फोंडके, गजानन पुरुषोत्तम
बहुआयामी वैज्ञानिक व्यक्तिमत्त्वाच्या गजानन पुरुषोत्तम तथा बाळ फोंडके यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यानंतर मुंबईत विल्सन महाविद्यालयामधून बी.एस्सी. करून त्यांनी १९६० साली मुंबई विद्यापीठाची सैद्धान्तिक भौतिकशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी मिळवली. लगेचच ते भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. या एक वर्षाच्या प्रशिक्षणातून हे केंद्र अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ तयार करण्याचे बीज पेरते. काही वर्षे तेथे संशोधन केल्यानंतर फोंडके लंडनला गेले व तेथे १९६७ साली त्यांनी प्रोफेसर जॅक अॅम्ब्रोज यांच्या मार्गदर्शनाखाली जैवभौतिकीशास्त्रातील लंडन विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रातील रेडिओबायोलॉजी या विभागात काम करत असताना, फोंडके यांना नव्याने विकसित होत असलेल्या प्रतिरक्षाशास्त्र (इम्युनोलॉजी) या विषयाने आकर्षित केले. जैवभौतिकी संबंधित संशोधनाबरोबर त्यांनी प्रतिरक्षाशास्त्राचा अभ्यास सुरू केला. रक्तातील पांढर्या पेशींच्या बाह्य आवरणातील प्रथिने व त्यांचा पेशी कार्यातील सहभाग, लिंफोसाइट या पेशींची वाढ व त्यांचे विभेदीकरण (डिफरन्सिएशन) इत्यादी महत्त्वाच्या विषयांत त्यांनी संशोधन केले. १९६० ते १९८३ या २३ वर्षांच्या काळात त्यांचे अनेक शोधनिबंध उत्तम दर्जाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले.
भाभा अणु संशोधन केंद्रात असताना, डॉ. फोंडके रेडिओबायोलॉजी या विभागाचे प्रमुख होते. या काळातच त्यांनी मराठीत छोट्या-छोट्या विज्ञानकथा व विज्ञान विषयावर वर्तमानपत्रीय लिखाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले होते. त्या काळात कर्करोग संशोधनात अग्रेसर मानल्या जाणार्या चेस्टर बीटी संशोधन संस्था व कॅन्सास विद्यापीठ वैद्यकीय केंद्र येथे त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पेशींच्या आवरणावर होणार्या अनेक जैविक प्रक्रियांविषयी संशोधन केले. परदेशांतील व देशातील परिषदा, परिसंवाद, कार्यशाळा यांत सहभाग घेऊन त्यांनी आपले शोध इतर शास्त्रज्ञांसमोर मांडले. त्यांनी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संशोधनक्षेत्रात अशी भरीव कामगिरी करूनही त्यांच्या मनातली विज्ञानलेखन, संपादन व विज्ञानप्रसाराची आच सरस ठरली. त्यांच्या आयुष्यात एक मोठे परिवर्तन झाले. १९८३ साली त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ‘सायन्स टुडे’ या विज्ञानविषयक मासिकाच्या संपादकत्वाची जबाबदारी स्वीकारली. अल्पकाळात त्यांनी या मासिकाच्या अंतरंगात व बाह्यरंगात आमूलाग्र बदल करून त्या मासिकाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला. या कामगिरीमुळे त्यांना टाइम्स गटाच्या वृत्तपत्रांचे विज्ञानविषयाचे संपादकत्व बहाल करण्यात आले.
