Skip to main content
x

कडू, मच्छिंद्र रामभाऊ

     मच्छिंद्र रामभाऊ कडू यांचा जन्म नगर जिल्ह्यातील आपटी या गावी झाला. दि. २३ नोव्हेंबर १९४३ रोजी भूसेनेत प्रवेश करून त्यांनी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या (पॅराट्रूपर) तुकडीमध्ये सेवेस सुरुवात केली.  
       
१९४८ मधल्या पाकिस्तान युद्धामध्ये पथरारी येथील शत्रूच्या भक्कम तळावर हल्ला करताना शिपाई कडू यांच्याकडे ब्रेनगन सांभाळायची जबाबदारी होती. या हल्ल्यादरम्यान त्यांच्या उजव्या हाताला व हनुवटीला जखम झाली. या जखमांची कोणालाही कल्पना न देता त्यांनी शत्रूवर आपल्या ब्रेनगनमधून गोळीबार चालू ठेवला. लवकरच त्यांच्या मांडीमध्येसुद्धा गोळी घुसली. त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने त्यांना माघार घेण्यास सांगितले. परंतु, त्यांनी माघार घेण्यास नकार देत हल्ला सुरूच ठेवला.
       त्यांनी मोर्चा जिंकला; पण ते बेशुद्ध पडले. स्वतःच्या जखमांची व जिवाची पर्वा न करता त्यांनी कार्याप्रती उच्चतम निष्ठा आणि अपूर्व धाडसाचे दर्शन घडविले. त्याबद्दल दि. २३ नोव्हेंबर १९४८ रोजी ‘वीरचक्र’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.


-संपादित

कडू, मच्छिंद्र रामभाऊ