतीयम्’ या त्यांच्या सर्व साहित्यसंग्रह ग्रंथाचे विमोचन अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले. १९५३ साली ‘युनेस्को’द्वारा प्रवर्तित ‘अखिल भारतीय संस्कृत कथा स्पर्धे’चे संयोजक, १९५२ ते १९५६ पर्यन्त कन्हैयालाल मुंशीद्वारा संस्थापित संस्कृत विश्व परिषदेचे सचिव, संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे सचिव, केंद्र सरकारच्या साहित्य अकादमीचे सन्माननीय सदस्य व तन्त्रविज्ञान परिभाषा समिती सभासद, महाराष्ट्र शासनाच्या स्थायी संस्कृत समितीचे सदस्य, भोंसला वेदशाळा, योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष इत्यादी महत्त्वाची पदे डॉ. श्री. भा. वर्णेकरांनी भूषविली. अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठाने आयोजित केलेल्या संस्कृतसम्मेलनात भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते गेले होते व तेथेच त्यांचे ‘तीर्थभारतम्’ हे काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

     संस्कृत साहित्य क्षेत्रातील या त्यांच्या अभूतपूर्व कार्याचा गौरव अनेक पुरस्काररूपाने करण्यात आला. त्यांत ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा ‘कालीदास’ पुरस्कार, उत्तर प्रदेश व दिल्ली प्रदेशांचे ‘संस्कृत साहित्य’ पुरस्कार, केंद्र सरकारचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार, ‘राष्ट्रपती’ पुरस्कार, ‘रामकृष्ण दालमिया श्रीवाणी अलङ्करणम् (श्री दलाई लामांच्या हस्ते), ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा’ पुरस्कार हे प्रमुख होत.

     डॉ. वर्णेकरांनी मराठी भाषेतदेखील अभंग छन्दोबद्ध गेय धम्मपद, प्रतिओवीबद्ध सुबोध ज्ञानेश्वरी, ‘भारतीय धर्म व तत्त्वज्ञान’ हा प्रबंधात्मक ग्रंथ, अनेक वैचारिक वृत्तपत्तीय लेख तसेच विविध हिंदी रचनादेखील केल्या आहेत. त्यांच्या साहित्यातील बराचसा भाग विविध विद्यापीठांतून अभ्यासक्रमात घेतला जातो. संस्कृत साहित्यातील संशोधकास त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरते. त्यांनी संस्कृत भाषेतून देशविदेशांत हजारो व्यासपीठांवरून सुबोध, मधुर, प्रवाही व्याख्याने दिली.

     शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित स्वरचित काव्यांना चाली लावण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर डॉ. वर्णेकर पद्धतशीरपणे संगीताचे धडे घेत असत. यातूनच ‘गीर्वाण-गीतार्चना’ या लोकप्रिय सी.डी.ची निर्मिती भैय्याजी सामक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्याचे प्रकाशन श्रीधररावांच्या निधनानंतर, २००१ साली रा. स्व. संघाचे सरकार्यवाह सूर्यनारायणराव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ही गीते आजही सर्वत्र शाळा-महाविद्यालयांतून, सार्वजनिक समारंभांतून, गणेशोत्सव, शारदोत्सवांतून, आकाशवाणी, दूरदर्शन माध्यमांतून गुंजत असतात. ज्या काळात स्वतंत्र भारताचा विकास केवळ भलेमोठे कारखाने, धरणे, इमारती, रस्ते अशा भौतिक निर्मितीतून होण्याची स्वप्ने राजकीय नेते पाहत होते, त्या काळी दुर्लक्षित संस्कृत भाषेच्या माध्यमातून चारित्र्यवान समाज घडविण्याचे महत्कार्य डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या हातून घडले यात संघसंस्कारांचा मोठा गौरव आहे. अशी ही व्यक्ती दुर्दैवाने एका संस्कृत उपक्रमात भाग घेण्यासाठी जात असताना मार्गातील अपघातात निधन पावली. ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ ही समर्थ कीर्ती त्यांनी सार्थक केली. बरेचशे यश त्यांनी ‘याची देही याची डोळा’ बघितले. भौतिक देह विलीन झाला तरी प्रज्ञाभारतीचे सांस्कृतिक कार्य अजरामर होऊन नव्या पिढीला कार्यप्रवण करीत आहे.

     अनेक विद्यार्थ्यांचे गुरू व मार्गदर्शक, ज्ञान-भक्ती-कर्मयोगाचा त्रिवेणी संगम असणारे दादा परिपूर्ण, समाधानी जीवन जगले. ते विद्वान होते, पण विद्वज्जड, खूप गंभीर नव्हते. हास्य-विनोद-कोट्या भरपूर करीत असत. कर्मयोगी होते, पण कर्मठ नव्हते. ज्ञानोत्तर भक्तिमार्गाच्या या साधकाचे ‘भागवतातील भक्तिनिर्झर’ हे पुस्तक रामकृष्णाश्रमाने त्यांच्या निधनानंतर प्रकाशित केले आहे. वर्णेकर यांच्या पत्नीने यासाठी विशेष परिश्रम घेतले.

     त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. त्यांतील कित्येक आज प्राध्यापक, प्राचार्य वा अन्यत्र उच्चपदस्थ आहेत. त्यांतील डॉ. पंकज चांदे यांनी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरुपद सलग ९-१० वर्षे भूषवून विक्रम केला. डॉ. रूपा कुळकर्णी सामाजिक, सांस्कृतिक कार्यांत अग्रेसर आहेत. अशी अनेक उदाहरणे आढळतात. आरमार, बांधकामविभाग, अभियांत्रिकी महाविद्यालये, विविध प्रकारच्या संस्था यांची त्या-त्या विषयाशी संबंधित सुगम गेय संस्कृत गीते त्यांनी रचून दिली, जी आजही गायली जातात. घरी आलेल्या प्रत्येक लग्नपत्रिकेची पोच ते संस्कृत-मंगलाष्टकाने आवर्जून देत असत व वर्‍हाडी मंडळी आनंदाने विवाहप्रसंगी ती गात असत. एवढ्या विशाल संस्कृत साहित्याचे कर्तृत्व त्यांनी कधीच स्वतःकडे घेतले नाही.

     प्रभो! तव कृपां विना तृणकणोऽपि न स्पन्दते

    सहस्रकिरणोऽपि न क्षणशतांशमुद्योतते।

    न चेन्दुरपि राजते न खलु गीष्प्रतिर्भाषते

    कुतो जडमतेरितः स्फुरति काव्यगीर्वाण गीः॥

    ‘‘परमेश्वरच माझ्याकडून हे करवितो,’’ असे ते या श्लोकातून नेहमी म्हणत असत.

डॉ. चन्द्रगुप्त वर्णेकर

वर्णेकर, श्रीधर भास्कर