कोलारकर, रामचंद्र बाळकृष्ण
राम कोलारकर यांचा जन्म कोसरसार (तालुका वरोरा, जिल्हा चांदा) येथे झाला. शालेय शिक्षण वर्धा, हिंगणघाट व नागपूरच्या सदर भागातील वसतिगृह असलेल्या मिशनरी शाळेत झाले. कोलारकरांचे घराणे विदर्भातल्या श्रीमंत, मालगुजार घराण्यांपैकी एक समजले जाते. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामधून इंटर आर्ट्स झाल्यावर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केले. ‘समाचार भारती’च्या नागपूर शाखेच्या- मराठी विभागाचे ते मुख्य उपसंपादक होते. ‘सुषमा’, ‘नवलेखन’ इत्यादी काही मासिकांचेही संपादन त्यांनी केले. नागपूरहून पुण्यात आल्यावर काही काळ त्यांनी ‘विश्वमोहिनी’ प्रकाशनाचे संपादक म्हणून काम केले.
कोलारकरांनी काही कथा, कविता, ‘पुन्हा आज रात्री’ (१९५९) ही अनुवादित कादंबरी, समीक्षात्मक व इतर वृत्तपत्रीय लेखन केले असले, तरी मराठी साहित्य विश्वातील सर्वोत्कृष्ट कथांचे, अनेक खंडांचे संकलक म्हणूनच ते परिचित आहेत. यासाठी मराठी कथा साहित्याचे, अन्य वाङ्मयाचे त्यांनी अखंड वाचन केले. इंग्रजी साहित्य वाचनाची गोडी त्यांना मिशनरी स्कूलमध्ये असताना निर्माण झाली होती.
मराठीतील सर्वोत्कृष्ट कथांचे संकलन खंड स्वरूपात करण्याची प्रेरणा त्यांना ब्रिटीश व अमेरिकन सर्वोत्कृष्ट कथांची वार्षिके संपादणार्या एडवर्ट जे. ओब्रायन या संकलकामुळे मिळाली. त्यातही पुन्हा या प्रकल्पासाठी समीक्षक वा.ल.कुळकर्णी व पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ ह्यांच्याकडून योग्य दिशादर्शन मिळाले. दांडगे, सखोल वाचन करून आणि मूल्यमापनाचे स्वतःचे काही निष्कर्ष चोखंदळ दृष्टीने ठरवून त्यांनी उत्कृष्ट कथांची निवड केली. कथा साहित्याच्या या मंथनातूनच त्यांचे ‘ऐतिहासिक’, ‘विनोदी’, ‘जागतिक’ असे अनेक कथासंग्रह-खंड तयार झाले. ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ खंड पहिला १९६८ मध्ये, व खंड सोळावा १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला. ‘जगातील सर्वोत्कृष्ट कथा’ खंड-१ (१९९३), ‘सर्वोत्कृष्ट मराठी ऐतिहासिक कथा’, खंड १ ते १० (१९८४-१९८८), सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड १ ते २० (१९८५-१९८८).
याशिवाय त्यांनी गोपाळ गंगाधर लिमये (१९७०), चिंतामणी यशवंत मराठे (१९७५), कमलाबाई टिळक (१९७५) या तीन कथाकारांच्या निवडक कथांचे संकलन केले आहे. प्र.के.अत्रे, ना.सी.फडके, ग.दि.माडगूळकर इत्यादी मराठीतील नामवंत कथालेखकांच्या निवडक कथा; ‘किर्लोस्कर’, ‘हंस’ मासिकांतील वेचक कथा यांचेही संग्रह त्यांनी संपादित केले आहेत. हे सारेच कार्य त्यांनी त्या विशिष्ट वाङ्मय प्रकाराच्या कलात्मकतेचे भान ठेवून चोखंदळ समीक्षकाच्या भूमिकेतून केले आहे. या संकलन-संशोधनातून त्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. उदाहरणार्थ मराठीतील विनोदी कथेच्या यशस्वितेची कमान १८९८ पासून वर चढत गेली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर सुमारे २०० निवडक कथा रसिक वाचकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. सातत्याने गंभीर कथा लिहिणार्यांच्या विनोदी कथा क्वचित दुर्लक्षित राहिल्या, अशाही लेखकांच्या विनोदी कथा या प्रकल्पामुळे रसिक वाचकांपुढे आल्या आहेत हे विशेष. काळाच्या वाटचालीप्रमाणे कथा व कथालेखक यांचा क्रम त्यांनी कथासंकलन करताना ठेवला. कोलारकरांचे हे निवडक कथांच्या संकलनाचे कार्य मराठी वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.