Skip to main content
x

गट्टाणी, श्याम मांगीलाल

           श्याम मांगीलाल गट्टाणी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मेहकर येथे झाले. ते १९६५मध्ये मेहकर येथून मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले. त्यांनी १९६९मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत पाचव्या क्रमांकाने अकोला येथील कृषी महाविद्यालयातून उत्तीर्ण केली व १९७२मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी उद्यानविद्या अभ्यासक्रम घेऊन प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने मिळवली. त्याबद्दल त्यांना बॅरिस्टर शेषराव वानखेडे सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

            गट्टाणी यांनी १९७४ ते २००० या काळात केंद्र सरकारच्या स्वयंरोजगार योजनेंंतर्गत कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे, जिनिंग व प्रेसिंग कारखाने व कृषी आधारित उद्योग सुरू केले. मेहकर तालुक्यात इतर शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी कृषी विकास घडवून आणला. गट्टाणी यांनी १९८८मध्ये वनशेतीचाही प्रयोग केला व त्याचबरोबर जल व्यवस्थापन समितीवरही सदस्य म्हणून काम केले. कृषी प्रदर्शने, सेंद्रिय खत प्रदर्शने व मळणी यंत्र यांची प्रात्यक्षिके करण्यामध्ये ते स्वतः व्यग्र असत. त्यांनी मेहकर भागात शेतकऱ्यांना एकत्र करून मोठ्या प्रमाणावर सीताफळाची लागवड केली. त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सीताफळाच्या विविध जातींचे वाण मोठ्या प्रमाणावर लावण्यास दिले व सीताफळ बागेतील छाटणी करण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. त्यांनी सीताफळ उत्पादन करणार्‍या शेतकऱ्यांना एकत्रित करून सीताफळ संमेलन घडवून आणले. त्यांनी शेतीविकास मंडळाच्या सहकार्याने कलमीकरण पद्धतीने ४००० ‘जगदीश’ चिंचेच्या जातीची वाणे शेतकर्‍यांना वितरित केली व मेहकर तालुक्यामध्ये मोठे चिंचेचे बनही तयार केले. ही जगदीश चिंचेची जात औरंगाबाद येथील संशोधन केंद्राने काढलेली आहे. तसेच गट्टाणी यांनी ‘संत ज्ञानेश्‍वर उपसासिंचन सहकारी संस्था’ स्थापन केली व १०० एकर शेतीला उताराने पाणी पुरवले. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने १२ हजार घनमीटर पाणी शेततळ्यामध्ये साठवले आणि ते पाणी उताराच्या दिशेने सोडून देऊन शेतकऱ्यांच्या  विहिरींसाठी पाणी पुनर्भरणाचा कार्यक्रम राबवला. तसेच त्यांनी १०० हेक्टर क्षेत्राला गुरुत्वीय पद्धतीने सिंचन व्यवस्था करून शेतकऱ्यांना मदत केली. त्यांनी ३० लक्ष रुपये कर्ज काढून ही योजना अमलात आणून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.

           गट्टाणी यांनी शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांच्या सहकार्याने निलगिरी, सागवान, बांबू, सागरगोटा, केतकी यांची झाडे वनात लावली व आवळा, आंबा, सीताफळ, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू अशी विविध प्रकारची फळझाडेही लावली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांनासीताफळ झाडे लावण्यासाठी उद्युक्त केले. त्यासाठी त्यांनी सीताफळ उत्पादन संघ स्थापन करून सीताफळ उत्पादनाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. या सर्व कामगिरीबद्दल गट्टाणी यांना १९९१मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे वनश्री पुरस्कार व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

गट्टाणी, श्याम मांगीलाल