Skip to main content
x

हुजूरबाजार, वसंत शंकर 

     कोल्हापूर संस्थानातील एका सुसंस्कृत कुटुंबात हुजूरबाजारांचा जन्म झाला. शाळेच्या व पदवीपर्यंत कोल्हापुरात दिलेल्या परीक्षांपासून बनारस हिंदू विद्यापीठातील एम.ए.च्या परीक्षेत कुलपती सुवर्णपदक मिळेपर्यंत ते सतत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेले.

     शाळेच्या वयातच, संभाव्यतेबद्दल त्यांना वाटलेले आकर्षण आणि १९४१ साली बनारस हिंदू विद्यापीठात भरलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या अधिवेशनातील व्याख्यानातून ऐकलेले ‘संख्याशास्त्र हे मानवी कल्याणाचे अंकगणित आहे’, हे प्रा.प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे उद्गार आणि विनोदाने नटलेले सर सी.व्ही. रमण यांचे संभाव्यतेचे विवेचन, यांच्या जोडीला तेव्हा देशातील बरीच विद्यापीठे संख्याशास्त्राचे अभ्यासक्रम चालू करण्याच्या विचारात होती, आणि मुख्य म्हणजे आगामी काळात या विषयाला महत्त्व येणार हे ओळखून हुजूरबाजारांनी संख्याशास्त्रात संशोधन करायचे ठरविले.

     केंब्रिज विद्यापीठातील खगोल व भू-भौतिकशास्त्रज्ञ आणि बेरीज प्रमेय व व्युत्क्रम संभाव्यतेची तरफदारी करणारे, पण संख्याशास्त्रीय वर्तुळात वादग्रस्त ठरलेले सर हॅरॉल्ड जेफ्रीज हे हुजूरबाजारांचे मार्गदर्शक होते. परंतु, तेव्हा संख्याशास्त्रीय जगावर सर रोनॉल्ड फिशर यांचा प्रभाव होता. म्हणून जेफ्रीज यांच्या विचारप्रणालीचा उपहास केला जाई. तरी नेटाने काम करून संख्याशास्त्र क्षेत्रात नाव मिळविणारे हुजूरबाजार हे जेफ्रीज यांचे एकमेव विद्यार्थी ठरले. कारण, त्यांचे बाकीचे विद्यार्थी भू-भौतिकीत काम करणारे होते.

     तीन वर्षे परिश्रम करून, अखेर हुजूरबाजारांनी १९४९ साली ‘सम प्रॉपर्टीज ऑफ डिस्ट्रिब्यूशन अ‍ॅडमिटिंग सफिशंट स्टॅटिस्टिक्स’ हा प्रबंध विद्यापीठास सादर केला. त्यात एकूण पाच उपविषय असून त्यांपैकी काही ‘अनल्स ऑफ युजेनिक्स’, ‘प्रोसीडिंग्ज ऑफ केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी’ व ‘बायोमेटिका’ या नियतकालिकांतून शोधनिबंध स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. त्यांतील नावीन्यामुळे बर्‍याच लेखकांनी ते आपल्या पाठ्यपुस्तकात, तर प्राध्यापकांनी त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले. खुद्द जेफ्रीज यांनी आपल्या, ‘थिअरी ऑफ प्रॉबॅबिलिटी’ या पुस्तकात हुजूरबाजारांचे अविकारक घालून, ‘हुजूरबाजार अविकारक’ असे त्यांचे बारसे केले; शिवाय ‘हुजूरबाजारांनी मोठी झेप घेतली’, असे एके ठिकाणी म्हटलेले आढळते. कळस म्हणजे, १९४९ साली विद्यापीठाला गणितात सादर झालेल्या प्रबंधात हुजूरबाजारांचा पीएच.डी.चा प्रबंध सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे, विद्यापीठाने त्यांना ‘अ‍ॅडॅम्स’ पारितोषिक देऊन गौरविले.

     स्वदेशी परतल्यावर काही वर्षांनी हुजूरबाजार पुणे विद्यापीठाच्या गणित व संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख झाले आणि अल्पावधीतच त्यांनी तो विभाग इतका नावारूपाला आणला, की पुढे त्यांपैकी संख्याशास्त्र विभागास विद्यापीठ अनुदान मंडळाने प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राचा दर्जा दिला. गुणात्मक विकास झालेल्या या विभागातून संशोधनास वाहून घेणार्‍या संशोधकांना जगभरातील संख्याशास्त्रज्ञांची वाहवा मिळत गेली. अशा तरुण संशोधकांची पिढी उभी करण्याचे श्रेय हुजूरबाजारांकडे जाते.

     हुजूरबाजारांच्या या कर्तबगारीमुळेच अनेक नामवंत परदेशी व भारतीय संख्याशास्त्रज्ञांनी त्यांच्या विभागास भेटी देऊन विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ दिला. मात्र त्यांचे संशोधन जरी रखडले, तरी निवृत्तीनंतर त्यांनी त्याची भरपाई केली. म्हणून त्यांच्या नावावर २६ शोधनिबंध व ‘सफिशंट स्टॅटिस्टिक्स’ हे पुस्तक व इतर अनेक सन्मान आहेत. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ किताबाने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.

— प्रा. स. पां. देशपांडे

हुजूरबाजार, वसंत शंकर