Skip to main content
x

पवार, कुलदीप वसंत

     चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि दूरदर्शन यावर नायक, खलनायक आणि विनोदी भूमिका दमदारपणे साकारणारे आणि प्रसंगी स्वतःच पटकथाही लिहिणारे अभिनेते कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील वसंतराव मोटारसायकलींच्या एजन्सीमध्ये काम करत आणि आई शांतादेवी यांनी गुजराथी शाळा चालवली होती. कुलदीप वसंत पवार यांना अभिनयाचा वारसा नसला तरी आई शांतादेवी उत्तम नकला करत असत, तर वडील व्हायोलीन व माऊथऑर्गन वाजवत असत.

     कुलदीप पवार यांचे शिक्षण कोल्हापूरला ‘सेट झेवियर्स’ स्कूलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. याच वयात त्यांनी सुलोचनादीदींच्या हस्ते बक्षिसेही पटकावली. ‘ज्यांना दुसरं काही करता येत नाही ते सिनेमात जातात’ अशी समजूत असण्याच्या काळात पवार यांनी याच क्षेत्रात यायचे निश्‍चित केले. तेव्हा त्यांना घरातून विरोधही झाला. अभिनयाऐवजी आजोबांची ‘जयश्री’, ‘प्रताप’, ‘वसंतबहार’ ही सांगली-कोल्हापूरची थिएटर्स सांभाळ, असे त्यांना सांगण्यात आले. पण अभिनयाकडे ओढा आणि घरचा कडाडून विरोध अशा कात्रीत सापडलेले पवार वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून पळून कऱ्हाडला आले आणि ‘हिंदुस्थान गिअर्स’ नावाच्या कंपनीला कास्टींग पुरवणाऱ्या फाऊंड्रीत कामाला लागले. लेथवर काम केल्यावर खाली पडणारा कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्यात आले. फक्त रु. ९०/- पगार घेणारे कुलदीप काम संपल्यावर संध्याकाळी कामगारांची नाटके हौसेने बसवायचे. याच काळात कुलदीप पवार यांच्याकडे दिग्दर्शक कृष्णा पाटील यांचे लक्ष गेले आणि ‘एक माती अनेक नाती’ या चित्रपटातल्या नायकाच्या भूमिकेसाठी त्यांना विचारणा झाली. हा कुलदीप पवार यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांची नायिका होती अनुपमा, तर खलनायक होते चित्तरंजन कोल्हटकर. परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र या चित्रपटामुळे ‘आपल्या अभिनयात अजून खुलेपणा, परिपक्वता येण्याची गरज आहे’ हे कुलदीप पवार यांना स्वतःलाच जाणवले. यानंतर पवार पुण्याला आले. तेथे ते ‘राजहंस’ आणि ‘माउली’ या मासिकांसाठी विपणन करू लागले. अभिनयाचा योग्य मार्ग दाखवतील असे वाटणारी अनेक माणसे त्यांना या काळात भेटली, मात्र प्रत्यक्षात काम हाती आले नाही. मुंबईतल्या स्टुडिओंना भेटी दिल्या तर काही काम होईल, असे वाटून कुलदीप पवार पुणे सोडून मुंबईला आले. स्टुडिओतली पायपीट सुरू झाली आणि पोटासाठी बंगाली माणसाच्या कारखान्यात चेपलेल्या गाड्यांना रंग देण्याचे काम त्यांनी सुरू केले. या काळात त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळत नसल्यामुळे नैराश्य आले.

     याच काळात भारदस्त आवाजाच्या आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या पण दाढी वाढलेल्या पवारांशी गाडगीळ नावाच्या गृहस्थांशी ओळख झाली. ते पवारांना ‘नाट्यसंपदे’च्या कार्यालयामध्ये घेऊन गेले व पवारांच्या रूपात दाजी पणशीकरांना ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाकरता जसा हवा होता तसा संभाजी सापडला. या नाटकाचा पहिलाच प्रयोग बेळगावला झाला, तो एकदम सुपरहिट, हाऊसफुल ठरला. याचे पुढे ३५० हून अधिक प्रयोग झाले. पुढे नाट्यसंपदा आणि कुलदीप पवार हे अतूट समीकरण झाले. या भूमिकेमुळे अभिनयाचा रस्ता त्यांच्यासाठी खुला झाला.

     नाटकामध्ये सर्व प्रकारच्या भूमिका केल्याशिवाय चित्रपटात काम करणार नाही, असे ठरवणाऱ्या कुलदीप पवार यांनी ऐतिहासिक, फार्सिकल, तसेच लोकनाट्यही केली. ‘नकटीच्या लग्नाला’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘गोलमाल’, ‘पाखरू’, ‘रखेली’, ‘निष्कलंक’, ‘खेळ थोडा वेळ’, ‘बायांनो नवरे सांभाळा’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पती सगळे उचापती’, ‘एन्काऊंटर’, ‘राजकारण गेलं चुलीत’ अशी अनेक नाटके त्यांनी केली, गाजवली. त्यांनी ‘गीतगोविंद’ नावाची स्वतःची नाट्यसंस्थाही काढली.

     पवार यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले ते गोविंद कुलकर्णी यांच्या ‘जय तुळजाभवानी’ या चित्रपटामधून एका छोटाशा भूमिकेद्वारे. या चित्रपटाच्या  चित्रीकरणादरम्यान अनंत माने यांनी त्यांच्या ‘कलावंत’ या चित्रपटासाठी खलनायक म्हणून पवार यांना साईन केले. अनंत माने यांच्याबरोबर कुलदीप पवार काम करत आहेत, हे कळल्यावर दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी त्यांच्या ‘दरोडेखोर’ या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. हा चित्रपट मराठीतल्या अभिजात चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर कुलदीप पवार यांनी केलेला ‘जावयाची जात’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. रांगडा, मराठमोळा मर्द नायक या चित्रपटात त्यांनी अतिशय प्रभावीपणे साकार केला. यानंतर त्यांच्या उत्तमोत्तम चित्रपटांची मालिकाच प्रेक्षकांसमोर आली. ‘अरे संसार संसार’, ‘शापित’, ‘सर्जा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘मर्दानी’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘नेताजी पालकर’, ‘पायगुण’, ‘हिरवा चुडा’, ‘खरा वारसदार’, ‘एकापेक्षा एक’, ‘आई तुळजाभवानी’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘देवाशपथ खोटं सांगेन, खरं सागंणार नाही’, ‘वजीर’, ‘तहान’, ‘सुपारी’, ‘श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘संसार पाखरांचा’, ‘मला एक चानस हवा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘भारतीय’ इ. चित्रपट करणाऱ्या कुलदीप पवार यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. भूमिकांचे असे वैविध्य फारच कमी जणांच्या वाट्याला येते.

     कुलदीप पवार यांनी ‘प्रोफेसर प्यारेलाल’, ‘दूध का कर्ज’, ‘जीत’ असे मोजके हिंदी चित्रपटही केले. त्यांच्या ‘परमवीर’, ‘तू तू मै मै’, ‘वक्त की रफ्तार’ या हिंदी तर ‘बंदिनी’ ही मराठी मालिका लोकप्रिय झाली. त्यांची ‘परमवीर’ ही डिटेक्टीव्ह मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांत बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. अभिनेता कुलदीप पवार यांच्यामध्ये एका पटकथाकाराचे काही पैलूही आहेत. त्यांनी ‘बंदिनी’, ‘परमवीर’ या मालिकांचे काही भाग स्वतः लिहिले आहेत.

     कुलदीप पवार यांच्या ‘सत्ताधीश’मधील भूमिकेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून ‘हळद-कुंकू’ चित्रपटातल्या भूमिकेला विशेष लक्षवेधी भूमिका म्हणून आणि ‘एन्काऊंटर’ या नाटकाला नाट्यगौरव पुरस्कार मिळाले आहेत.

     ४१ वर्षांहून अधिक काळ अभिनयक्षेत्रात बहुरंगी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कुलदीप पवार यांच्या पत्नी नीलिमा यांनी ऐश्वर्य आणि समृद्ध या दोन मुलांसह घरची आघाडी सुरळीत सांभाळली.

       - स्वाती प्रभुमिराशी

पवार, कुलदीप वसंत