Skip to main content
x

वैद्य, विश्वनाथ गोविंद

           विश्वनाथ गोविंद वैद्य यांचा जन्म ग्वाल्हेरला आजोळी झाला. त्यांचे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या होत असत. त्यामुळे त्यांनी आपले कुटुंब आपल्या भावाकडे बऱ्हाणपूरला ठेवले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या विश्‍वनाथ वैद्य यांचे शिक्षण काकांकडे बऱ्हाणपूरलाच झाले. तेथील रॉबर्टसन्स हायस्कूलमधून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९३५ साली त्यांनी पहिल्या वर्गासह कृषी पदवी मिळवली.

           पुढे त्यांनी किंग एडवर्ड शिष्यवृत्ती मिळवून १९३७ साली इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. वडिलांच्या निधनानंतर उर्वरित नऊ भावंडांची जबाबदारी घरातील मोठा मुलगा या नात्याने यांच्यावर पडली. ती पेलण्यासाठी त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयात व्याख्याता पदावर नोकरीला सुरुवात केली. त्यांनी व्याख्याता कृषिविद्याशास्त्र; उपसंचालक कृषी विभाग; संचालक कृषि-संशोधन आणि शिक्षण मध्य प्रांत या पदांवर कामे केली. पुढे १९५६ साली त्यांची नेमणूक सहसंचालक कृषी विभाग मुंबई प्रांत या पदावर झाली. १९६४ ते १९६९ या काळात संकरित ज्वारी, बाजरी, मका, धान आणि गव्हाच्या बुटक्या जाती याविषयी शेतकऱ्यांमध्ये असलेल्या भ्रामक गैरसमजुती दूर करून योग्य विश्‍वास निर्माण करण्यासाठी ते स्वतः व डॉ. कृ.गो.जोशी (जॉइंट डायरेक्टर) यांनी निरनिराळ्या जिल्ह्यांत खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना कृषीविषयक माहिती व प्रात्यक्षिके दिली. या प्राथमिक पायाभूत प्रयत्नात त्यांनी शेतकऱ्यांची दत्तक योजना व दत्तक खेडी योजना असे कार्यक्रम जाणीवपूर्वक राबवले. या क्रांतिकारी कार्यक्रमात त्यांनी त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, कृषिमंत्री पी.के. सावंत, संकरित तंत्राचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आणि या कार्यक्रमांचा गाभा असणारे शेतकरी यांना सुसूत्रीत पद्धतीने सहभागी केले. १९६९ साली संचालक कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य या पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर ते मार्च १९७५पर्यंत विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून भारतीय खते महामंडळ (मर्यादित) ट्रॉम्बे विभाग, मुंबई येथे कार्यरत होते. त्यांनी भरखते आणि रासायनिक खते यासंबंधी व इतर ७ पुस्तके पाणी व्यवस्थापनाविषयी लिहिली. डॉ. वैद्य हे कृषी उत्पादन कार्यक्रम तसेच ३ पंचवार्षिक योजनांच्या समित्यांचे सदस्य होते.

- संपादित

वैद्य, विश्वनाथ गोविंद