Skip to main content
x

बरवे, मनहर गणपत

पंडित मनहर गणपत बरवे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई होते. संगीतशास्त्री गणपतराव बरवे राजकोट विद्यापीठात संगीत विषयाचे प्राध्यापक होते. वडिलांनी शरीरसौष्ठवाच्या बाळगुटी-बरोबरच संगीताचे बाळकडू आपल्या नर्मदा व मनहर या दोन्ही मुलांना पाजायला सुरुवात केली. मनहर दोन वर्षांचे असतानाच अचानक आनंदीबाईंचे निधन झाले. पण गणपतरावांनीच आई-वडील या दोन्ही भूमिका यशस्वीरित्या बजावत त्यांना सुसंस्कारित केले. दोघांनाही पुस्तकी शिक्षणाबरोबर संगीत व वादनकलेचे शास्त्रोक्त शिक्षण दिले. मनहर तीन वर्षांचे असताना, त्यांस पाश्चात्त्य व पौर्वात्य अशा दोन्ही कलांचे शिक्षण मिळाले. त्यांचे शालेय शिक्षण मात्र चौथीपर्यंतच झाले.

छोट्या मनहरची आकलनशक्ती व वडिलांचे प्रयत्न या सगळ्यांचे फलित म्हणजे छोट्या मनहरला सातव्या वर्षी श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या हस्ते ‘बालस्वरभास्कर’ (१९१८) ही पदवी सुवर्णपदकासह देण्यात आली. आठव्या वर्षी (१९१९) ‘संगीत सरस्वती’ व ‘संगीत पारिजात’, नवव्या वर्षी (१९२०) ‘बाल गायनाचार्य’, ‘बाल-संगीत भानू’, ‘स्वर कार्तिकेय’, ‘बाल-विद्याधर’ या चारही पदव्या मिळाल्या, तर ‘संगीत सम्राट’ ही पदवी त्यांना वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी (१९२१) मिळाली.

छोटे मनहर उत्कृष्ट गायक तर होतेच; पण कसलेले वादकही होते. ते एकूण ३४ वाद्ये वाजवीत असत. त्यांत १२ प्रकारची तंतुवाद्ये, ११ प्रकारची घनवाद्ये, १० प्रकारची सुषिरवाद्ये होती. ते तबलाही वाजवीत. प्रत्येक वाद्य तितक्याच तन्मयतेने, कौशल्याने वाजवीत. भारतातील सर्वांत जुनी व सर्वांत नवी तंतुवाद्ये ते अगदी लीलया वाजवीत असत. एकाच मंचावर अनेक वाद्ये वाजवीत असतानाच ते गातही असत. त्यामुळे गायन-वादनाचा एक अनोखा संगम पाहताना व ऐकताना रसिकांचे नेत्र व कान, दोन्हीही तृप्त होत. म्हणूनच नागपूरच्या तत्त्वज्ञान परिषदेने श्रीमान जगद्गुरू शंकराचार्य महाराज डॉ. कूर्तकोटी, यांनी मनहर यांना ‘गीतवाद्य-सुधाकर’ ही पदवी १९२४ साली बहाल केली. वयाच्या सातव्या वर्षापासून सतराव्या वर्षापर्यंत त्यांना एकूण नऊ पदव्या व १६९ सोन्याची पदके मिळाली. त्यांनी पूर्ण भारतभर आपल्या पिताश्रींसमवेत दौरे केले. अनेक संस्थानिक, राजे-महाराजे यांच्या दरबारी त्यांचेे जलसे होत. प्रत्येक दौऱ्याच्या शेवटच्या जलशाचे उत्पन्न ते धर्मादाय दान करीत असत. म्हैसूरच्या राजदरबारात त्यांचा १३ फेब्रुवारी १९२७ रोजी कार्यक्रम झाला. तेथे असलेला काष्ठतरंग त्यांनी इतका अप्रतिम वाजविला, की राजाने खुश होऊन त्यांना तो भेट म्हणून देऊ केला.

सिलोन, सिंगापूर, नेपाळ, ब्रह्मदेश इ. ठिकाणीही त्यांनी दौरे केले. ग्वाल्हेरच्या महाराजांनी त्यांना त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून २१०० रु. मानधन दिले. दौऱ्यावर असताना ज्या प्रांतात ते असतील, त्या  प्रांतातील उत्तमोत्तम कलाभिज्ञ लोकांना बोलावून आवडत्या चिजांचे नोटेशन करून ते पद बसवीत असत.

अनेक वर्षे गायन-वादनाचे जलसे करीत भ्रमण केल्यानंतर मुंबई ही त्यांची जन्मभूमी, तिथेच स्थायिक व्हावे या विचाराने १९३९ साली दादरला, खोदादाद सर्कल येथील ‘एम्प्रेस महल’मध्ये त्यांनी खोली घेतली. तेथे ‘मनहर संगीत विद्यालया’ची स्थापना केली. या विद्यालयामध्ये मनहर बरव्यांच्या तालमीत संगीतकार रोशन, मा. अनंत दामले, राम मराठे व प्रसाद सावकार असे अनेक गायक व वादक तयार झाले. श्रीमती जयमाला शिलेदार मुंबईत आल्या की काही गाण्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन घेत असत. अनिल मोहिलेही काही वर्षे गायन व व्हायोलिन शिकण्यासाठी बरव्यांकडे येत होते.

शिष्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दर शनिवारी मोठमोठ्या गायक व वादक कलाकारांना मनहर बरवे बोलावीत असत. संगीत शिक्षक संघाचे काम त्यांनी प्रदीर्घ काळ पाहिले.

एचएमव्हीने १९३० मध्ये त्यांच्या वाद्यवादनाच्या अनेक ध्वनिफिती काढल्या. पं. मनहरजींनी गुजराती, मराठी, हिंदी, बंगाली, सिंहली, उर्दू, कानडी, तेलुगू, तामीळ, मल्याळी, इंग्रजी, बरमीज इ. भाषांमध्ये गाणी गायली. महात्मा गांधींसमोर आपली कला सादर करून त्यांनी शाबासकीही मिळविली. गांधी हत्येनंतर उपोषणाला बसलेल्या साने गुरुजींनी मनहरजींची दोन पदे ऐकून आपले उपोषण सोडले होते.

अनेक भाषीय वृत्तपत्रांमधून त्यांची केलेली भरभरून स्तुती वाचल्यानंतर पं. मनहर बरवे हे किती थोर व्यक्तिमत्त्व होते याचा अंदाज येतो. साधेपणा, आदरपूर्वक वागणूक, संगीतशास्त्रातील असामान्य प्रभुत्व, संभाषण करण्याची हातोटी असे सर्वार्थानेच एक थोर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पं. मनहर बरवे यांचे मुंबईत निधन झाले.

मृदुला दामले

बरवे, मनहर गणपत