कोलटकर, अरुण बाळकृष्ण
दृक्-संवादकलेच्या क्षेत्रात अरुण बाळकृष्ण कोलटकरांचे महत्त्वाचे योगदान आहे. जाहिरातींचे संकल्पन, पुस्तकांची मुखपृष्ठे, रेखाचित्रे अशा विविध प्रकारांमधून कोलटकरांनी सांस्कृतिक संदर्भांनी संपृक्त आणि तरीही थेट संवाद साधणारी दृश्यजाणीव जोपासली. ही दृश्यभाषा साहित्य, चित्रपट, अॅनिमेशन अशा विविध क्षेत्रांचे संस्कार घेऊन आलेली होती आणि कोलटकरांच्या कवितेशी तिचे जवळचे नाते होते. विचारगर्भ आणि उपरोधिक असे या दृश्यभाषेचे वर्णन करता येईल.
कोलटकर १९४७ साली कोल्हापूरहून मुंबईला आले. त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून पेंटिंगमधील पदविका उच्च श्रेणीत पूर्ण केली. कोलटकरांनी १९६०/६३ पासून जाहिरातीच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा निर्माण करण्यास सुरुवात केली. ते १९९५ पर्यंत जाहिरातकलेच्या क्षेत्रात कार्यरत होते. १९६० ते १९७५ या काळात ‘एमसीएम’ (मास कम्युनिकेशन अॅण्ड मार्केटिंग) या जाहिरातसंस्थेचा विशेष दबदबा होता. केर्सी कात्रक त्याचे व्यवस्थापकीय संचालक होते. कोलटकरांनी तिथे जवळपास नऊ वर्षे नोकरी केली. किरण नगरकर आणि कोलटकरांची गट्टी जमली ती तिथेच.
किरण नगरकर आणि अरुण कोलटकर या दोघांनी जवळपास वीस वर्षे एकत्र काम केले. नगरकरांनी कॉपी लिहायची आणि कोलटकरांनी त्याला दृश्यरूप द्यायचे अशी ही विभागणी होती. कधीकधी या भूमिकेत अदलाबदलीही होत असे. ‘एमसीएम’ बंद झाल्यानंतर या दोघांनी स्वतंत्रपणे (फ्री-लान्स) कामे केली. ‘प्रतिभा’, ‘चैत्र’, ‘फल्क्रम’, ‘लिंटास’ अशा अनेक जाहिरातसंस्थांसाठी कोलटकरांनी कामे केली आणि त्यांच्या अनेक जाहिरातींना पारितोषिके मिळाली. ‘कॅग’ (कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्ड) तर्फे दिला जाणारा ‘कॅग हॉल ऑफ फेम’ सन्मान कोलटकरांना १९८८ साली देण्यात आला.
कोलटकर हे बाबूराव सडवेलकर, रवींद्र मिस्त्री, अंबादास या चित्रकारांना समकालीन होते. १९६० च्या दशकात नेहरूप्रणीत धोरणांमधून देशाची औद्योगिक घडण होत होती. औद्योगिक स्पर्धेचे युग सुरू झाले होते. माहिती, जाहिरात व विक्री या त्रैराशिकातून अर्थव्यवस्थेला गती मिळत होती. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर अशी मोजकी कॉर्पोरेट हाउसेस, ‘एअर इंडिया’सारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सेवा, कापड गिरण्या यांचे प्राबल्य होते. बँकिंग सेवा, संगणक कंपन्या, घड्याळे, फॅशनवेअर, कुरियर सेवा, रेन्ट अ कार सेवा, लिफ्ट किंवा एलिव्हेटर्स अशा नव्या वस्तू अथवा सेवांची बाजारपेठ वाढत होती. सांस्कृतिकदृष्ट्याही हा संक्रमणाचा आणि स्थित्यंतराचा काळ होता. बीटल्सचे संगीत, हिप्पी संस्कृती, विद्यार्थ्यांची आंदोलने, स्त्री-मुक्ती चळवळ, प्रायोगिक नाटकांची आणि चित्रपटांची नवी लाट यांतून एक नवी दृश्यभाषा घडत होती. कोलटकरांनी जाहिरातींमध्ये ही नवी संवेदनशीलता आणली.
