Skip to main content
x

फाटक, नरहर रघुनाथ

     शहाण्णव वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या नरहर रघुनाथ फाटकांनी १९व्या शतकाची सरती १७ वर्षे आणि २०व्या शतकाची, सततच्या राजकीय, सामाजिक घडामोडींची जवळपास ८० वर्षे पाहिली आणि अनुभवली. समजू लागल्यापासून त्यांनी २० व्या शतकाकडे डोळसपणे आणि चिकित्सक बुद्धीने पाहिले. त्या शतकातील घडामोडींचे चढउतार अनुभवले, कारण ते वृत्तपत्रसृष्टी आणि शैक्षणिक विश्वात कायमच वावरले. तसेच साहित्याच्या प्रांतात स्वतःची नाममुद्रा उमटवणार्‍या दर्जाचे लेखन त्यांनी अखंडपणे केले.

     त्या वेळच्या भोर संस्थानातील जांभळी गावात त्यांचा जन्म झाला. मूळ घराणे कोकणात कनोदचे, पण आजोबा भोर संस्थानचे कारभारी होते म्हणून तेथे स्थायिक झाले. वडील उत्तर हिंदुस्थानात सरकारी अधिकारी असल्याने नेहमी त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे फाटकांचे शिक्षण भोरप्रमाणे पुणे, अजमेर, इंदूर, अलाहाबाद येथेही झाले. १९१७ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन ते अलाहाबाद विद्यापीठातून बी. ए. झाले. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ह्यांचेही ते विद्यार्थी होते. पुढल्या काळात त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने मुंबईत झाले आणि उमेदीच्या काळात त्यांचा वृत्तपत्रांशी जवळचा संबंध आला. वयाच्या पन्नाशीत ते शैक्षणिक क्षेत्रात आले. १९३५ ते १९३७ ह्या कालावधीत ते एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिव्हर्सिटीत आणि नंतर १९३८ ते १९५७ माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठीचे प्रमुख प्राध्यापक होते. पत्रकार हाही एकापरीने समाजाचा शिक्षकच असतो. त्यांची पत्रकारिता जागरूक होती आणि समकालीन राजकीय सामाजिक जीवनाचे व त्या-त्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचे ते डोळस निरीक्षक व चिकित्सक भाष्यकार होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखीही पैलू होते वि.का. राजवाडे यांच्या इतिहास संशोधनाचा संस्कार त्यांच्यावर झाला आणि इतिहास-संशोधन हे त्यांचे क्षेत्र झाले. इतिहास-संशोधनात राजवाडे कधीकधी ज्या अनैतिहासिक व अवास्तव कल्पना करीत, त्यांचा विसर फाटकांना कधी पडला नाही. ते सदैव सत्यान्वेषीच राहिले.

     फाटकांना इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू ह्या भाषा नुसत्याच अवगत होत्या असे नव्हे, तर त्या-त्या भाषांमधील साहित्याचा व्यासंग त्यांनी केला होता. शिवाय पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. चित्रकलेच्या परीक्षाही त्यांनी दिल्या होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रखरच होते. ते विचाराने मूर्तिभंजक, वृत्तीने वादप्रिय (वाद ओढवून घेणारेही), आपल्या व्यासंगाचा आणि अभ्यासाचा अभिमान बाळगणारे तसेच व्यासंग नसलेल्या माणसांबद्दल तुच्छता बाळगणारे होते. मात्र खर्‍याखुर्‍या ज्ञानी व विभूतिमत्त्व असलेल्या माणसापुढे नम्र, निदान मवाळ होणारे होते. ज्ञानाच्या हेतूशिवाय अन्य कशासाठी म्हणून अफाटवाचन केले नाही. ते अखंड ज्ञानव्रती होते.