परंतु टाइम्स गटात ते फार काळ रेंगाळले नाहीत. ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ या भारत सरकारच्या प्रचंड आकाराच्या संस्थेच्या प्रकाशन आणि माहिती विभागाचे संचालक म्हणून त्यांनी मोठे आव्हान स्वीकारले आणि आपले बस्तान दिल्लीला हालवले. १९८९ ते २००३ या १४ वर्षांत त्यांनी या संस्थेद्वारे अनेक उपक्रम राबविले. हा विभाग ‘विज्ञान प्रगती’ व ‘सायन्स रिपोर्टर’ ही मासिके प्रकाशित करत असे. अल्पकाळात फोंडके यांनी या दोन्ही मासिकांचा चेहरामोहरा बदलला आणि ती भारतभर लोकप्रिय झाली. लवकरच प्रकाशन व माहिती विभागाचे कार्यबाहुल्य व उंचावलेला दर्जा लक्षात घेऊन सी.एस.आय.आर.ने त्याला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा दिला व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सायन्स कम्युनिकेशन’ (निस्कॉम) या संस्थेची निर्मिती झाली. ‘निस्कॉम’ या संस्थेमार्फत त्यांनी विविध वैज्ञानिक विषयांवर भारतातील शास्त्रज्ञांकडून उत्तम पुस्तके लिहून घेतली व ती प्रकाशित केली. या पुस्तकांचे मूल्य माफक असल्याने विद्यार्थिवर्ग ती हमखास विकत घेत असे. निस्कॉमचे संचालक असताना त्यांनी सीडी रॉमद्वारे वैज्ञानिक माहिती एकत्र करण्याचे ठरवले. भारतातील नैसर्गिक संपत्तीची नोंद असलेल्या सीडी रॉममुळे पारंपरिक ज्ञान संग्रहित होण्यास मदत झाली. तसेच त्यांनी विज्ञानविषयक नियतकालिकांच्या (जर्नल्सच्या) संपादकीय मंडळाचे सभासद म्हणून काम केले आहे.
फोंडके यांनी विपुल लेखन केलेले आहे. त्यांच्या सुमारे २०० विज्ञानकथा, २००० हून अधिक विज्ञान लेख आणि मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून ५० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विपुल स्तंभलेखन केले व वैज्ञानिक सदरेही नियमित चालवली आहेत. त्यांच्या ‘उद्याचे वैद्यक’, ‘कॉम्प्यूटरच्या करामती’, ‘चिरंजीव’ व ’जावे विज्ञानाच्या गावा’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. लेखनाच्या माध्यमाद्वारे त्यांनी अगदी सहजपणे व सोप्या शब्दांत वैज्ञानिक व तांत्रिक गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या व त्या वाचण्याची आवड निर्माण केली. या कार्याबद्दल इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे इंदिरा गांधी पारितोषिक, एन.सी.एस.टी.सी.चा राष्ट्रीय पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सुरुवातीच्या काळापासून त्यांचा मराठी विज्ञान परिषदेशी संबंध होता. ते मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेचे संपादन करतात. या पत्रिकेची आजची लोकप्रियता, वाचनीयता व आकर्षक मांडणी यांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. १९९८ सालच्या अखिल भारतीय विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पाचव्या राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. डॉ. फोंडके महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन कॉलेज ऑफ अॅलर्जी अॅन्ड अप्लाइड इम्युनॉलॉजी, इंडियन सायन्स रायटर्स असोसिएशन, मराठी विज्ञान परिषद, नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेशन, या संस्थांचे सदस्य आहेत. त्यांच्या कार्याची दखल गुजरात राज्यानेदेखील घेतली आणि त्यांना विज्ञान नगरीचे सल्लागार नेमले. आकाशवाणीसाठी त्यांनी लेखन केले आहे. दूरदर्शनचेही ते सल्लागार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा व इंडियन सायन्स काँग्रेसचा पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, एन.सी.एस.टी.सी.चा राष्ट्रीय पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोकण मराठी साहित्य संमेलनाचे २००४ मध्ये ते अध्यक्ष होते.२०१५ साली कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘कोकण साहित्य भूषण पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे.
उमेदीच्या काळात फोंडके यांनी आमंत्रित प्राध्यापक म्हणून वडोदर्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात व मुंबई विद्यापीठात शिकवले. विज्ञान प्रसारासाठी महाराष्ट्रातील खेडोपाडी जाऊन भाषणांद्वारे ते जनजागृती करत असतात. भारत सरकारच्या सेवेतून मुक्त झाल्यावर पुणे विद्यापीठात ते वृत्तपत्रविद्या या विभागात मानद प्राध्यापक म्हणून त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना विज्ञान पत्रकारिता शिकवतात.