Skip to main content
x

लाखनीकर, परशुराम गोविंद

बापूसाहेब लाखनीकर

       भंडारा जिल्ह्यातील त्यावेळच्या साकोली तालुक्यातील लाखनी येथे परशुराम गोविंदबापू लाखनीकर यांचा जन्म झाला. घरात परंपरेने मालगुजारी चालत आल्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींना प्रौढत्वी नावाला जोडून बापू हे बिरूद लागत असे. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद व आईचे नाव जाईबाई  होते. त्यांच्या कुटुंबाला समाजात पूर्वापार प्रतिष्ठित असे स्थान होते. घरात भरपूर पैसा मिळवून देणारा व्यापार होता. त्यामुळे एकीकडे शिक्षण घेत असतानाच ते वडिलांना दुकानदारी सांभाळण्यात मदत करीत असत. पण व्यापाराइतकीच त्यांना शिक्षणातही आवड होती. इयत्ता ४ थी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना भंडारा व नागपूर अशी भटकंती करावी लागली. लाखनीला चौथी नंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे सधन कुटुंबातील मुलेच फक्त भंडारा व नागपूर असा प्रवास करून शिक्षण घेत असत. अशा परिस्थितीत सर्वसाधारण कुटुंबातील मुलांचे चौथी नंतरचे शिक्षण बंद पडत असे. आपल्या भागाची ही शैक्षणिक दुरवस्था पाहून १० जुलै १९४१ रोजी त्यांनी ‘समर्थ विद्यालय’ या नावाने स्वत:च्या वाड्यात शाळा सुरू केली व पुढे ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी’ या नावाने शिक्षण संस्थेची शासन दरबारी नोंदणी केली.

       त्यांच्या आयुष्याची पायाभरणी रा. स्व. संघाच्या शिस्तबद्ध व संस्कारसंपन्न वातावरणात झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणसंस्थेच्या उभारणीतही अशीच शिस्तबद्ध व संस्कारसंपन्न वातावरणनिर्मिती झाली. मुळातच अंत:करणापासून  समाजसेवेची आवड, त्यात संघसंस्कारांची भर व थोरामोठ्यांचा परिचय, तसेच अजोड असे संघटन कौशल्य यांच्या भरवशावर ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनीने. अनेक संकटांवर मात करीत प्रगतिपथावर वाटचाल केली.

        आजमितीला या शिक्षण संस्थेच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मिळून ६ विद्यालये, ६ कनिष्ठ महाविद्यालये, ५ प्राथमिक शाळा, ३ बालकमंदिरे, ४ सार्वजनिक वाचनालये, ५ वसतिगृहे तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय असलेले १ वरिष्ठ महाविद्यालय असा घटकसंस्थांचा विस्तार आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तसेच या संस्थेतून मिळविलेल्या संस्कारांचा वारसा ते अभिमानाने सांगतात.

       बापूसाहेबांच्या या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत प्रामुख्याने अ‍ॅड. भास्करराव निनावे, रामभाऊ ढेंगे, गोविंदराव पोहरकर, देवरावजी चेटुले यांचा तसेच घटकसंस्थांच्या विविध पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. कोणतेही मोठे कार्य यशस्वी होण्यासाठी एकाचा निर्धार व अनेकांचे सहकार्य आवश्यक असते व असे सहकार्य मिळविण्यासाठी निर्धार करणारी व्यक्ती कुशल संघटक असावी लागते. बापूसाहेब त्या अर्थानेच कुशल संघटक, समाजसेवाव्रती लोकनेते होते.

       त्यांनी शिक्षणाबरोबरच अनेक क्षेत्रात तितक्याच तळमळीने आपले अमूल्य योगदान दिले आहे. पत्रकारिता, सहकारक्षेत्र, कृषिक्षेत्र, साहित्य चळवळ, राष्ट्रभाषा प्रचारसमिती यातही त्यांचे शिक्षणक्षेत्राइतकेच भरीव योगदान आहे.

       त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासना तर्फे १५ ऑगस्ट १९६७ रोजी त्यांना आदर्श शिक्षकाचा राज्यपुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले. विमा व्यवसायातही उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल ३१ जानेवारी १९८५ ला औरंगाबाद येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच २६ सप्टेंबर १९९३ रोजी मा. बा. गांधी प्रतिष्ठानचा ‘कुष्ठमहर्षी डॉ. शिवाजीराव पटवर्धन वयोवृद्ध समाजसेवक पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय अनेक छोट्या - मोठ्या संस्थांनी त्यांना विविध प्रसंगी गौरवांकित केले आहे.

      भंडारा जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या उभारणीत लाखनीकर यांचे मोलाचे योगदान होते. ‘उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्म योगे वय घालवावे’ हे समर्थ रामदासस्वामींचे वचन, हा त्यांचा आवडता श्‍लोक होता.

- डॉ. संजय गोविंदराव पोहरकर

लाखनीकर, परशुराम गोविंद