वऱ्हाडपांडे, नीलकंठ रघुनाथ
ज्ञानसाधनेसाठी आपले आयुष्य पणाला लावणार्या ऋषिमुनींच्या आणि मनीषींच्या थोर परंपरेतील महान संशोधक डॉ. नीलकंठ रघुनाथराव वर्हाडपांडे! स्वतःच्या नावातील आद्याक्षरांनी तयार झालेले ‘नीरव’ ह्या टोपणनावाने संस्कृत लेखन करणारे वर्हाडपांडे परिचितांमध्ये ‘नीर’ या नावाने ओळखले जातात.
डॉ. वर्हाडपांडे मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील ‘मूळावे’ गावचे. त्यांचे पूर्वज करवसुलीचे काम करत असत. असे काम करणार्यांना ‘पांडे’ ही पदवी असे. भोसल्यांच्या राज्यात वर्हाड प्रांताचा कर वसूल करण्यासाठी त्यांच्या पूर्वजांना नेमण्यात आले होते, म्हणून त्यांचे नाव ‘वर्हाडपांडे’ असे पडले.
रघुनाथपंत व पार्वती यांच्या पोटी नीलकंठ हे पाचवे अपत्य रायपूर येथे जन्मले. नीरंना तीन मोठ्या बहिणी, एक मोठा व एक धाकटा भाऊ. त्यांचे वडील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या पदावरून निवृत्त झाले. न्यायप्रियता आणि सत्यनिष्ठा ह्या दोन्ही गुणांचा वारसा छोट्या नीरंना तीर्थरूपांकडून मिळाला. लहानपणापासून व्याख्या करणे, विश्लेषण करणे ही नीरंची सवय. कीर्तन आणि प्रवचने ऐकण्याचा नाद त्यांना बालवयातच जडला. कीर्तनाने संस्कृत काव्याची गोडी आणि प्रवचनांनी भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल त्यांच्या बालमनात कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे पुढे मॅट्रिकच्या वर्गात गेल्यावर नीरंनी संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे शिक्षण घेण्याचा आपला मनसुबा जाहीर केला. नीर लहानपणापासून आपल्या निर्णयावर ठाम असत. वयाच्या बाराव्या वर्षी आपण लेखक म्हणून प्रसिद्ध व्हावे ही महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात जागी झाली आणि ‘निस्यन्द’ नावाचे एक हस्तलिखित त्यांनी मित्राच्या मदतीने काढले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी नीरंनी ‘सुखदुःखविवेक’ हा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहिला. माणसाच्या जीवनात येणार्या सुखदुःखात्मक प्रसंगांचे व त्यामुळे त्याच्या एकूण जीवनावर होणार्या परिणामांचे त्यांनी ह्या ग्रंथात अत्यंत मूलगामी विश्लेषण केले.
१९४० साली ‘काव्यतीर्थ’ या परीक्षेचा अभ्यास करताना नीरंनी साहित्यशास्त्राचे अनेक ग्रंथ वाचले. त्यांतील रसचर्चेत मानसशास्त्राची बरीच चर्चा आहे. त्याला आधुनिक मानसशास्त्राच्या चौकटीत बसवणारा ‘रसांचे मानसशास्त्र’ हा प्रबंध त्यांनी लिहिला. प्रसिद्ध कादंबरीकार माडखोलकर यांना तो दिला त्या वेळी तो प्रबंध वाचून माडखोलकर म्हणाले, ‘‘तुम्हांला या प्रबंधाबद्दल पीएच.डी. मिळायला पाहिजे. मी हा प्रबंध ‘ज्योत्स्ना’ मासिकात प्रकाशित करतो.’’ अशा प्रकारे नीरंचे पहिले लिखाण वि.स. खांडेकर यांच्या संपादनाखाली निघणार्या ‘ज्योत्स्ना’ मासिकात पाच लेखांत प्रसिद्ध झाले. त्या वेळी नीर नागपूरच्या मॉरीस महाविद्यालयामध्ये बी.ए.च्या तिसर्या वर्षाला होते. हे लेख वाचून त्यांच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका कुसुमावती अनिल देशपांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या व्यासंगी प्रतिभेची व रसज्ञतेची साक्ष देणारा ‘वाणी आणि वाङ्मय’ हा ग्रंथ त्यांनी रचला.
