महाजन, नारायण विश्वनाथ
नारायण विश्वनाथ महाजन यांचा जन्म पैठण येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पैठण येथे झाले. औरंगाबाद येथे विज्ञान शाखेतील शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परभणी कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी आणि पुणे येथील कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर नारायण महाजन यांनी १९७६मध्ये भारतातील ऊस संशोधन केंद्र लखनऊ येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. नारायण महाजन यांनी १ जुलै १९८० ते १७ नोव्हेंबर १९८७पर्यंत डॉ. पं.दे.कृ.वि.तील बियाणे विभागात उपसंशोधन संचालक या पदावर कार्य केले. त्यांनी १८ नोव्हेंबर १९८७ ते ४ फेब्रुवारी १९९१पर्यंत सहयोगी संशोधन संचालक या पदावर काम केले. याच कालावधीमध्ये काही काळ अखिल भारतीय कृषिविद्या प्रकल्पाचा समन्वय करण्याचे आव्हान स्वीकारून तो प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पासाठी इस्राएलच्या शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पामध्ये खताची मात्रा सिंचनाद्वारे देण्यात येऊन पीक संरक्षण अस्पीसारख्या ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे करण्यात आले. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी व तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण हंगामात महाराष्ट्रातील जवळजवळ १ लक्ष लोकांनी प्रकल्पाला भेट दिली.