कोलटकरांनी दृश्यरूप दिलेल्या काही प्रातिनिधिक जाहिराती म्हणजे ‘स्विसएअर’, ‘एचएमटी’, ‘लिबर्टी शटर्स’, ‘आयबीएम’, ‘ओटिस एलिव्हेटर’, ‘कॉर्पोरेशन बँक’ इत्यादी. ‘स्विसएअर’च्या जाहिरातींमध्ये काही पांढरे ढग असलेले आकाश दाखवले होते आणि इंग्रजी मजकुराचा आशय होता, ‘इतर विमानसेवा आणि आमच्यात असलेले एकमेव साम्य’, तर दुसर्या ‘स्विसएअर’च्याच जाहिरातीत उघडलेली सूटकेस आणि आतमध्ये ‘इगो’ अशी मोठी अक्षरे होती. खाली शब्द होते, ‘आम्ही त्याला मदतच करतो.’ ‘महिंद्र आणि महिंद्र’च्या जाहिरातीत एक माकड टंकलेखन करताना दाखवले होते. जॉन रस्किन या विचारवंताचे उद्गार सोबत होते, ‘गुणवत्ता अपघाताने येत नाही तर बुद्धीच्या योग्य वापराने, इच्छाशक्ती असेल तर येते.’ ‘कॉर्पोरेशन बँके’च्या जाहिरातीमध्ये बेसलाइन होती, ‘माणसाचे मूळ स्थान मिळवून देते, विश्वाच्या केंद्रस्थानी.’ रेनेसान्स काळातला मानवतावाद (ह्युमॅनिझम) एखाद्या ‘मिशन स्टेटमेंट’ किंवा ‘व्हिजन स्टेटमेंट’सारखा इथे येतो आणि मोजक्याच रेषांमधल्या रेखाचित्रांनी या जाहिरातींना वेगळ्या अर्थच्छटा प्राप्त होतात.
‘एचएमटी’ (हिंदुस्थान मशीन टूल्स) या घड्याळे आणि यंत्रांचे उत्पादन करणार्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या जाहिराती, तसेच ‘आयबीएम’ कॉम्प्यूटर्ससाठी केलेल्या जाहिराती विशेष गाजल्या. ‘एचएमटी’च्या जाहिरातींमध्ये चकचकीत पोलादी पृष्ठभागावर प्रतिबिंबित झालेले अक्षरांचे आकार आणि त्यातून साधलेला आकृतिबंध अर्थपूर्ण होता. बोधवाक्य होते ‘नवीन येणारे आकार’. एचएमटीने तयार केलेल्या पोलादी यांत्रिक भागांची गुणवत्ता आणि नव्या युगाची चाहूल यांचा समन्वय जाहिरातींमध्ये साधला गेला होता.
‘आयबीएम’च्या जाहिरातीत भारताचा नकाशा असलेल्या बशीवर पावाचा तुकडा ठेवलेला आहे. सोबत कॉपी आहे ती संकरित बियाण्यांनी शेतीउत्पादन कसे वाढले त्याची. ‘सीएमसी’ (कॉम्प्यूटर मेन्टेनन्स कॉर्पोरेशन) साठी केलेली जाहिरातमोहीम पुन्हा वेगळ्या धर्तीची आहे. १९७९ साली केलेल्या या जाहिरातींमधून पुढे होऊ घातलेल्या माहितीक्रांतीची चाहूल जाणवते. यांतली रेखाटने साधी आहेत, व्यंगचित्रांच्या शैलीला जवळची आहेत, अॅनिमेशनची गतिमानता त्यात आहे. मुख्य म्हणजे विचार अथवा संकल्पना चित्रबद्ध करणारी रेघोट्यांची चित्रे (डूडल्स) असावीत तशी ती आहेत.