१९४२ साली नीर एम.ए. समकक्ष पदवी परीक्षेत विद्यापीठातून पहिले आले. त्यानंतर त्यांना संस्कृतचे प्राध्यापकपद मिळाले. याच सुमारास भारतीय तर्कशास्त्रावर संशोधन करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरिअल शिष्यवृत्ती मिळाली. नागपुरातील प्रसिद्ध विद्वान प्रा. गो.के. गर्दे यांच्याजवळ नीरंनी भारतीय तत्त्वज्ञानाचे अध्ययन सुरू केले. सर्व भारतीय दर्शनांचा अभ्यास करून त्यांनी ‘शास्त्री’ पदवी प्राप्त केली. पुढे ते पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाकडे वळले.
१९४५ साली त्यांनी तत्त्वज्ञानामध्ये एम.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यानंतर संस्कृतच्या प्राध्यापक पदावरून तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक पदावर त्यांची बदली करण्यात आली. त्यांनी काही काळ सागर विश्वविद्यालयातील संलग्न महाविद्यालयात प्राध्यापकी केली.
तर्कशास्त्रीय संशोधन : तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना नीरंनी बर्टरँड रसेलच्या ग्रंथांचे सर्वाधिक वाचन केले. त्यामुळे विज्ञानाच्या आणि गणिताच्या मुळाशी असलेल्या तर्कशास्त्रात त्यांना विशेष रुची निर्माण झाली आणि काल, स्थल आणि गती या क्षेत्रांत विशेष संशोधन करण्याचे ठरवून त्यांनी नागपूर विद्यापीठात नाव नोंदविले. या क्षेत्रातील संशोधनासाठी मद्रास विश्वविद्यालयातील गणिताचे प्रोफेसर पी.व्ही.के. मेनन व प्रसिद्ध गणिती रँग्लर महाजनी यांची त्यांना विशेष मदत झाली. या संशोधनातून सिद्ध झालेला ‘टाइम, स्पेस अॅण्ड मोशन’ हा त्यांचा प्रबंध नागपूर विद्यापीठाने प्रकाशित केला. या प्रबंधाचे परीक्षक दिल्ली विश्वविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर बॅनर्जी यांनी लिहिले आहे की, ‘हा प्रबंध माझ्याकडे आजपर्यंत आलेल्या सगळ्या प्रबंधांत मूर्धन्य आहे.’ दुसरे परीक्षक प्रो. राजू यांनी मत नोंदविले की, ‘मौलिकतेच्या बाबतीत या प्रबंधाची तुलना करता येण्यासारखा दुसरा प्रबंध मी वाचला नाही.’ या प्रबंधासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली. तर्कशास्त्रावरील त्यांच्या मूलगामी चिंतनाला प्रकट करणारे आणखी एक पुस्तक म्हणजे ‘विवेकवाद’. पुढे १९४७ साली त्यांना ऑक्स्फर्ड विद्यापीठात मनोविज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. नीर ऑक्स्फर्डमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्परिमेंटल सॉयकॉलॉजीमध्ये दाखल झाले. या शिक्षणाच्या आधारावर नीरंना रक्षाविज्ञान खात्यात नोकरी मिळाली. याच खात्यातून ‘मुख्य मानसशास्त्रज्ञ’ आणि ‘मानसशास्त्रीय संशोधन संचालक’ म्हणून ते १९८१ साली निवृत्त झाले.
मानसशास्त्रीय संशोधन : रक्षाविज्ञान खात्यात नीरंच्या संशोधन गुणांना खूप वाव मिळाला. मानसिक कसोट्या तयार करण्याचे दायित्व त्यांच्यावर होते. ह्या कसोट्या तयार करण्यासाठी जी मोठ्या प्रमाणात आकडेमोड करावी लागे, त्यासाठी गणित विषयावर प्रभुत्व असणे आवश्यक होते. तेथे काम करणार्या श्री पुष्येन्दुशेखर चौधरी ह्या निष्णात सांख्यिकाच्या मार्गदर्शनाखाली नीरंनी गणिताचे नव्याने अध्ययन सुरू केले. त्याचा फायदा पुढे त्यांना खगोल आणि पुरातत्त्व क्षेत्रातील संशोधनात झाला. त्या वेळी त्यांना या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, की सामाजिक शास्त्रातील कोणतीही समस्या असो, केवळ एका विद्याशाखेचे ज्ञान असून भागत नाही किंवा अमुक एक विषय माझा प्रांत नाही, असेही संशोधकाला म्हणता येत नाही. याच भूमिकेतून वर्हाडपांडे यांनी बहुविध ज्ञानशाखांना गवसणी घातली.
