Skip to main content
x

हलसगीकर, गणेश तात्याराव

हलसगीकर, दत्ता

     समकालीन प्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर यांचा जन्म अळगी, ता. अफझलपूर, जि. सोलापूर येथे झाला. ते एस.एस.सी. आणि साहित्य विशारद आहेत. त्यांचे शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांची कर्मभूमी सोलापूर हीच होती. १९५३-१९९४ अशी एकेचाळीस वर्षे त्यांनी तिथल्याच लक्ष्मी-विष्णू या एकेकाळच्या प्रसिद्ध टेक्स्टाइल कंपनीत स्टेनोग्राफर म्हणून काम पाहिले.

     वयाच्या विशीतच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता १९५४ साली ‘आविष्कार’ या तत्कालीन नवोदित व अन्य कवींच्या प्रातिनिधिक कविता-संग्रहात समाविष्ट होती. ‘आषाढघन’ (१९७४) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘सहवास’ या २००१ साली प्रसिद्ध झालेल्या छोट्याशा कवितासंग्रहात त्यांच्या कणिका स्वरूपाच्या कविता प्रसिद्ध झाल्या असून त्यांत प्रेम हाच विषय आहे. प्रेमाचा धर्म, प्रेमाची उत्कटता आदी बाबी त्यांतून मार्मिकपणे पुढे आल्या असून विशेष म्हणजे, त्या वेळी ते सदुसष्ट वर्षांचे होते.

     वयाच्या साठाव्या वाढदिवशी त्यांनी स्वतःचे पाच कवितासंग्रह एकदम प्रसिद्ध केले. महाराष्ट्रातील अनेक दिवाळी अंकांना गेली अनेक वर्षे दत्ता हलसगीकर हे नाव अपरिहार्य ठरले आहे. ‘चाहूल वसंताची’ (१९९९) हाही त्यांचा एक प्रसिद्ध कवितासंग्रह होय, तसेच  ‘करुणाघन’ हा कवितासंग्रह २००१ साली प्रसिद्ध झाला.

     त्यांची कविता ‘मूल्यांचे जीवनभान देणारी आहे,’ असा अभिप्राय डॉ. लीला दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे, सत्त्वशील, विशिष्ट सांस्कृतिक विचारांच्या मुशीत घडलेले, माणुसकीवर श्रद्धा असलेले आणि जीवनाचा विविध अंगांनी वेध घेणारे असल्याने, त्यांची कविता एकसुरी न होता सर्वस्पर्शी झाली आहे. तिला प्रबोधनाचे आकर्षण आहे. प्रेमावर त्यांचे प्रेम आहे आणि एक चिंतनशील विचारधारा ही त्यांच्या लेखणीची तीन रूपे आहेत. त्यांच्या कवितेची भाषा सहजसुंदर, प्रसन्न वाटावी अशी आहे. त्यांच्यात एक ईश्वरी तत्त्व आहे. त्याच्यावर त्यांचा विश्वास असून तो आर्ततेने प्रकटतो. ‘हे जीवन अतिसुंदर, तरीही अशिवाची छाया। अशा जगाची किती लावलिस दयाघना माया। ही त्यांची धारणा आहे.

     दै. ‘संचार’मधून त्यांनी ‘कवितांतील अमृतघन’ या सदरातून अनेक मान्यवर मराठी कवींच्या काव्यांचा परिचय, समीक्षात्मक आढावा घेतला आहे. त्यांनी सोलापूर ‘तरुण भारत’मधील ‘अवतीभोवती’ या वाचकप्रिय सदरातून ललित स्फुटलेखन केले.

     सोलापूरची महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, तिथले वाचनालय आणि अन्य साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांत ते क्रियाशील आहेत. कार्यकर्ता आणि कवी या दोन्ही रूपांत ते अजूनही कार्यतत्पर आहेत.

- मधू नेने

हलसगीकर, गणेश तात्याराव