     वृत्तपत्र क्षेत्रात वावरताना त्यांचा नाट्याचार्य कृष्णा प्रभाकर खाडीलकरांशी संबंध आला. उत्तरोत्तर तो संबंध वाढत गेला आणि ‘नवा काळ’चे ते नुसतेच सहसंपादक झाले नाहीत तर एक जबाबदार घटक होऊन गेले. पुढे १९३९मध्ये ‘संध्यादैनिक’ सुरू झाले, तेव्हाही त्याचे पालनपोषण, जतन त्यांनी केले. १९२९ साली खाडीलकरांना तुरुंगवासाची शिक्षा झाली, ती फाटकांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे. फाटक काही काळ ‘इंदुप्रकाश’चे संपादक होते, पण त्या वृत्तपत्रात त्यांनी सतत लेखन केले. अगदी प्रारंभापासून! ‘सुबोधपत्रिका’, ‘विविधवृत्त’ (रा. का. तटणीस), ‘आलमगीर’ (चं. वि. बावडेकर) ह्या वृत्तपत्रांमध्येही ते लिहीत. ‘विविधवृत्ता’तील अग्रलेख, ‘अंतर्भेदी’ ह्या नावाने प्रख्यात व्यक्तींची निःस्पृहपणे रेखाटलेली व्यक्तिचित्रांची लेखमाला, ‘आलमगीर’च्या अंकातील ‘मंगलचिंतन’ हा लेख; हे सर्व फाटकांनीच लिहिले होते. ‘सत्यान्वेषी’, ‘फरिष्ता’ ह्या टोपणनावांनीही त्यांनी लिहिले. त्यांना तोंडाने मजकूर सांगून लिहवून घेणे कधी जमले नाही आणि रुचलेही नाही. कागद, पेने, पेन्सिली इत्यादी लेखन साहित्याच्या नाविन्याची आणि विविधतेची त्यांना अतिशय हौस होती.

     काळ मग तो इतिहास काळ असो किंवा प्रचलित वर्तमानकाळ असो. फाटकांचे त्याच्याशी एक अतूट नाते बांधले गेले होते. हा काळ त्यांनी आपल्या लेखनातून नेहमी जिवंतपणे उभा केला. एखाद्या ग्रंथाचे लेखन करावयाचे असले की त्यातील विषयांशी संबंधित सर्व पुस्तके एकत्र करून ते ती अगदी हाताशी ठेवीत आणि ते ग्रंथलेखन झाले की ती पुस्तके आपापल्या जागी ठेवली जात. त्यामुळेच त्यांनी अफाट असा ग्रंथसंग्रह केला होता. उत्तर आयुष्यात त्यांनी हा ग्रंथसंग्रह रुईया महाविद्यालयाचे ग्रंथालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इत्यादी संस्थांना अर्पण केला. ह्या लेखनाबाबत एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. लेण्यात ज्याप्रमाणे शिल्पे चिरकाल असतात, त्याप्रमाणे त्यांच्या स्मरणात वाचलेले सारे कायम साठवले जायचे - अगदी वज्रलेप! टिपणे कधीकधी संक्षिप्त स्वरूपात करायचे. पण त्यावाचून त्यांचे अडले नाही. हे स्मरणच त्यांच्या वृत्तपत्रीय, प्राध्यापकीय जीवनात त्यांच्या साथ-सोबतीला आले.

     इतिहास काळाशी निगडित अशा संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यातूनच ‘श्रीज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’ (१९४९), ‘श्रीएकनाथ-वाङ्मय आणि कार्य’ (१९५०), ‘श्रीरामदास - वाङ्मय आणि कार्य’ (१९५३ आणि १९७०), ‘श्रीज्ञानेश्वर - वाङ्मय आणि कार्य’ (१९५४) अशी ग्रंथरचना त्यांनी केली.  त्यात भक्तीचा भाबडेपणा नव्हता. विश्लेषण, चिकित्सा, समालोचन, आस्वाद, मूल्यमापन ह्यांबरोबरच ते वाङ्मय म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. ही स्वच्छ दृष्टी होते. ‘मराठेशाहीचा इतिहास’, ‘नारायणरावाचा खून की आत्महत्या?’, (नवा काळमधली लेखमाला), ‘१८५७ची शिपाईगर्दी’ (१९५८), ‘यशवंतराव होळकरांचे चरित्र’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. 

