Skip to main content
x

अभ्यंकर, कुसुम रामचंद्र

           कुसुम अभ्यंकर यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उमाबाई व वडीलांचे नाव शंकरराव दामले. रत्नागिरीत डॉ.अभ्यंकर यांच्या वैद्यकीय व्यवसायाला पूरक म्हणून कुसुम अभ्यंकर यांनी नर्सिंगचा कोर्स केला. त्या डॉक्टरांना त्यांच्या व्यवसायात मदत करू लागल्या. परंतु मुळातून शिक्षणाकडे ओढा असल्यामुळे रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषय घेऊन एम.ए.ही पदवी मिळवली. काही काळ महाविद्यालयात अध्यापन केले. शिवाय हिंदी साहित्यरत्न ही पदवीही मिळवली.

१९७० ते १९८४या काळात त्यांच्या लेखनाला बहर आला. त्या आपल्या लालित्यपूर्ण, प्रवाही शब्दकळेने आणि लेखनातल्या सखोल जीवनदर्शनाने थोड्या अवधीत लोकप्रिय झाल्या. त्यांची तेहेतीस पुस्तके प्रकाशित झाली. त्यांतील बहुतांश कादंबर्‍या नायिकाप्रधान आहेत. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था, पारंपरिक नीतिमूल्यांची चौकट, बाईपणामुळे येणार्‍या मर्यादा यांमध्ये दडपून गेलेल्या स्त्रियांचे चित्रण त्यातून आहे. या नायिका तडफदार आहेत. स्वाभिमानी, करारी, समजूतदार, सेवाभावी आहेत. तशाच स्वप्नाळूही आहेत. स्त्रीची ही विविध रूपे कुसुम अभ्यंकरांनी उठावदारपणे सादर केली आहेत. रंजनप्रधान कथांच्या साच्यात बसणार्‍या या कादंबर्‍यांपेक्षा वेगळ्या धाटणीचे कादंबरीलेखनही त्यांनी केले. ओघवती भाषा आणि कादंबरीच्या तंत्राची उत्तम समज यांमुळे त्यांच्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्या आहेत.

विघ्नहर्ता’, ‘झुरते मी अंतरी’ (१९७५), ‘अश्विनी’, ‘स्पर्श’ (१९७५), ‘धर्मात्मा’ (१९७७), ‘आघात’ (१९७५), ‘कॅरियर’ (१९७८) अशा काही वेगळ्या विषयांवरील कादंबर्‍या आहेत. लाल बंगलीया त्यांच्या रहस्यमय कादंबरीवर आधारित नाटकही १९८४ साली रंगभूमीवर आले.

कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते.

आपल्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या मर्यादित आयुष्यात कुसुम अभ्यंकर यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय आहे.

- मंदाकिनी भारद्वाज

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].