Skip to main content
x

भुसारी, रघुनाथ महारुद्र

    प्राचीन महाराष्ट्रातील धर्म, संस्कृती, इतिहास व वाङ्मय यांचे प्रगाढ पंडित प्रा. रघुनाथ महारुद्र भुसारी हे मूळचे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील होत. पाथरी व परभणी येथे शालेय शिक्षण व हैद्राबादमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी विद्यापीठात अध्यापन सुरू केले. उस्मानिया विद्यापीठामध्ये एलएल.बी. केल्यानंतर त्यांनी नागपूरहून एम.ए.ची पदवी घेतली. १९३० पासून १९८५ पर्यंत त्यांचा उस्मानिया विद्यापीठाशी संबंध जोडलेला होता. प्रा. चिं.नी. जोशी यांच्याबरोबर ते विभागात काम करू लागले, तसेच संशोधनातही रमत गेले. १९४९ ते १९५२ या काळात ते मराठी विभागप्रमुख होते.

     १९२६ मध्ये कलकत्त्याला जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या काळात संस्कृतमध्ये एम.ए. करून ते देवदत्त भांडारकर यांच्या हाताखाली प्राच्यविद्या इतिहास या विषयात पारंगत होऊन आले. त्यांनी ‘तेराव्या शतकातील मराठी साहित्य’ असा प्रकल्प हाती घेतला. साहित्य संशोधनाला भाषाशास्त्रीय आधाराबरोबरच प्राच्यविद्येचे अधिष्ठान दिले. त्याचबरोबर त्यांनी द्राविडी भाषा व संस्कृतीचे तुलनात्मक अध्ययन सुरू केले. या दोन्ही अभ्यासांचे फलित ग्रंथरूपाने आले नाही; पण त्यांनी या विषयांवर लेख मात्र लिहिले. प्राचीन महाराष्ट्र समजण्यासाठी तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे, हे मराठीत प्रथमच सप्रमाण दाखवले गेले.

    भुसारी यांनी ‘प्राचीन महाराष्ट्राचा धार्मिक इतिहास’ (१९६५) लिहिताना भांडारकर यांना प्रमाण मानले. मात्र, प्रत्येक धर्मपंथाची मीमांसा करताना त्यांनी स्वतःची वेगळी मते मांडून निष्कर्ष सांगितले आहेत. महानुभाव, वारकरी, दत्त, लिंगायत, सूफी अशा अनेक धर्मपंथांचे स्वतंत्र ग्रंथ असले, तरी असा तुलनात्मक आणि वेगळ्या साधनांचा आधार घेऊन लिहिलेला हा एकमेव ग्रंथ मानला जातो. या संप्रदायांचे सांस्कृतिक कार्य भुसारींनी सर्वप्रथम सांगितले.

    सातवाहन कालखंड हे प्रा. भुसारी यांच्या अभ्यासाचे खास क्षेत्र होते. ‘आद्य महाराष्ट्र आणि सातवाहन काल’ (१९७९) या ग्रंथासाठी त्यांनी प्राच्यविद्या क्षेत्रातील शिलालेख, नाणी, स्थापत्य, चित्र, शिल्प यांबरोबर प्राचीन लोकराज्ये, जनपदे, महाराष्ट्र-आंध्र परस्पर संबंध, शालीवाहन शक आणि विक्रम संवत, यांची कालनिर्णयपद्धती या सर्वांचा विचार केला. सातवाहन महाराष्ट्रीय वंशाचे होते. त्यांना आंध्रचे का म्हटले गेले व ते कसे चूक आहे, हे स्पष्ट केले. सातवाहनकालीन धार्मिक, सामाजिक जीवन व ‘गाथासप्तशती’तील ग्रमीण जीवन यांची तुलना केली. या पुस्तकाने सातवाहनांच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला. त्यांनी ग्रंथाला जोडलेली परिशिष्टे उद्बोधक आणि रोचकही आहेत. त्यांत प्रामुख्याने ग्रीक व भारत आणि महाराष्ट्र यांचे संबंध दाखवले आहेत.