संकल्पना ह्या जेव्हा एखाद्या टिपणातून किंवा प्राथमिक रेखाटनामधून कागदावर पहिल्यांदा उमटतात, तेव्हा त्यांत आत्मप्रकटीकरणातली प्राथमिक ऊर्जा आणि विस्ताराच्या गर्भावस्थेत असलेल्या अनेक शक्यताही असतात. कोलटकरांनी ‘कॅग’ वार्षिकाचे (१९६४—६५ सालच्या सोळाव्या वार्षिक अंकाचे) मुखपृष्ठ केले, त्यावर मुखपृष्ठाचे अंतिम रूप न देता ते काढण्यासाठी मनात आलेले विचार आणि शक्यता स्वत:च्या हस्ताक्षरात शब्दबद्ध केल्या आहेत आणि त्या जशाच्या तशा छापल्या आहेत! दुसरे उदाहरण आहे ते ‘द पोलीसमन’ या पुस्तकाचे. १९६९ मध्ये केलेली पोलीस ही व्यक्तिरेखा घेऊन तेरा प्रवेशांची — रेखाटनांनी बनलेली चित्रनाट्याची ही मालिका आहे. एकही शब्द नसलेली ! ग्राफिक आर्टिस्ट म्हणून असलेली संकल्पन पातळीवरची आणि रेखाटनामधली रेषेची ताकद या ‘पोलीसमन’च्या पुस्तकात प्रत्ययास येते. कोलटकरांनी केलेली जाहिरातीची पहिली स्केचेससुद्धा किती नेटकी आणि नेमकी असत, त्याची यावरून कल्पना येते. ही चित्रमालिका म्हणजे आजच्या ‘ग्रफिक नॉव्हेल’ची आठवण करून देणारे, ग्रफिक नाट्यप्रवेशासारखे एक मूर्तिमंत काव्यच आहे. कोलटकरांचा मूळचा पिंड अभिजात, विचारशील प्रतिभावंताचा आहे हे त्यातून स्पष्ट होते.
कोलटकरांनी काही पुस्तकांची मुखपृष्ठे केली, ती सुद्धा या प्रतिभाधर्माची साक्ष देणारी आहेत. किरण नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही कादंबरी, गीव्ह पटेल यांचा ‘हाउ डू यू विथस्टॅण्ड, ‘बॉडी’ काव्य-संग्रह, ‘अरण्य’ हा वसंत गुर्जर यांचा काव्यसंग्रह आणि ‘चिरीमिरी’,‘भिजकी वही’ या कोलटकरांच्या स्वत:च्या संग्रहांची मुखपृष्ठे कोलटकरांच्या तिरकस, पण आशयगर्भ दृश्यप्रतिमांची उत्तम उदाहरणे आहेत. मराठी मुखपृष्ठकला या मोजक्या मुखपृष्ठांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
कोलटकरांची जाहिरात-क्षेत्रातली बुद्धिमत्ता दुर्मीळ प्रतीची होती. शब्द आणि दृक कल्पना यांची एकरूपता, नेमकेपणा आणि स्पष्टता, विरोधी किंवा धक्कादायक मांडणीतून वाचकाला सजग करण्याची क्षमता आणि भारतीय — पाश्चात्त्य संस्कृतीचे संदर्भ असलेला, करुणेचा स्पर्श असलेला अंत:स्वर ही त्यांची वैैशिष्ट्ये होती.
चतुरस्र वाचन, प्रत्येक गोष्टीत रस आणि ती जाणून घेण्याची आस, निवडीतला चोखंदळपणा, कामातली शिस्त आणि परिपूर्णतेची धडपड यांमुळे कोलटकरांच्या जाहिरातींना एक वेगळे मूल्य प्राप्त झाले. कोलटकरांच्या विक्षिप्तपणाच्या, तुसडेपणाच्या अनेक आख्यायिका होत्या आणि आहेत. पण प्रत्यक्षात त्यामागे गंभीर वृत्तीचा, मूल्ये मानणारा, वैचारिक शिस्त असलेला आणि माणसाचे सामान्यपण जपणारा प्रतिभावंत दडलेला होता.
जाहिरात संकल्पनाच्या बाबतीत कधीकधी ते काळाच्या पुढे असल्यासारखे वाटत. वाघुळकरांच्या काळात जाहिरातींची मांडणी थेटपणे भिडणारी असे. भाई पत्की यांनी मुद्राक्षररचना, मांडणी यांबाबतीत नवे प्रयोग केले. ‘एमसीएम’ने जाहिराती अधिक कल्पक (क्रिएटिव्ह), विचारांना चालना देणार्या केल्या. अरुण कोलटकरांनी जाहिरातीत ‘विचार’ आणला आणि त्याला प्रवाही प्रतिमांचे रूप दिले. जाहिरातींची प्राथमिक उद्दिष्टे साध्य करतानाच ग्रहकांच्या जाणिवांचे उन्नयनदेखील केले. म्हणूनच ग्रफिक आर्टिस्ट म्हणून असलेले त्यांचे कर्तृत्व त्यांच्या कवितेइतकेच महत्त्वाचे आहे.