Skip to main content
x

कामत, वासुदेव तारानाथ

          व्यक्तिचित्रकार म्हणून विशेष प्रसिद्ध असलेले वासुदेव तारानाथ कामत यांचा जन्म कर्नाटकातील कारकळ येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अहिल्या. लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड लक्षात घेऊन कामत यांच्या आईवडिलांनी त्यांना चित्रकलेचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शालेय जीवनात त्यांना नाना अभ्यंकर आणि महाजन सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्यामुळे कामतांना निरीक्षण आणि रेखांकन यांचे महत्त्व समजले. शालान्त परीक्षेनंतर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये, आणि तोही पेंटिंगला प्रवेश घ्यायचा हे कामत यांच्या मनावर बिंबले होते. त्याप्रमाणे त्यांनी जे.जे.मध्ये प्रवेश घेतला आणि १९७७ मध्ये त्यांनी पहिल्या वर्गात, प्रथम क्रमांकाने जी.डी.आर्ट ही पदविका प्राप्त केली. १९७९ मध्ये त्यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या सुगंधी भट यांच्याशी झाला.

          व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे या दोन्हींवर कामत यांचे सारखेच प्रभुत्व आहे. प्रसंगचित्रे, रचनाचित्रे आणि इलस्ट्रेशन व पेंटिंग यांच्या सीमारेषेवर असलेली चित्रेही त्यांनी तितक्याच समर्थपणे केलेली आहेत. अर्थार्जनासाठी सुरुवातीला त्यांनी नोकरी केली; पण अल्पावधीतच त्यांनी स्वतंत्रपणे कलानिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला व्यावसायिक व्यक्तिचित्रे, रचनाचित्रे करत असतानाच स्वत:च्या आनंदासाठी ते चित्रनिर्मिती करत राहिले.

          व्यक्तिचित्रणामध्ये यथातथ्य चित्रण (साधर्म्य), व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिचित्रापलीकडे जाणारी सार्वकालिक कलात्मकता असे घटक असतात. कधी त्यांत उत्स्फूर्तता असते, तर कधी सूक्ष्म तपशीलही रंगवलेले असतात. व्यक्तिचित्राच्या प्रयोजनावर आणि ते प्रात्यक्षिक आहे, व्यावसायिक आहे की अभ्यास म्हणून केलेले आहे यावर या घटकांचे एखाद्या व्यक्तिचित्रातील प्रमाण अवलंबून असते. व्यक्तिचित्रात  डोळ्यांना आणि बुद्धीला सुखावणाऱ्या तंत्राचा भाग असतो, तसाच भावस्थिती व्यक्त करणारा, हृदयाला भिडणारा भावही असतो. आणि कधीकधी हे दोन्ही घटक गौण ठरवणारा, थेट भिडणारा अनुभवही असतो. कामत यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये वरील तीनही घटक कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

          कामत यांनी प्रसिद्ध व्यक्तींची त्यांना समक्ष बसवून व्यक्तिचित्रे केलेली आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा अनेक बुजुर्गांचा त्यांत समावेश आहे. विद्यार्थिदशेत असताना कामतांनी मित्रांची, शेजार्‍यांची, नातेवाइकांची भरपूर व्यक्तिचित्रे केली. रेम्ब्रांच्या व्यक्तिचित्रांमधली नाट्यपूर्ण प्रकाशयोजना, जॉन सिंगल सार्जंट यांचे ब्रशचे मुक्त फटकारे, शंकर पळशीकरांचे रंगलेपन अशा अनेक कलावंतांच्या शैलीच्या डोळस निरीक्षणांतून कामत यांची शैली घडत गेली. कामत यांच्या मते, त्यांचा सर्वोत्तम आविष्कार ‘माय वाइफ’ या त्यांच्या व्यक्तिचित्रात दिसतो. या चित्राला २००६ मध्ये पोट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या व्यक्तिचित्रण स्पर्धेत पारितोषिक मिळाले. कामत यांना इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्रे अनेक महत्त्वाच्या संस्था, उद्योगसमूह व महत्त्वाच्या व्यक्तींच्या संग्रहात आहेत.

          व्यक्तिचित्रांप्रमाणेच निसर्गचित्रे काढण्याची आवड कामत यांनी विद्यार्थिदशेपासून जोपासली. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रवास केला आहे आणि प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी बसून चित्रे काढली आहेत. निसर्गचित्रांच्या निमित्ताने केलेेल्या भटकंतीत समाजाशी झालेला संपर्क ही कामतांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू होती. निसर्गचित्रांमुळे त्यांना एक विशाल परिप्रेक्ष्य लाभले.

