Skip to main content
x

पेंडसे, शंकर दामोदर

शंकर दामोदर पेंडसे हे विसाव्या शतकातील एक अमित प्रभावी व केवळ आदरणीयच नव्हे, तर ऋषितुल्य साहित्यिक होऊन गेले. लेखणी आणि वाणी ही दोन्ही त्यांना सारखीच वश  होती. परिसंवाद व चर्चासत्रे यांत डॉ. शं. दा. पेंडसे यांच्या भाषणांचा प्रभाव पुसून टाकणे ही भल्याभल्यांनाही अशक्य असणारी गोष्ट होती. तरुण वयात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन देशसेवा करण्याची ऊर्मी प्रबल झाल्याने त्यांच्या माध्यमिक शिक्षणाची बरीचशी  हेळसांड झाली व शिक्षणासाठी त्यांना पुष्कळच भ्रमंती करावी लागली. परंतु मोठ्या कष्टाने व चिकाटीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. एम.ए. (संस्कृत), एम.ए (मराठी), (नागपूर विद्यापीठ) शास्त्री, (पंजाब विद्यापीठ), एम.एल.ओ. (मास्टर ऑफ ओरिएंटल लर्निंग) या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या व सेवानिवृत्तीपूर्वी सुमारे ४० वर्षे नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयात मराठी या विषयाचे अत्यंत प्रभावी अध्यापन केले. ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञानया विषयावर त्यांनी आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला व नंतर हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशितही झाला. प्राचीन मराठी साहित्य, संस्कृत साहित्य, वेदोपनिषदे व मराठी संतांचे साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे व खास अभ्यासाचे विषय होते. या विषयांवरील त्यांचे प्रभुत्व सर्वमान्य होते. भागवत धर्मही डॉ. पेंडसे यांच्या जीवींची आवडीहोती. वेदोपनिषदांतून प्रतीत होणारा भारतीय भागवत धर्माचा विकास व श्रीज्ञानदेवादी संतांच्या वाङ्मयातून दृष्टोत्पत्तीस येणारा महाराष्ट्राचा भागवत धर्म या विषयांवरील डॉ. पेंडसे यांचे ग्रंथ पुढच्या कित्येक पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारे आहेत.

डॉ. पेंडसे यांच्या तात्त्विक लेखनाची सुरुवात   लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली झाली. गीतेतील कर्मयोगहा आपला प्रदीर्घ निबंध त्यांनी १९१९साली लिहिला व तो लोकमान्य टिळकांना दाखविला. टिळकांनी तो आस्थेने वाचला व हा लेख प्रसिद्ध करण्याजोगा आहे’, असा अनुकूल अभिप्राय त्यावर लेखी स्वरूपात नमूद केला. १९१९ ते राजगुरु रामदासहा त्यांचा ग्रंथ १९७४मध्ये प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे सतत ५५ वर्षे डॉ. शं. दा. पेंडसे तात्त्विक विषयांवर मौलिक लेखन करत राहिले. हे सर्व लिखाण श्रेष्ठ गुणांनी संपन्न असून अक्षर वाङ्मयया सदरात नि:शंकपणे समाविष्ट करण्याजोगे आहे.

भागवत-धर्मम्हणजे डॉ. पेंडसे यांच्या मते, देशकालवस्तु-परिच्छेदशून्य, सच्चिदानंद असा जो परमात्मा त्याच्या उपासकांचा धर्म होय. सर्व वेद, उपनिषदे, पुराणे या सर्व वाङ्मयाचे तात्पर्य परमात्माहाच आहे. परंतु जिज्ञासू अभ्यासकाला हे तात्पर्य अरुंधती-न्यायानेशोधून काढावे लागते. ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञानया आपल्या संशोधनपर ग्रंथात डॉ. पेंडसे म्हणतात की, जरी ज्ञानेश्वर श्रीशंकराचार्यांचे अनुसरण करत असले व शंकराचार्यांना वाट विचारतच त्यांनी आपली गीता-टिका पूर्ण केली असली, तरी ज्ञानेश्वरी हा शंकराचार्यांच्या गीताभाष्याचा काव्यानुवाद नव्हे. ते तत्त्वज्ञ ज्ञानेश्वरांच्या कविप्रतिभेला आलेले मधुर फळ आहे, असे डॉ. पेंडसे म्हणतात.

