Skip to main content
x

राजवाडे, वैजनाथ काशीनाथ

अहिताग्नी राजवाडे

      वैजनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ वाग्वैद्य (philologist ) आणि नैरुक्त (व्युत्पत्तिशास्त्रज्ञ) होते. त्यांचा जन्म वरसई (तालुका पेण, जिल्हा रायगड) येथे फाल्गुन शुक्ल पंचमी, शालिवाहन शके १७५१ रोजी झाला. राजवाडे हे उपनाम असलेले लोक मूळचे जोशी या उपनामाचे शाण्डिल्य गोत्री चित्पावन ब्राह्मण होत. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजावाडी या गावचे. पुढे ते संगमेश्वर तालुक्यातील निंबे या गावी येऊन स्थायिक झाले होते. या मंडळींचा कुलस्वामी केशवराज, याचे मंदिर असूद या गावी आहे. कुलस्वामिनी योगेश्वरी, तिचे मंदिर अंबाजोगाई, बीड येथे आहे. राजवाडे घराण्यात भाषीय विद्येतील निपुण असे चार प्रसिद्ध वाग्वैद्य झाले. त्यात वैजनाथ काशीनाथ राजवाडे, इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे आणि पाली भाषेचे अभ्यासक (वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांचे थोरले चिरंजीव) चिंतामणी वैजनाथ राजवाडे यांचा समावेश होतो.

     वैजनाथ यांचे पितृछत्र त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षीच हरवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वरसई येथे, माध्यमिक शिक्षण अलिबाग येथे झाले. पुढे १८७५मध्ये ते पुण्यास आले. तेथील मेहुणपुरा भागात ते राहत होते. १८७६मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमधून ते मॅट्रिक झाले. त्यांचे हस्ताक्षर सुरेख होते. नंतर डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रि. रा. गो. भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली १८८३मध्ये ते बी.ए. झाले. १८८५मध्ये मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. १८८४-१८८५च्या सुमारास त्यांचा विवाह झाला. १८८५मध्ये ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य झाले.

पुण्यातील पंचहौद मिशन येथे मिशनरी लोकांबरोबर असलेल्या सभेत लो. टिळक, आगरकर यांसह उपस्थित राहिलेल्या सदस्यांमध्ये वैजनाथ राजवाडे उपस्थित होते. त्यानंतर तेथील ‘चहापाना’मुळे ‘चहा ग्रमण्य प्रकरण’ झाले. याबाबतीत प्रायश्चित घेण्यास त्यांनी नकार दिला होता.

      १८८६मध्ये ते कराची येथील दयाराम जेठमल महाविद्यालयामध्ये शिकवण्यास गेले. नामदार गोखले यांच्या विनंतीवरून ते कराची सोडून १८९६मध्ये पुण्यास फर्गसन महाविद्यालयात अध्यापन करू लागले. त्यांचे इंग्लिश आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांची सेवाज्येष्ठता दूर सारून रँ. र. मु. परांजपे यांना १९०२मध्ये फर्गनस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नेमण्यात आले, तरी तक्रार न करता त्यांनी उपप्राचार्यपद स्वीकारले. तसेच संस्थेचे सचिवपद सांभाळून रँ. परांजपे यांना सहकार्य केले. पं. मदनमोहन मालवीय यांच्याशी त्यांचा चांगलाच परिचय होता. मालवीयांनी त्यांना अधिक वेतनावर बनारस हिंदू विद्यापीठात स्थान देऊ केले, परंतु संस्थेशी एकनिष्ठ राहून वैजनाथ यांनी ते नाकारले. याच संस्थेच्या नानावडा येथील शाळेत त्यांनी पर्यवेक्षक म्हणूनही काम केले. ते गरीब विद्यार्थ्यांना आपल्या घरी ठेवून घेऊन, त्यांच्या शिक्षणास मदत करत. इ.स. १९१४मध्ये ते निवृत्त झाले.

     त्यानंतर त्यांनी ऋग्वेद, निरुक्त या विषयांच्या अध्ययनास सुरुवात केली. त्यांचे निरुक्ताचे इंग्लिश भाषांतर तसेच मराठी भाषांतर प्रसिद्ध आहे. ऋग्वेदातील अनेक शब्दांच्या अर्थांची चिकित्सा आणि अर्थनिर्णय करणारे त्यांचे अनेक लेख भांडारकर इन्स्टिट्यूटच्या अ‍ॅनल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. उदाहरणार्थ आद्रनस, विहायस, कृपा, मेहना, चित्र या शब्दांवरील लेख पहिल्या अंकातच प्रसिद्ध झाले. सुमारे साठ शब्दांवरचे त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. निरुक्त ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरात त्यांनी निरुक्तकार यास्क यांचा काळ, निरुक्ताचे गुणदोष, त्यातील व्युत्पत्तीची तत्त्वे इत्यादी विविध प्रश्नांची चर्चा केली आहे. अनेक परिशिष्टांनी तो ग्रंथ फारच उपयोगी ठरला आहे. निरुक्ताच्या मराठी अनुवादाची दुसरी आवृत्ती २०१४मध्ये धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंदिरात प्रसिद्ध केली आहे. राजवाडे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठता, सखोल अध्ययन आणि परखड चिकित्सक चर्चा. अन्य भारतीय अभ्यासकांप्रमाणे वेदाध्ययन म्हणजे वेदांचा प्रचार करणे या दृष्टीकोनाचा स्वीकार न करता अत्यंत तटस्थपणे त्यांनी वेदाध्ययन केले आहे. त्यामुळे त्यांना वास्तव अर्थाने ‘वाग्वैद्य’ किंवा ‘नैरुक्त’ म्हणता येईल.

      वैजनाथ राजवाडे यांचे दुसरे मोलाचे कार्य म्हणजे त्यांचा सार्वजनिक संस्थांमधील सहभाग. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट तसेच वैदिक संशोधन मंडळ या संस्थांची स्थापना करण्यात त्यांचा महत्त्वाचा भाग होता. भांडारकर संस्थेमध्ये ते एम.ए.संस्कृतचे अध्यापनसुद्धा कुठलेही मानधन न घेता करीत. एका बँकेच्या संचालक मंडळावरही ते होेते. अशा रितीने त्यांनी सामाजिक कार्यही केले. मात्र ते राजकारणापासून अलिप्त राहत. ते खर्‍या अर्थाने एका विद्वानाचे जीवन जगले. आपल्या तरुण मुलाचा अकाली अंत, धाकटे भाऊ इतिहासाचार्य राजवाडे यांचा अंत, वेडसर आईचा सांभाळ, नातवाचे शिक्षण यांसारख्या सांसारिक गोष्टीही त्यांनी सोसल्या. जीवनात काही वेळा आलेले अन्यायाचे प्रसंग सहन केले. यात त्यांची धीरगंभीर प्रवृत्ती दिसून येते. ते सतारही उत्तम वाजवत. वयाच्या चौर्‍याऐंशीव्या वर्षी त्यांचे देहावसान झाले.

     - गणेश उमाकांत थिटे

संदर्भ
१.निरुक्ताचे मराठी भाषांतर, राजवाडे संशोधन मंदिर, धुळे, २०१४ या पुस्तकाला आनंद दत्तात्रेय राजवाडे यांनी लिहिलेली प्रस्तावना.
राजवाडे, वैजनाथ काशीनाथ