रक्षाविज्ञान खात्यात काम करताना त्यांनी विविध क्षेत्रांत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता पारखण्यासाठी शेकडो कसोट्या तयार केल्या. त्यावर संशोधन पत्रिकांमध्ये पन्नासांवर निबंध प्रकाशित केले. या संशोधनाने त्यांनी हे प्रमाणित केले की, ‘बुद्धिमत्ता वयाप्रमाणे बदलते. १६ ते १९ वर्षांनंतर बुद्धिमत्तेची वाढ होत नाही. उतरत्या वयाचा सर्वच क्षमतांवर विपरीत परिणाम होतो. बुद्धीही त्याला अपवाद नाही. कोणतीही समस्या सोडविणे हे केवळ बुद्धीचे काम नव्हे, तर त्या-त्या क्षेत्रातील ज्ञानही बुद्धीइतकेच महत्त्वाचे आहे. वाढत्या वयात पूर्वीसारखी बुद्धी सक्षम नसली तरी ज्ञान सतत वाढत असल्याने समस्या सोडविण्यात तरुणांपेक्षा वयस्क व्यक्ती जास्त सक्षम असते.’ ह्या संशोधनावर आधारित त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली. ‘एबिलिटीज अॅण्ड एज्युकेशन’ हे पहिले, ‘ए स्टडी ऑफ स्कोअर्स ऑन इंटेलिजन्स टेस्ट बॅटरीज’ व ‘इंटेलिजन्स टेस्ट - स्कोअर्स अॅण्ड कॅण्डिडेट्स अॅट द सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ ही ती तीन पुस्तके होत.
पुरातत्त्वीय संशोधन : जात्याच संशोधकाचा पिंड असल्यामुळे रक्षाविज्ञान खात्यातून निवृत्त झाल्यावर संशोधनाची अनेक क्षेत्रे नीरंना खुणावू लागली. आणि ते आर्याक्रमणाच्या पुरातत्त्वीय संशोधनाकडे वळले. या संशोधनासाठी त्यांनी संस्कृत सोबत भाषाशास्त्र, खगोलशास्त्र, इतिहास, उत्खनन, भूगर्भीयशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांच्या आधारे अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने १९७८ ते १९८९ अशी अकरा वर्षे संशोधन करून ‘कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स्वार्या’ हा ग्रंथ सिद्ध केला. त्यांच्या या संशोधनाने त्यांनी आर्यांचे भारतावरील आक्रमण हे कपोलकल्पित आहे हे सप्रमाण सिद्ध केले. या त्यांच्या संशोधनापुढे जगभरातील विद्वानांनी आपली लेखणी उतरवून ठेवली आहे. ह्या संशोधनाने अनेक प्राच्य आणि पाश्चात्त्य विद्वानांच्या प्रस्थापित मतांचे खंडन केले. त्यांच्या ह्या ग्रंथाला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ११,००० रुपयांचे ‘श्री शेवडे’ पारितोषिक मिळाले. विदर्भातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने डी.लिट. उपाधी देऊन त्यांच्या या संशोधनाचा बहुमान केला.
या पुरातत्त्वीय संशोधनाच्या निमित्ताने अनेक तथ्ये त्यांच्या हाती आली. त्यांतून त्यांनी ‘न्यू लाइट ऑन द डेट ऑफ ऋग्वेद’ हे पुस्तक लिहिले. वेदसंहिता, त्यांचे विविध पाठ, त्यांच्या चिकित्सक आवृत्त्या स्वतः वाचून पारंपरिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषाशास्त्रीय, ग्रहगणितीय, ज्योतिषशास्त्रीय, धातुशास्त्रीय अशा अनेकविध शास्त्रांनी उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यांच्या कसोट्यांवर घासून त्यांनी ऋग्वेद निर्मितीची पूर्वसीमा इ.स.पूर्व ४००० वर्षे, तर उत्तरसीमा इ.स.पूर्व ३१०० अशी निर्धारित केली.