ज्ञानेश्वरांचा सुप्रसिद्ध चिद्विलासवादहा श्रीशंकराचार्यांच्या प्रतिपादनाच्या कक्षेबाहेरचा विचार आहे- महाराष्ट्राचा भागवत-धर्म या ग्रंथमालेतील ज्ञानदेव-नामदेवहा १ ला खंड. हे पुस्तक बहारीचे आहे. आशय, भाषासौष्ठव, शैलीविज्ञान यांपैकी कोणत्याही दृष्टीने त्यात न्यून म्हणून सापडणार नाही भागवतोत्तम संत एकनाथया ग्रंथात डॉ. पेंडसे यांनी संत एकनाथांना कथा-काव्याचे जनक असे म्हटले असून पुढील पिढ्यांतील कथा-काव्ये आणि आख्यान लिहिणार्‍या अनेक कवींचे नाथमहाराज हे स्फूर्तिस्थान आणि प्रेरणास्थान होत, असे मत त्यांनी नोंदविले आहे. श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधावर त्यांनी लिहिलेला बृहत भाष्यमराठी भाषेचे अमर भूषण आहेच, परंतु मुद्दाम नोंदविण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे चतु:श्लोकी भागवत’, ‘हस्तामलकआनंदलहरीयांसारखी अत्यंत अवघड संस्कृत प्रकरणे कमालीची सुबोध करून त्यांनी मराठी वाचकांच्या हाती सुपुर्द केली आहेत. नाथमहाराजांचा हरिपाठ हा ज्ञानदेवांच्या हरिपाठाच्या तोडीचा म्हणून वारकरी संप्रदायात मान्यता पावलेला आहे.

संत नामदेवांच्या काव्याचे परीक्षण करताना डॉ. पेंडसे यांची लेखणी जरा भावुक झाली आहे. नामदेवांची भावनाशीलता, त्यांच्या काव्यातील कल्पनासौंदर्य, त्यांची विठ्ठल भेटीची आर्त ओढ, श्रीज्ञानदेवांबद्दल त्यांच्या मनात वसत असलेली प्रगाढ आदरभावना यांबद्दल डॉ. पेंडसे यांनी समरसून लिहिले आहे. भागवत धर्माची ध्वजा त्यांनी पंजाबमध्ये घुमानपर्यंत फडकावली याबद्दल अभिमान व्यक्तकेला आहे. श्रीज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे नामदेव हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांचे संजीवन सोहळ्याचे वर्णन अत्यंत प्रत्ययकारी उतरलेले आहे, असे डॉ. पेंडसे म्हणतात. परंतु त्याच वेळी नामदेवांचे तीर्थावळीचे अभंगम्हणजे कपोलकल्पित कादंबरी आहे, हे सांगावयाला डॉ. पेंडसे विसरलेले नाहीत.

महाराष्ट्राचा भागवत धर्म या डॉ. पेंडसे यांच्या ग्रंथमालेतील राजगुरू रामदासहा शेवटचा ग्रंथ. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर आठच दिवसांनी डॉ. पेंडसे यांनी जगाचा निरोप घेतला. हा ग्रंथ लिहायला घेतला त्या वेळी डॉ. पेंडसे यांची प्रकृती फार खालावलेली होती. ग्रंथ-लेखन पूर्ण होण्याबाबत ते साशंक होते. अशा स्थितीत ते पावस येथे गेले व त्यांनी स्वरूपानंद यांना आपली व्यथा सांगितली. तुम्ही आपला ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण कराल. या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ स्वत:च्या डोळ्यांनी पाहीपर्यंत तुम्हांस कोणताही धोका नाही,’ असे स्वामी स्वरूपानंदांनी डॉ. पेंडसे यांना असंदिग्ध शब्दांत सांगितले. स्वामीजींचा शब्द खरा ठरला. या ग्रंथात डॉ. पेंडसे  यांनी समर्थ रामदासस्वामींचे  शैशव, त्यांची गोदावरीकाठची १२ वर्षांची तपश्चर्या, बारा वर्षेपर्यंत समर्थांनी केलेले भारत-भ्रमण व समाज-निरीक्षण, महाराष्ट्रात परतताना समर्थांनी केलेली ११०० मठांची व ११ मारुतींची स्थापना, चाफळच्या राममंदिराची प्राणप्रतिष्ठा, महाडजवळील वरंधा घाटातील शिवथर घळ येथील ग्रंथरचना यांचे तपशीलवार व समरसून वर्णन केले आहे.

