Skip to main content
x

कर्वे, इरावती दिनकर

इरावती कर्वे

रावती बाईंचा जन्म ब्रह्मदेशात ‘Myingin’’ येथे झाला. वडिलांचे नाव हरी गणेश करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई. त्यांना पाच भाऊ होते, बहीण नव्हती. त्यांचे मूळ नाव ‘गंगा’होते पण नंतर इरावती ठेवले. घरामध्ये मात्र सर्वजण ‘माई’ म्हणत. वयाच्या सातव्या वर्षीच त्या पुण्याच्या हुजूरपागा या शाळेत शिक्षणासाठी आल्या.१९२२ साली मॅट्रिक व १९२६ साली फर्ग्युसन  महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन प्रथम क्रमांकाने बी.ए. झाल्या. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील बराचसा काळ इरावती बाई त्या वेळचे फर्ग्युसनचे प्राचार्य रँगलर र.पु.उर्फ अप्पासाहेब परांजपे यांच्याकडे राहत होत्या. त्यांच्या घरातील वातावरण सांस्कृतिक पण त्याच वेळी आधुनिक, उच्च दर्जाचे व वाङ्मयीन अभिरुचीला खतपाणी घालणारे होते. काव्य-शास्त्रविनोदाला अत्यंत अनुकूल अशा घरात इरावतींचे लहानपण व तरुणपण गेले. संस्कारक्षम वयात योग्य ती शिस्त लावून वाङ्मयीन अभिरुचीची जाण इरावतींमध्ये निर्माण केली गेली. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर झालेला दिसतो. अप्पासाहेबांचे पंजाबी मित्र बाळकराम यांच्यामुळे त्यांना वाचनाचे प्रेम जडले. वडिलांच्या (ज्यांना त्या काका म्हणत) फिरतीच्या नोकरीमुळे फिरण्याची व निरीक्षणाची आवड निर्माण झाली.

स्वानुभव गर्भित ललितकथा-

लालवट गोरा रंग, साडेपाच फूट उंची, धिप्पाड बांधा, निळे चमकदार डोळे, डोळ्यांत हुशारीचे तेज व किंचित किनरा आवाज, कोणालातरी बजावून सांगावे असे बोलणे, चालण्यात चपळपणा व एक प्रकारचा आत्मविश्वास असे इरावतींचे लोभनीय रूप होते. आकर्षक व पुरोगामी व्यक्तिमत्त्वाबरोबरच  अंगभूत बौद्धिक हुशारी होती. १९२६ साली त्या वेळचे फर्ग्युसन महाविद्यालयामधील प्रो. दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. १९२८ साली मुंबई विद्यापीठातून एम.ए. झाल्यावर पीएच.डी. करायला जर्मनीला जाण्यासाठी त्यांना सासऱ्यांचा पाठिंबा, आशीर्वाद नव्हता. परंतु पीएच.डी.साठी जर्मनीला जाणे निश्चित केले. १९३० साली मानववंशशास्त्रामध्ये "A Symetry of the Human Skull’‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची अरूप प्रमाणता’ ह्या विषयावर पूर्ण केली. जर्मनीहून आल्यानंतर त्यांना कर्वे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी काम करावे लागले (१९३१ ते १९३९). त्यानंतर १९३९ मध्ये डेक्कन महाविद्यालयामध्ये रुजू होऊन स्वतःला आवडलेली व पटलेली संशोधनाची वाट त्यांनी चोखाळली.

डेक्कन महाविद्यालयामध्ये रुजू झाल्यानंतर संशोधनानिमित्त झालेल्या प्रवासातून त्या सर्व भारतभर व जगभर फिरल्यामुळे त्यांची जशी संशोधकीय पुस्तके तयार झाली, तशीच त्यांची ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’ व ‘गंगाजळ’ (मृत्यूनंतर प्रसिद्ध) ही ललित गद्यात्मक पुस्तकेही निर्माण झाली. त्यांच्या बहुतेक लेखांतून ललितरीत्या स्वानुभवच अवतरला. त्यामुळे स्वानुभव गर्भितता ह्या मूलभूत प्रेरणेचा विचार करून ह्या तिन्ही पुस्तकांतील ललितकथांचा विचार एकत्रितपणे करता येतो.

