काळे, वसंत पुरुषोत्तम
व.पु. काळे यांनी एस.एस्सी.नंतर आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना चित्रकला व छायाचित्रकला यांची मनापासून आवड होती. त्यांचे हस्ताक्षर वाचकांना आकर्षित करणारे होते. व.पुं.ची पत्रे ‘प्लेझर बॉक्स’मध्ये त्यांच्यासह इतरांना आनंद देणारी आहेत. ती ‘वपुर्झा’ म्हणून गौरवली आहेत. एक कथाकार असण्यापेक्षा व.पुं.ना कथाकथनकार म्हणून राहणेे पसंत होते. त्यांची निवेदन शैली वाचकप्रिय नसून श्रोतेप्रिय आहे. त्यांनी कथाकथनात स्वतःचा ठसा उमटवला आहे. कथाकथनाबरोबरच त्यांनी कथालेखनही तितक्याच प्रभावीपणे केले. त्यांच्या कथेचे हे कार्य वाङ्मयीन नसून सांस्कृतिक आहे. कथेपेक्षा वाचकाशी संवाद करण्याच्या निमित्ताने त्यांनी ‘आपण सारे अर्जुन’ नावाचे आगळे-वेगळे चिंतन करणारे पुस्तक लिहिले, पण त्यातही वाचकांपेक्षा श्रोत्यांनाच दाद मिळते. आपली महानगरपालिकेतील नोकरी सोडून त्यांनी कथाकथनाचा व्यवसाय केला. मुंबईसारख्या महानगरीतील उच्च मध्यमवर्गीय माणसांचे चित्रण हा त्यांच्या कथेचा व कथानकाचा कणा आहे. ‘लोंबकळणारी माणसं’ (१९६०), ‘पण माझ्या हातांनी’ (१९६२), ‘मी, माझी सौ आणि तिचा प्रियकर’ (१९६४), ‘मायाबाजार’ (१९७७) इत्यादी कथासंग्रहांमध्ये त्यांची वरील वैशिष्ट्ये प्रतिबिंबित झालेली आहेत. ‘ही वाट एकटीची’ (१९८१) ही कादंबरी अशी वैशिष्ट्ये वागवते. ‘पुन्हा प्रपंच’ आणि ‘गजरा’ ही दूरदर्शनवरील व आकाशवाणीवरील नाट्ये व.पुं.ना भरपूर प्रसिद्धी देऊन गेली. चटकदार संवाद, आकर्षक निवेदनशैली यांमुळे आजही त्यांची कथा वाचकप्रिय आहे. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून व.पुं.चा गौरव केला जातो.
व.पुं.चे वडील नाट्यसृष्टीतील एक नावाजलेले नेपथ्यकार होते. त्यांचा प्रभाव व.पुं.च्या व्यक्तिमत्त्वावर व कथारचनेवर पडलेला दिसतो. नाट्य, संगीत व शिल्प ही कलेची क्षेत्रे व.पुं.ची मर्मबंधने आहेत. व.पुं.चे जगणे ही एक मैफल होती. ही मैफल कलेशी बांधिलकी घेऊन रसिकांना भरपूर दाद देत असे. व.पुं.नी दाद देण्याची ही किमया आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत जपून ठेवली होती. कलासक्ती आणि रसिकता ही त्यांची कवचकुंडलेच होती. व.पुं.नी जी कथा लिहिली आणि सांगितली. ती जुन्यात नवी व नव्यात जुनी होती. या कथेने मराठी कथेच्या वाटचालीतला प्रारंभ, मध्य आणि त्यानंतरचा वाहता प्रवाह अजमावून त्यांतली स्वतःची अशी खास वाट ठळकपणे समोर ठेवली आहे. त्यांनी आपला खास रसिकवर्गही निर्माण केला होता. रविकिरण मंडळाने जशी मराठी कविता वाचकसन्मुख केली, तशी व.पुं.नी मराठी कथा घराघरांत लोकप्रिय केली. कथाकथनातही कथा ‘चिअर्स’ मिळवणारी आहे. त्यांची संवादप्रिय कथा रसिकांना ‘वपुर्झा’ बहाल करते. नव्याने ‘झपूर्झा’ची अवस्था प्राप्त करून देते. या कथेतला आशय हलका-फुलका, तडजोडीचा, सवंग लोकप्रियतेचा असला, तरी त्यामागचे व.पुं.चे व्यक्तिमत्त्व, रसिकत्व, कवित्व पुढे परतत्त्वाकडे जाणारेच आहे. ह्या दृष्टीने त्यांचा ‘टेकाडे भाऊजी’ पुन्हापुन्हा आठवून पाहावा. रंजनाचे सूत्रही ‘प्लेझर बॉक्स’मध्ये चिरंतन ठेवा ठेवून जाते. व.पुं.च्या कथेचे हे सार आहे. कलाक्षेत्रातला व.पुं.सारखा बहुरंगी प्रवासी समेवरच्या रंगदार मैफलीत रसिकरंजन करत आपल्या मैफलीची नजाकत आकर्षित करतो, हे विशेष आहे.
‘वाट पाहणारे घर’ हा कविता संग्रह त्यांच्या पत्नीची वेगळी आठवण जागवून देतो. व.पु.काळे हे डिसेंबर १९९९ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनास त्यांनी रसिक संमेलन असे म्हटले आहे. यात त्यांनी अध्यक्षीय भाषणाऐवजी रसिकांच्या गप्पा आयोजित केल्या होत्या. कथेत त्यांनी फँटसीचा मनसोक्त उपयोग केला. या दृष्टीने त्यांची ‘भदे’ ही गाजलेली कथा पाहता येईल. त्यांच्या कथेत फँटसीने एक नवी वाट निर्माण केली. त्यांची कथा विनोद आणि कारुण्य यांचे कलात्मक मिश्रण असते. त्यांनी मराठी वाचकांना ‘श्रवणीय कथा’ दिली. लोकप्रियतेच्या पातळीवर त्यांच्या कथासंग्रहांच्या अनेक आवृत्त्या निघूनही ही लोकप्रियता सवंग नाही.
पुढे त्यांनी आपल्या ‘पार्टनर’ कादंबरीचे नाट्यांबरीत रूपांतर करूनही ती सवंग झाली नाही. व.पुं.नी वाचकांशी सतत बांधिलकी ठेवून कथा लिहिली. टीकाकारांनी उपेक्षित ठेवलेला हा कथाकार लोकप्रियतेत मात्र मागे राहिला नाही. याचे कारण पुढच्या श्रोत्यास किंवा वाचकास ते कथा सांगत नाहीत तर कथा जगावयास शिकवतात. यात आर्किटेक्चर, इंटिरिअर डेकोरेशन, चित्रकला, फोटोग्राफी, संगीत अशा विविध सांस्कृतिक वळणांचे दर्शन घडते. त्यामुळे ही कथा समाजाभिमुख होत संस्कृतीचे वेगळे दर्शन घडवते.
काळे यांना त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखक सन्मान,फाय फाउंडेशन पुरस्कार , पु. भा.भावे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अमेरिका येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.