समर्थ रामदास हे प्रवृत्तिमार्गी व युयुत्सू वृत्तीचे असल्याने त्यांनी समाजात चैतन्य व कर्तृत्व फुलविले, असे डॉ. पेंडसे यांना सार्थपणे वाटते. या पुस्तकात त्यांचा मुख्यत्वे वाद रंगला आहे. तो प्रा. न. र. फाटक यांच्याशी. समर्थ रामदास हे शिवाजी राजांचे मोक्षगुरू असून शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या उद्योगाशी समर्थांचा सुतराम संबंध नव्हता,’ असा पक्ष प्रा. न. र. फाटकांनी स्वीकारला. प्रा. फाटकांच्या मताला डॉ. पेंडसे यांनी वस्तुत: आपल्या ग्रंथाच्या शीर्षकातच उत्तर दिले आहे. रामदास स्वामी शिवाजीराजांचे मोक्षगुरू तर होतेच; परंतु स्वराज्य स्थापनेच्या कार्याशी रामदास स्वामी किती विविध प्रकारे जोडलेले होते, याचे अनेकविध पुरावे देऊनसुद्धा प्रा. फाटक आपला हट्ट सोडेनात, तेव्हा फाटक वेड पांघरून पेडगावला जात आहेत’, अशी कडवट प्रतिक्रिया नोंदवून  डॉ. पेंडसे यांनी वाद मिटवलेला आहे.

समर्थ रामदास हे काही रूढ अर्थाने शिवाजी राजांचे चरित्रकार नाहीत; परंतु निश्चयाचा महामेरू । बहुतजनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ या रामदासांच्या ओवीच्या आशयापलीकडे अद्याप एकही शिवचरित्र गेलेले नाही, असे डॉ. पेंडसे यांना निभ्रांतपणे वाटतेे. डॉ. पेंडसे यांचा आधुनिक ललित मराठी साहित्याचा फारसा व्यासंग नव्हता. बोर्ड ऑफ स्टड्जिच्या सभांमध्ये जेव्हा असे प्रश्न चर्चेला येत, तेव्हा ते अध्यक्षीय खुर्चीत त्यातील कोणा जाणकाराला बसवत. संत ज्ञानेश्‍वर हे डॉ. पेंडसे यांचे परमआदराचेच नव्हे, तर परमश्रद्धेचे स्थान होते. ग त्र्यं. माडखोलकर यांनी एकदा श्रीज्ञानदेवांची निंदा करणारा संपादकीय मजकूर नागपूरच्या तरुण भारतया दैनिक वृत्तपत्रात लिहिला, तेव्हा डॉ. पेंडसे फार दुखावले गेले व त्यांनी माडखोलकरांशी असलेले दीर्घकालीन मैत्रीचे संबंध तत्काळ तोडून टाकले.

डॉ. पेंडसे यांचे उभे आयुष्य नागपुरात गेले. परंतु शेवटी-शेवटी ते पुण्याला स्थलांतरित झाले व माउलीनावाच्या निवासस्थानात अखेरपर्यंत राहिले. पुण्यातील निवास काळात ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. १९५५साली पंढरपूर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

डॉ. पेंडसे उच्च कोटीचे विद्वान असूनही पराकाष्ठेचे श्रद्धाजीवी होते. सत्पुरुषांचे दर्शन व त्यांचे आशीर्वाद यांचा आपल्या कार्यसिद्धीत मोलाचा वाटा आहे, असे ते मानत. त्यांचा समर्थ रामदासांवरील ग्रंथ पावसच्या स्वामी स्वरूपानंद यांच्या आशीर्वादामुळेच पूर्ण होऊ शकला, अशी त्यांची श्रद्धा होती.

यात योगायोग असा की, स्वामी स्वरूपानंद व डॉ. शं. दा. पेंडसे हे दोघे समवयस्क असून परस्परांची योग्यता जाणून होते. स्वामी स्वरूपानंदाकडे जेव्हा काही आध्यात्मिक साधक मार्गदर्शनासाठी येत, तेव्हा स्वामीजी त्यांना उपदेश करत- अति वाचन करू नका. ते शब्दारण्य आहे. महाजाल आहे व चित्तभ्रमण कारक आहे.परंतु पुढे ३ ग्रंथकारांची नावे घेऊन सांगत यांचे लिखाण अवश्य वाचा. त्याने चित्ताला स्थिरता  व विचारांना दृढता येईल.ते तीन ग्रंथकार म्हणजे - १) प्रा. सोनोपंत दांडेकर २) डॉ. शं. दा. पेंडसे व ३) डॉ. प्र. न. जोशी.

प्रा. प्र. द. सरदेशमुख

पेंडसे, शंकर दामोदर