कुलकर्णी, हरिहर गुरुनाथ
कुंजविहारी यांचा जन्म अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांच्या बालपणीच त्यांचे वडील वारले. वडील हैद्राबाद संस्थानात महसूल खात्यात दुय्यम अधिकारी होते. १९१० साली ते सोलापुरात आले. तेथे नगरपालिकेच्या हायस्कुलात ते दोन वर्षे शिकले. या दोन वर्षांत श्रीधरपंत काकडे यांच्या ‘सूर्योदय’ प्रेसमध्ये ट्रेडल मशीन चालवले, वार लावून शिक्षण घेतले. सातवी उत्तीर्ण झाल्यावर १९९२ साली ‘लक्ष्मी मिल’मध्ये कापडावर नंबर टाकण्याचे म्हणजे ‘पीस मार्कर’चे, मजुराचे काम केले.
१९२० हे साल त्यांच्या जीवनात परिवर्तनकारी ठरले. त्या वर्षी मुंबई प्रांतिक परिषद सोलापूरला भरली होती व लोकमान्य टिळक उपस्थित होते. या प्रसंगी भावुक हरिहरला देशभक्तीची चेतना मिळाली. त्याने राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांची नोकरी गेली (१९२८). त्या वेळी ४० रुपयांवर ते कारकुनी करत होते.
१९२० ते १९३१ या काळात स्वातंत्र्य लढ्यात, १९३२ ते १९३५ या काळात राष्ट्रीय शिक्षण शाळेच्या प्रयोगात व पुढील सारे जीवन (१९७८ पर्यंत) विविध सामाजिक व साहित्यिक संस्थांतून लोकराज्याला आवश्यक सामंजस्य व समाजमन अनुकूल करण्यात त्यांनी व्यतीत केले.
जन जागरणासाठी कवीने कविता केल्या व उत्सव, मेळे, सभा यांमधून खड्या, तालबद्ध आवाजात गाइल्या. या कविता देशप्रेम, वीरश्री व उत्साह ह्यांनी ओथंबलेल्या होत्या. आरंभी ‘हरिहर’ व ‘त्रिशूल’ या टोपणनावाने ते लेखन करीत. वरेरकरांचे ‘कुंजविहारी’ नाटक पाहून त्यांनी ते नाव टोपणनाव म्हणून स्वीकारले. अशा तर्हेने हरिहर आता ‘कुंजविहारी’ बनले. कुंजविहारींनी स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहासातील थोर पुरुषांना काव्यविषय बनवून ज्वलंत राष्ट्रीय कविता लिहिल्या. तानाजींच्या पराक्रमावर रचलेले ‘मराठा गडी यशाचा धनी’ हे त्याचेच एक उदाहरण. ‘तुज सांगतसे शपथ घेऊनी आई, मरणाला भ्यालो नाही’ असे निर्धाराने म्हणत राष्ट्रकार्यासाठी ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ असे आईला वचन देत फाशी जाणारा धैर्यशाली क्रांतिवीर त्यांनी रंगविला. १९२१च्या मुळशी सत्याग्रहावर त्यांनी ‘मुळशीचा पाळणा’ लिहिला. त्यांच्या सुबोध, गेय व प्रत्ययकारी कवितांनी वाचकांना वेड लावले होते. स्वातंत्र्योत्तर ‘चिरंजीव होवो जगी लोकशाही’, ‘उद्याचा देव कसा असावा’ अशा समयोचित कविता कुंजविहारींनी लिहिल्या. ‘सैन्य चालले पुढे’ ही गोवा मुक्ती संग्रामावरची, ‘बंडखोर स्फूर्ती’ ही १८५७ संबंधी, ‘मंगल आरती’ ही महर्षी कर्वे यांच्या जन्मशताब्दी प्रसंगीची व ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ ह्या कवितेसारखाच भाव तसेच ओज दाखवणारी ‘स्वातंत्र्याची नौका जाते रक्त नदीतुनि पैलतिरी’ ही आणि अशी आणखी काही उदाहरणे देता येतील.
मार्शल लॉच्या काळात कवीला एक वर्ष सक्तमजुरीची सजा व ५०० रुपये दंड झाला होता. त्यांच्या किराणामालाच्या दुकानाचा लिलाव करून दंडाच्या अर्धी रक्कमही उभी राहू शकली नाही. यानंतर त्यांचे जीवन विसकळीत झाले. कुंजविहारी नळदुर्गजवळ खुदावाडी येथे राष्ट्रीय शाळेत गेले. देशभक्त तरुण कार्यकर्ते तेथून बाहेर पडू लागले. हैद्राबाद संस्थान व परकीय सरकारने अनेक राष्ट्रीय शाळा बंद पाडल्या. कवी पुन्हा सोलापूरला आले व आपले कार्य चालू ठेवले. त्यांनी अनेक उपक्रमांचे, चळवळींचे संयोजन केले. स्वत:ला नेहमी स्वयंसेवक मानून त्यांनी निष्ठेने कार्य केले. मराठी साहित्य परिषद सोलापूर शाखा, कवी मंडळ, साहित्य मंडळ, ओनामा मंदिर, हरी जागर व्याख्यानमाला, राज्यश्री वाचनालय, सर्वधर्म परिषद, विमा एजंट संघटना, बालमेळा, शारदोत्सव व्याख्यानमाला आदी अनेक संस्थांचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. विविध संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीला पोषक सहकार, सहजीवन, समता, ममता, स्वातंत्र्य, विकसनशील विधायक प्रवृत्ती हे सारे रुजविण्याचे संस्कार ते करीत राहिले. ‘नवतरुणांस’, ‘तुळशी वृंदावन’, ‘लोकमित्र मी मंत्र म्हणा’, ‘धर्म आणि दुर्योधन’, ‘सांग सूर्यनारायणा’ ह्या त्यांच्या कविताही उल्लेखनीय आहेत. त्यांच्या गीतांत दुर्दम्य आशावाद, ईश्वरावर नितांत श्रद्धा, देशाच्या उज्ज्वल भविष्यावर दृढ विश्वास यांचा प्रत्यय येतो. ‘नोकरशाहीची आरती’ या त्यांच्या कवितेस शि.म.परांजपे यांनी ‘वस्तुस्थितिदर्शक’ असे शिफारसपत्र दिले. कुंजविहारींनी कन्नड कवी द.रा.बेंद्रे यांच्या काही कवितांचा भावानुवाद केला. ‘स्वातंत्र्य सैनिक’ म्हणून १९७२ साली त्यांचा गौरव केला गेला. कुंजविहारींचा ‘गीत गुंजारव’ हा पहिला काव्यसंग्रह १९२६ मध्ये प्रकाशित झाला व त्याची सुधारीत आवृत्ती १९४७ मध्ये प्रकाशात आली. ‘आहुती’मध्ये (१९७२) त्यांच्या निवडक कविता संकलित आहेत.
कवी कुंजविहारी जन्मशताब्दी समिती, सोलापूरने या प्रसंगाचे औचित्य साधून ‘समग्र कुंजविहारी’चे प्रकाशन केले.