इरावतींच्या ललितलेखांचे आस्वादक, चिंतनपर, प्रवासवर्णनपर, व्यक्तिचित्रणात्मक, कविता असे अनेक उपविभाग होऊ शकतात. मात्र हे लेखन अमुक एक प्रकारेच लिहायचे, असे ठरवून झालेले नाही. त्या लिहीत गेल्या व ललित-गद्यातल्या अनेक उपप्रकारांना जन्म मिळाला. त्यात मुद्दाम असा सजावटीचा भाग नाही. ललित-गद्याच्या संक्रमण अवस्थेत ललितगद्याला नवीन, हवाहवासा, आकृतिबंध देणार्‍या त्या मानाच्या शिलेदार ठरतात. ललित गद्याच्या उगमापाशी इरावती पाय रोवून डौलाने उभ्या आहेत. इरावतींचे नाव मराठीच्या साहित्य विश्वामध्ये सर्वतोमुखी होण्याचे कारण ‘परिपूर्ती’ हे होय.

‘जन्मांतरीची भेट’आणि ‘वाटचाल’ ह्या लेखांमुळे त्यांची साहित्यिक उंची सर्वांच्या नजरेत भरली. माणसाचा ‘माणूस’ म्हणून त्या शोध घेत असतात. ह्यापूर्वीही अप्पासाहेब परांजपे यांचे ‘दुसरे मामंजी’तसेच महर्षी कर्वे यांचे ‘आजोबा’ ही व्यक्तिचित्रे अशीच सरस उतरली आहेत. ‘युगान्त’ने त्यावर कळस चढविला. इरावतींचे ‘अभिरुची’मधील सुरुवातीचे लेखन ‘क’ ह्या टोपण नावाने होते.

स्त्रीस्वातंत्र्याची अभिव्यक्ती-

 ‘युगान्त’ पुस्तकाला १९६७ साली एक दर्जेदार लेखक म्हणून ललित मासिकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र सरकारचा व साहित्य अकादमीचा असे दोन्ही पुरस्कार त्यांना १९६७ साली मिळाले. एक ललितकृती म्हणून तर ‘युगान्त’ श्रेष्ठ आहेच. त्यातील व्यक्तिरेखा वास्तवाला न सोडताही विलोभनीय आहेत. त्याखेरीज त्यातून घडवणारे इतिहास-दर्शन व समाजशास्त्रीय आकलन सामान्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहे. श्रेष्ठ टीका ही एक तर्‍हेची नवनिर्मिती असते, हे ‘युगान्त’ वाचल्यावर जाणवते. ‘युगान्त’मधील स्त्री-पुरुष चित्रणे हे युगान्तचे वैभव आहे. इरावतींची मूल्यकल्पना, न्याय-अन्याय विचार, स्त्री-जातीचा कळवळा याचे दर्शन वाचकाला होते. व्यापक अनुभवविश्व, आत्मपरता, ललित लेखांना आत्मचरित्रात्मक मूल्य, स्त्री व स्त्रीविषयक प्रश्‍नांचा सतत अनुबंध, लेखनावर उदारमतवादाचा परिणाम ही इरावतींच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. “स्त्रियांची चळवळ ही काही स्वतंत्र चळवळ नाही. सामाजिक अन्यायाखाली दडपलेल्या बहुसंख्य मानवांच्या सुटकेसाठी जी चळवळ चालली आहे, त्याचाच एक भाग म्हणून त्याच्याकडे बघायला हवे.” अशी त्यांची व्यापक विचारसरणी होती. जातीविषयक अनेक जाती-जमातींचे, आदिवासींचे अनुभव आणि जगप्रवासामुळे वैश्विक अनुभव इरावतींकडे जमा होते. इंग्लंड, अमेरिका बघून त्या हुरळल्या नाहीत. भारतीय संस्कृती, श्रद्धा यांचा डोळसपणे विचार करणार्‍या त्या विदुषी होत्या. स्त्री स्वातंत्र्याच्या भारतातील मर्यादा बघून त्या दुःखी होत. त्याच्या अत्यंत कडवट प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटत. बिहारमधील स्त्रियांबद्दल, तसेच “महाराष्ट्रात मुंडन केलेली विधवा म्हणजे एक जिवंत प्रेत वावरत असते.” अशा जागा हेच दर्शवितात. महानुभावीय पंथामध्ये मुलींना लहान वयातच संन्यास देतात; तसेच जैन समाजामध्ये मुलाच्या आठव्या, दहाव्या किंवा अकराव्या वर्षी त्याला साधूपणाची दीक्षा देतात; यांबद्दल इरावती नापसंती दर्शवतात.

मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ-

इरावतींनी मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यांमध्ये जे संशोधनपर काम आयुष्यभर केले, त्याचे लिखित पुनःस्वरूप म्हणजे त्यांची वेगवेगळी संशोधनपर पुस्तके होत. आधी संशोधन, मग त्या संशोधनाविषयी व्याख्याने व त्यानंतर त्याचे पुस्तकात रूपांतर हा क्रम दिसतो. ह्याव्यतिरिक्त अभ्यासाच्या आधारे लिहिलेले १०१ निबंध, काही असंग्रहित लेख, ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘संस्कृती’,‘धर्म’ ह्या पुस्तिका; अशी त्यांची धर्म व संस्कृती विषयक पुस्तके आहेत.

एक मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ म्हणून तर हे लेखन विचार करण्यासारखे आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विषयाबद्दल मनात असलेली खोल आस्था त्यांच्या लेखनातून सतत दिसते. त्यामुळे ते लेखन म्हणजे कोरडा संशोधन विषय न राहता एका हृदयशोधाचे रूप घेते. इरावतींच्या संस्कृतीविषयक लेखनाचा विचार वैचारिक वाङ्मय म्हणून तर करता येतोच, पण महाराष्ट्राच्या संस्कृतिविचारांची भावधारा संपन्न करणारे वाङ्मय म्हणूनही करता येतो.

 ‘हिंदू समाजरचना’ (१९६४), ‘हिंदू समाजः एक अन्वयार्थ’ भाषांतर:Hindu Society:An Interpretation;Kinship Organization in India (१९५३) भाषांतर: भारतमे बंधुत्व संघटन; ‘महाराष्ट्र: एक अभ्यास’ भाषांतर:Maharashtra and Its People; ही इरावतींची वैचारिक व संशोधनपर पुस्तके आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज, प्रदेश व तेथील लोक यांबद्दलची ही पुस्तके आहेत. मानववंशशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता. इरावतींना आपण ललित लेखिका म्हणून ओळखले जाण्यापेक्षा एक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणे हवे होते.

नातेदारी संघटनेविषयीच्या (Kinship Organization in India) त्यांच्या पुस्तकाने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. नातेवाचक शब्द स्पष्ट करताना इरावतींचा शब्दांचा व भाषेचा अभ्यास, त्या अनुषंगाने स्त्रीचे स्थान; असा अभ्यास ग्रंथभर दिसतो. एकाच वेळी संशोधक आणि ललित लेखिका या दोन्ही भूमिका त्या बजावत होत्या. त्यामुळेच ललित लेखनात संशोधकीय प्रज्ञा, सत्यान्वेषी पिंड दिसतो व संशोधकीय लेखनात भावगर्भता येते. १९३९ ते १९७० ह्या काळात मानववंशशास्त्र व साहित्य ह्या दोन्ही क्षेत्रांत इरावतीबाईंनी प्रगतीची शिखरे पादाक्रांत केलेली दिसतात. त्यांचे हे पुस्तक अमेरिकेतील विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून लावले गेले होते. सदर पुस्तकाला मानववंश शास्त्रातील तज्ज्ञ श्री. हट्टन यांची प्रस्तावना आहे.

काळापुढती चार पाउले-

भारत सरकारने हिंदूकोडबाबत त्यांचे मत आजमावले होते. पुरुषांच्या द्वितीय विवाहाचे समर्थन करणारा त्यांचा लेख, गांधीहत्येनंतर प्रक्षोभाबद्दलचा त्यांचा लेख; ही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची उदाहरणे आहेत. १९५८ साल हे महर्षी कर्वे यांचे शताब्दी वर्ष. त्या वेळी मत विचारले असता, ‘स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची जरुरी नाही’ असे मूलगामी  व प्रांजळ मत त्यांनी नोंदविले. कोणतेही संशोधन पूर्ण झाले असे त्या मानीत नसत. त्या विषयीचे पुस्तक लिहून पूर्ण झाले, तरी त्या विषयात नवीन काय मिळते, याबद्दल त्यांचा शोध चालू असे. दुसर्‍या आवृत्तीच्या वेळी त्या माहितीचा अंतर्भाव पुस्तकात केला जाई. एकीकडे वेगवेगळ्या जातींचा अभ्यास, तीन हजार ग्रामनामांचा अभ्यास, एकूण एकोणीस विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शन ही कामेसुद्धा सुरू होती. 

१९४७ साली दिल्ली सायन्स काँग्रेसमध्ये मानववंशशास्त्र विभागाच्या त्या अध्यक्षा होत्या. प्रागैतिहासाच्या आफ्रिका काँग्रेसमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व, कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे मानवंशास्त्रातील संशोधनामुळे लंडन विद्यापीठामध्ये आमंत्रित व्याख्यात्या, बर्कले येथेही व्याख्यात्या असे सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ डेक्कन महाविद्यालयाने ग्रंथालयामध्ये एक संदर्भ विभाग ठेवला आहे. तेथे त्यांना मिळालेली प्रशस्तिपत्रके व पारितोषिके बघायला मिळतात. १९७३मध्ये डेक्कन महाविद्यालयाने एक स्मृतिग्रंथ काढला होता. त्यात काकासाहेब कालेलकरांनी त्यांच्या समग्र कार्याचा आढावा घेणारा गौरवास्पद लेख लिहिला आहे. २००५ साली डेक्कन महाविद्यालयाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पुणे विद्यापीठाने त्यांच्या स्मरणार्थ  समाजशास्त्र विभागाजवळ मानववंशशास्त्र वस्तुसंग्रहालय उभारले आहे. १९९१ मध्ये प्रदर्शन भरवले व १९९३ मध्ये संग्रहालयाला त्यांचे नाव देण्यात आले. येथील आदिवासी काळाविषयीचे दालन, लग्नखांब, मानवी उत्क्रांतीमधील टप्पे वगैरे अनेक गोष्टी अभ्यसनीय व आकर्षक आहेत.

इरावतीबाईंनी ५०-६० वर्षांपूर्वी केलेले अंदाज म्हणजे आजची प्रत्यक्ष परिस्थिती आहे. त्यांच्या समाजशास्त्रीय, संशोधकीय लेखांचा सगळ्यांत प्रथम दर्जाचा मोठेपणा सांगावयाचा म्हणजे त्यांनी ५० वर्षांपूर्वी केलेले अंदाज तंतोतंत खरे ठरलेले आहेत. त्याबाबतीत एक-दोन विषयांचा उल्लेखही पुरेसा ठरेल. पहिली गोष्ट लोकसंख्या वाढीबाबत ‘प्रजासंकोचच अपरिहार्य’ हे त्यांचे मत होतेच. कुटुंबनियोजनाचे पुण्यातील पहिले केंद्र के.ई.एम.रुग्णालयामध्ये त्यांनी काढायला लावले होते. महाराष्ट्राची वास्तव व्याख्या, “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र”अशी होय व महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गुजरात, कर्नाटक आणि संपूर्ण देश समजून घ्यायला हवा आणि आदिवासी समजल्याखेरीज आपला देश समजू शकत नाही. आदिवासींना वेगळे ठेवून फोडा व झोडा या ब्रिटीशांच्या नीतीची, फुटीरतेची त्यांना तेव्हाच कल्पना आलेली होती. आजचे आसाम-ओरिसातील दंगे पहिले की, ‘काळापुढती चार पाउले’ विचार करणार्‍या इरावतींचे द्रष्टेपण कळते. शेवटच्या दिवसापर्यंत कार्यमग्न असतानाच ११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचे निधन झाले.

- डॉ. उषा कोटबागी

 

 

कर्वे, इरावती दिनकर