या संशोधनासोबत वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी ऋग्वेदातील बहुचर्चित अशा ‘सोम’ वनस्पतीचा शोध लावला आणि ‘ऋग्वेदिक सोम’ हे संशोधन पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. त्याद्वारा ‘सोम’ ही वनस्पती म्हणजे ‘भांग’ होय हे सप्रमाण सिद्ध केले.
या सर्व संशोधनामागे नीरंमधील एक इतिहासतज्ज्ञ डोकावतो. ह्या इतिहास संशोधनाच्या आवडीने त्यांना इतिहासातील विवाद्य, तसेच अलक्षित विषयांकडे आकृष्ट केले. त्याची परिणती ‘मेमरीज ऑफ मदर इंडिया’ ह्या ग्रंथात झाली. ‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध आणि त्याचे निंदक’ या त्यांच्या पुस्तकाने या स्वातंत्र्ययुद्धाला नाकारणार्या निंदकांना चोख उत्तर दिले आहे. त्यांच्या परखड आणि सडेतोड वृत्तीचे गमक असलेले त्यांचे आणखी एक संशोधन नेहरू ह्या राजकीय व्यक्तीभोवती केंद्रित आहे. त्यांच्याविषयीची अनेक राजकीय रहस्ये, त्यांचे राजनैतिक तत्त्वज्ञान, इत्यादी अनेक गोष्टी त्यांनी निर्भीडपणे, कसलाही मुलाहिजा न ठेवता, ‘द नेमिसिस ऑफ नेहरू वर्शिप’ आणि ‘नेहरू आणि नेहरूवाद’ या दोन पुस्तकांतून मांडल्या आहेत.
पराकोटीच्या तर्कनिष्ठ, सत्यनिष्ठ, जातिवंत संशोधक असलेल्या नीरंच्या अप्रतिहत प्रज्ञेला आणि अकुंठित प्रतिभेला एक लसलसता कवित्वाचा कोंब आहे हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तो कवित्वाचा कोंब म्हणजे नीरंचा ‘कूजन’ हा मराठी तसेच ‘कूजनम्’ हा संस्कृत भाषेतील काव्यसंग्रह. ह्याशिवाय ‘सावळागोंधळ’ हे तीन अंकी आणि ‘सावज’ हे दोन अंकी नाटक अप्रकाशित स्वरूपात आहे. त्यांपैकी ‘सावळागोंधळ’ या नाटकाचा ‘गड़बड़घोटाला’ ह्या नावाने दिल्लीला प्रयोग सादर झाला आणि दस्तुरखुद्द नीरंनी त्याचे दिग्दर्शन केले. याशिवाय नीरंच्या प्रज्ञेला विनोदाचे कोंदण लाभले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मिस्कील बाजू ‘भम्पकराव बाताडे आणि इतर गोष्टी’ या विनोदी कथासंग्रहातून प्रकट होते.
नीरंच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे नीरंची पत्रकारिता. गेल्या ६७ वर्षांपासून अव्याहत चालू असलेल्या ‘संस्कृत भवितव्यम्’ ह्या संस्कृत साप्ताहिकाचे ते गेल्या सव्वीस वर्षांपासून प्रधान संपादकपद आणि संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. सभेचे मुखपत्र असलेल्या ‘संस्कृत भवितव्यम्’मधील त्यांचे अग्रलेख संस्कृत भाषेचे अभिव्यक्तिसामर्थ्य आणि नीरंची सर्वसंचारी प्रतिभा एकाच वेळी प्रकट करतात. नीर जरी भाषाप्रभू असले, तरी संस्कृतविषयी त्यांना विशेष आत्मीयता आहे. अन्य भाषांचा व्युत्पत्तिदृष्ट्या तौलनिक अभ्यास करून, लिपिचिकित्सा करून त्यांनी संस्कृतचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे, तर इंग्लिश शब्दांचे संस्कृत मूळ दर्शविणार्या आगळ्यावेगळ्या शब्दकोशाची निर्मितीही ते करीत आहेत.
त्यांच्या संशोधन सेवेनिमित्त महाराष्ट्र शासनानेे ‘संस्कृत पंडित’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे आणि त्यांच्या आजवरच्या सतरा पुस्तकांच्या लेखनांतून प्रकट झालेल्या बहुआयामी कर्तृत्वाला आणि बहुविध संशोधनाला मानाचा मुजरा करण्यासाठी नागपूर येथील संस्कृत भाषा प्रचारिणी सभेने त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त ‘तर्कवीरदर्शन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला.