Skip to main content
x

पाटणकर, प्रभाकर गणेश

     डॉ. प्रभाकर गणेश पाटणकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील (तेव्हाचा कुलाबा जिल्हा) पेण येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्याच फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये घेऊन ते बी.ई. (सिव्हिल) झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात पीएच.डी. (टेक) केले. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय, ‘डेव्हलपमेंट ऑफ अर्बन मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम इन इंडिया’ असा होता. त्यांनी एफ.आय.ई., एम.आय.आर.टी. या पदव्याही मिळवल्या. हे शिक्षण पुरे झाल्यावर ते तेव्हाच्या ‘जी.आय.पी.’ म्हणजे ‘ग्रेट इंडियन पेनिन्श्युलर रेल्वे’मध्ये (आताची सेंट्रल रेल्वे) साहाय्यक अभियंता या पदावर नोकरीला लागले. तेथे तीन-चार वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी मुंबई नगरपालिकेच्या ‘बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग ’ ऊर्फ ‘बी.ई.एस.टी.’ (बेस्ट) या कंपनीत प्रवेश मिळवला. ज्येष्ठ साहाय्यक अभियंता, कंट्रोलर ऑफ स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग मॅनेजर, साहाय्यक महाव्यवस्थापक, उप-महाव्यवस्थापक इत्यादी विविध पदांवर त्यांनी तेथे ३० वर्षे काम केले. या काळात त्यांनी वाहतूक व्यवस्थेचे सखोल ज्ञान मिळवले.

     इंग्लंड, जर्मनी, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, जिनिव्हा, मॉस्को, जपान इत्यादी गजबजलेल्या शहरांत अद्ययावत वाहतूक यंत्रणेचा सूक्ष्म अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. मुंबई शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी जागतिक बँकेकडून साहाय्य मिळवण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई आणि कोलकात्याच्या वाहतूक समस्या सोडवताना जमिनीखालील वाहतूक मेट्रोच्या साहाय्याने करणे अत्यावश्यक असल्याचे ते १९६३ सालापासून सांगत आहेत. मध्यंतरी दोन वर्षे दिल्ली वाहतूक मंडळाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उप-कार्याध्यक्ष व व्यवस्थापक अशी जबाबदारीची कामेही त्यांनी केली. काही वर्षे ते टाटा कन्सल्टन्सीमध्येही सल्लागार होते.

     प्रमुख बंदरांची रचना करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या समितीतील एक सदस्य या नात्याने जलवाहतुकीचाही त्यांचा जवळून अभ्यास झाला. अशा तऱ्हेने रेल्वे, जल व रस्ता वाहतूक शाखांचे सखोल ज्ञान आत्मसात केलेले आणि कामगार, वेळा, दरपत्रक इत्यादी रस्ता वाहतुकीच्या क्षेत्रातील विविध अंगांची पूर्ण माहिती असलेले डॉ.प्रभाकर पाटणकर ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड टान्स्पोर्ट’ (सी.आय.आर.टी.) या पुण्याजवळील भोसरी येथील संस्थेचे संचालक होते. तेथील अधिकाऱ्यांना वाहतुकीसंबंधीच्या विविध विभागांचे प्रशिक्षण दिले जाते. डॉ.प्रभाकर पाटणकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरी वाहतुकीतील विविध पद्धतींच्या वाहनमार्गांतील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांना या क्षेत्रातील ६० वर्षांचा (१९४६ ते २००५) अनुभव आहे. त्या अनुभवाच्या अनेक परी आहेत. नियोजन, विविध यंत्रणांची आखणी आणि अंमलबजावणी, प्रकल्प व्यवस्थापन आणि उभारणी इत्यादी. मुंबईच्या ‘भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक’ आणि ‘सोमय्या पॉलिटेक्निक’ या संस्थांच्या कार्यकारी मंडळांचे ते पंधरा-पंधरा वर्षे सदस्य होते, तसेच मुंबईत अनेक ठिकाणी त्यांनी बेस्टतर्फे वीज केंद्रेही उभारली.

     आपले सर्वांगीण ज्ञान शास्त्रीय निबंधांच्या स्वरूपात वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे. विविध संस्थांमधील तज्ज्ञांची प्रशस्तिपत्रेही त्यांना मिळाली आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स’ची त्यांना दोनदा सुवर्णपदके मिळाली आहेत. त्यांना ‘नादिरशहा पुरस्कार’, रेल्वे बोर्डाचे पुरस्कार, इत्यादी बहुमान मिळाले. त्यांना ‘अर्बन मोबिलिटी इन डेव्हलपिंग कंट्रीज’ या पुस्तकाबद्दल १९७७ साली ‘बर्नाड व्हॅन हूल’ हे आंतरराष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. याखेरीज, मुंबईमधील ‘भुयारी मार्ग’ व ‘भारताच्या रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक’ अशी दोन अभ्यासपूर्ण पुस्तकेही त्यांनी लिहिलेली आहेत. वाहतुकीच्या संदर्भात त्यांनी जागोजागी अनेक लेख लिहिले आहेत. अनेक देशी-परदेशी वाहतूक समस्यांच्या परिषदांत त्यांनी भाग घेऊन महत्त्वाचे योगदान केले आहे. १९८५ साली ठाणे येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि ‘शहरी वाहतुकीच्या समस्या’ हाच त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता.

अ. पां. देशपांडे

पाटणकर, प्रभाकर गणेश