     ‘रामदास-शिवाजी’ ह्यांची पहिली भेट खरोखरी केव्हा झाली? ह्यासंबंधी त्यांचे इतिहास संशोधकांबरोबर दीर्घ वाद झाले. समर्थ रामदासांनी ‘दासबोधा’त योजिलेला राजकारण हा शब्द आजच्या प्रचलित अर्थानुसार म्हणजे पॉलिटिक्स- राजनीती ह्या अर्थाने योजिलेला नसून चातुर्य, शहाणपण, तीक्ष्ण बुद्धी, युक्ती असे अर्थ समर्थांना अभिप्रेत होते- असे त्यांचे प्रतिपादन असे. ‘१८५७ शिपाईगर्दी’ असे म्हणताना त्या गर्दीच्या म्होरक्यांना राष्ट्रवाद इत्यादी काहीही माहिती नव्हते. त्याची कल्पनाच त्यांना नव्हती, हे ते स्पष्ट करीत. “मैं कभी झाँशी नही दूँगी” असे म्हणणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनाही त्याची कल्पना नव्हती, असे ते म्हणत. ह्यामुळे त्यांच्यावर टीकेचे वादळ उठले. अत्र्यांनी त्यांना ‘नराधम’ म्हटले आणि टीकेचे आसूड ओढले. ह्याच १८५७ च्या बंडाच्या काळात वरसईचे विष्णुभट गोडसे उत्तर हिंदुस्थानात पायी प्रवास करीत होते. ‘झांशीला इंग्रजांशी झालेल्या लढाईत झाशीच्या किल्ल्यात अकरा दिवस ते राहिले होते. इंग्रजांनी केलेली झांशी शहरातील लूट त्यांच्या डोळ्यांदेखत झाली होती. गोडसे भटजींनी ह्या बंडाची हकिकत त्यांच्या ‘माझा प्रवास’मध्ये सांगितली आहे. इतिहासाचार्य चिंतामणरावांनी- वैद्यांनी ते पुस्तक संपादित केले. फाटकांनी त्या पुस्तकाच्या नंतरच्या आवृत्तीत वैद्यांच्या संपादनातील ढिसाळपणा, गफलती तसेच मूळ मजकूर गाळणे किंवा त्या जागी स्वतःचा मजकूर घुसडणे अशा गफलतींबद्दल प्रस्तावनेत वैद्यांना धारेवर धरले आहे. फाटकांनी मूळ मजकूर कोणता होता हे स्वतंत्र परिशिष्टात दाखवले आहे.

     ‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे’, ‘आदर्श भारत सेवक’- गोपाळ कृष्ण गोखले, ‘लोकमान्य’ (टिळक), ‘नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर’ ह्यांची चरित्रेही त्यांनी लिहिली. गोखल्यांच्या चरित्राबद्दल फाटकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. न्यायमूर्ती रानडे आणि नामदार गोखले ह्यांची विचारसरणी त्यांना सर्वार्थाने मान्य होती आणि टिळकांबद्दल त्यांच्या मनात अढी होती आणि राग होता; पण टिळकांचा व्यासंग, विद्वत्ता, गीतारहस्याची निर्मिती, स्वराज्यप्राप्तीसाठीचा अहर्निश उद्योग, सोसलेले तुरुंगवास ह्या गोष्टींनी फाटकांना जिंकले होते ह्याचा स्वच्छ प्रत्यय ‘लोकमान्य’मध्ये येतो. नरसिंह चिंतामण केळकरांनी लोकमान्य टिळकांचे चरित्र तीन खंडांमध्ये लिहिले. ह्या चरित्रात केळकरांनी सांगितलेल्या घटना, व्यक्तीविषयक निर्देश ह्यांत चुका आणि कालविपर्यास कसा झाला आहे, हे ‘विविधज्ञानविस्तारा’त अनेक परीक्षणात्मक लेख लिहून फाटक केळकरांची हजेरी घेत परखडपणे दाखवतात. त्यांनी आयुष्याच्या उत्तरावस्थेत ‘मुंबई शहराचा इतिहास’ लिहिला. ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’ (१९४९) हे लोकहितवादी, जोतिबा फुले ह्यांचे महत्त्व सांगणारे पुस्तकही लिहिले.

     प्राध्यापक म्हणून त्यांचे वैशिष्ट्य असे की, वाङ्मयाभ्यास करताना त्याचे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ सांगण्यावर त्यांचा नेहमी भर असे. ललित वाङ्मयकृतीची मात्र ते कधी रसिकतेने समीक्षा करीत नसत. ललित वाङ्मयकृतीकडे अलिप्तपणे कोरडेपणानेच पाहत.

     आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी चीनचा व रशियाचा प्रवास केला होता. ‘रशियाचे संक्षिप्त दर्शन’ (१९५५) नामक प्रवासवर्णनही लिहिले होते. 

     भारत इतिहास संशोधन मंडळ; प्राज्ञ पाठशाळा मंडळ, वाई; मुंबई मराठी साहित्य संघ; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ; अशासारख्या संस्थांचे ते सदस्य व पदाधिकारी होते.

     फाटकांचे व्यक्तिमत्त्व असे चतुरस्र आणि बावनकशी होते.

- डॉ. चंद्रकांत वर्तक

फाटक, नरहर रघुनाथ