          कामत यांनी व्यावसायिक कामाचा भाग म्हणून अनेक चित्रे व म्यूरल्स केलेली आहेत. प्रत्येक कामात कामत आपले सर्वस्व ओततात. चित्रविषयाचा पुरेपूर अभ्यास करतात. जपानमधील सुबोसाकाडेरा मंदिरासाठी बुद्धचरित्रावरील चित्रमालिका कामत यांनी केली. मुंबई येथील बोरिवलीच्या विपश्यना केंद्रासाठीही त्यांनी बुद्धजीवनावरील चित्रे रंगविली असून स्वामीनारायण पंथाच्या मंदिरांसाठीही त्यांनी चित्रे काढली आहेत. महापुरुषांच्या जीवनावरील चित्रे करताना त्यांच्या चरित्राचा अभ्यास करायचा, प्रसंग निवडायचा, त्या वेळचे वातावरण, कपडे, वास्तुरचना यांचा विचार करून स्केचेस करायची आणि मग चित्रे करायची, अशी त्यांची पद्धत आहे. उदाहरणार्थ, भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शाल वृक्षाखाली झाले. तो शालवृक्ष नेमका कसा होता याचा कामत यांनी प्रथम शोध घेतला आणि मगच तो रंगवला. रामायण, महाभारतातल्या प्रसंगांवर, स्वामिनारायण यांच्या जीवनावर, तसेच शिवचरित्रातील प्रसंगांवर आधारित चित्रेही कामत यांनी केलेली आहेत.

          कामत यांनी चित्रप्रदर्शने केली तीदेखील एखादा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना घेऊन. आशय, माध्यम, सादरीकरण यांबाबत पूर्ण स्वातंत्र्य असल्याने या चित्रांमध्ये त्यांची ‘स्व-अभिव्यक्ती’ दिसते. त्यांच्या प्रदर्शनांची नावेही अन्वर्थक आहेत. उदा. ‘ऑफ इनोसन्स’, ‘रिफ्लेक्शन ऑफ माइण्ड’, ‘गजराज’, ‘मोगरा फुलला’ इत्यादी. वरळीचे नेहरू सेंटर, नरिमन पॉइंटचे प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम, गोरेगावचे जॉगर्स पार्क या ठिकाणी त्यांनी म्यूरल्स केलेली आहेत.

          कामत अशा प्रकारच्या रचनाचित्रांना सब्जेक्टिव्ह पेन्टिंग-विषयनिष्ठ चित्र असे म्हणतात. या चित्रांमध्ये कथनात्मक भाग असतो आणि इलस्ट्रेशनचे, कल्पनाचित्राचे घटक त्यांमध्ये असतात. महाराष्ट्रात राजा रविवर्मांपासून रावबहादूर धुरंधरांपर्यंत प्रसंगचित्रे काढणार्‍यांची परंपरा आहे. त्याचबरोबर दलाल, मुळगावकर अशा चित्रकारांनी सुबक आणि सौंदर्यपूजक अशी अभिरुची जोपासली आहे. कामत यांच्या चित्रांमध्ये परिप्रेक्ष्याचा वापर, रचनेतली लयबद्धता आणि प्रसंगचित्रणातली नाट्यात्मकता आहे, पण ती वेगळ्या प्रकारची आहे.

          निसर्गचित्रातला अवकाश आणि व्यक्तिचित्रणातली मानवाकृती यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या चित्रांमध्ये दिसतो. कृष्ण, वाल्मीकी, गौतम बुद्ध यांच्या चित्रांमध्ये चित्रांमधला काळ हा कालातीत असतो. कृष्ण (खट्याळ कान्हा), वाल्याचा वाल्मीकी इत्यादी चित्रांमध्ये अतिवास्तववादी शैलीचा, तर ‘नवनिर्माता’सारख्या चित्रांमध्ये रेनेसान्सकालीन चित्रांमध्ये असतो तसा कमानींचा आणि भौमितिक आकारांचा वापर आढळतो.

          वासुदेव कामत यांच्यात समाजाशी संवाद साधू पाहणारा कार्यकर्ता दडलेला आहे. संस्कार आणि त्यांतून येणार्‍या मूल्यात्मकतेचे महत्त्व ते जाणतात. कला ही स्वत:च्या उन्नतीचे एक साधन आहे या भावनेने ते ‘संस्कारभारती’ या संस्थेचे काम करतात. व ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. सामान्य माणसांमध्ये कलेची रुची वाढवण्यासाठी होणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

          चित्रकलेवरील त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत: ‘स्केचिंग अ‍ॅण्ड ड्रॉइंग’ आणि ‘पोट्रेट फॉर अ‍ॅस्पायरिंग आर्टिस्ट’. विशेष म्हणजे, कामत डाव्या हाताने चित्रे काढतात.

          विशिष्ट संस्कारांमधून आलेला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि यथार्थवादी चित्रपरंपरेला जवळची असलेली चित्रशैली, यांमुळे कामत यांची चित्रे नेत्रसुखद आणि आश्‍वासक होतात. तेच त्यांच्या चित्रशैलीचे यश आणि तिची मर्यादाही आहे.

- साधना बहुळकर, दीपक घारे

कामत, वासुदेव तारानाथ