    प्रा. भुसारी यादवकालीन महानुभावी साहित्याचे साक्षेपी संशोधक व चिकित्सक अभ्यासक होते. एल्हणकृत ‘अष्टनायिकाविवाह’ (१९६७), ‘वसंतवर्णन’ (१९६८) आणि नागराजकृत ‘प्रतिष्ठानवर्णन’ (१९५७) (प्रा. माढेकर यांच्यासह) हे महानुभावी ग्रंथ, साक्षेपाने संपादित केले. विस्तृत प्रस्तावनेसह, काव्याची भाषा, अलंकारवैभव व शब्दकोशासह परिपूर्ण असे हे संपादन आहे. महानुभाव साहित्याविषयी व अभ्यासकांविषयी काही लेखही त्यांनी लिहिले आहेत. ‘अमृतानुभव’ आणि ‘विवेकसिंधू’ यांमधील तत्त्वज्ञानाची बैठक एक कशी आहे ते त्यांनी सांगितले आहे.

    प्रा. भुसारी हाडाचे पुरातत्त्ववेत्ते होते. शिलालेखांचे संशोधन, लेखन आणि वाचन हे अतिशय जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. व्यावहारिक यशाची चिंता न करणाराच असे संशोधन करू शकतो. भुसारींनी या कामाचा आयुष्यभर ध्यास घेतला होता. एखादा काव्यसंग्रह वाचावा तसा ते सहजतेने शिलालेख वाचीत आणि त्याचा आनंद घेत असत, असे डॉ. उषाताई जोशी यांनी म्हटले आहे. हतनूरचा यादवकालीन शिलालेख त्यांनी उजेडात आणला. रामदेवराव यादवांचा कर्नाटकातील कानडी भाषेतील शिलालेख त्यांनी उजेडात आणला. हा कानडी भाषेतील शिलालेख मराठीत संपादित करून, यादवांच्या सत्तेचा विस्तार किती दूरवर पसरला होता, हे त्यांनी दाखविले आहे. त्यांच्या या अध्ययनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर नवा प्रकाश पडतो.

     शिलालेख, ताम्रपट आणि प्राचीन नाणी, यांचे संशोधन करीत असताना धर्मशास्त्राचा अभ्यास त्यांना आवश्यक वाटला. प्राचीन काळातील दानपत्रे, यज्ञादिकांचे उल्लेख, यांची उकल करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास त्यांना उपयुक्त ठरला.

     ‘साहित्य व संशोधन’ (१९५१) या त्यांच्या लेखसंग्रहात सात लेख आहेत; पण साहित्यापेक्षा त्यात संशोधनच अधिक आहे. मुकुंदराजाचा ‘कालनिर्णय’, महानुभाव व लिंगायत पंथ, द्राविडसीमेवरील मराठी, चक्रधर, एकनाथ, नरेंद्र अशा अनेक विषयांना येथे हात घातलेला दिसेल. उस्मानिया विद्यापीठाच्या ‘स्वाध्याय संशोधन पत्रिके’मधून ते सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करीत राहिले. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर येथील संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. प्राच्यविद्या परिषदांमधून शोधनिबंध वाचले. ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन व प्रकाशन केले. तीन स्वतंत्र,  तीन संपादित ग्रंथ, ३० लेख, ग्रंथपरीक्षणे व एक लघुकथाही त्यांच्या नावावर आहे. पण यापेक्षा महत्त्वाचे आहे, तो त्यांनी दिलेला वाङ्मयीन दृष्टीकोन. मराठीचे संशोधन फक्त महाराष्ट्रात राहून शक्य नाही. या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन पाहिले पाहिजे हे भुसारी यांनी दाखवून दिले. तसेच, भाषेचा अभ्यास अनेक अंगांनी कसा होतो, ते प्रा. भुसारी यांचे लेखन वाचले की अभ्यासकांच्या लक्षात येईल.

     शरीर थकले तरी त्यांचा व्यासंग अखंड चालू होता. शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान आणि आइन्स्टाइनचा सापेक्षतावादी सिद्धान्त यांची तुलना करण्याचा त्यांना ध्यास लागला होता. ज्ञानाची निरपेक्ष साधना करणार्‍या या विद्याव्रतीने हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी जगाचा निरोप घेतला.

    — डॉ. विद्या देवधर

संदर्भ
संदर्भ :

१.प्राचार्य भुसारी, र.म., डॉ. जोशी, उषा;  ‘मराठी स्वाध्याय संशोधन पत्रिका’, मराठी रिसर्च जर्नल, अंक १७; १९९१.

२. मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश; ‘पंचधारा’, जुलै-सप्टेंबर १९८६.
भुसारी, रघुनाथ महारुद्र