Skip to main content
x

लेले, रामचंद्र दत्तात्रेय

      डॉ.रामचंद्र दत्तात्रय लेले यांचा जन्म निजामाच्या हैदराबादमध्ये झाला. तेथेच त्यांचे सर्व शिक्षण झाले. मातृभाषा मराठी, पण कॉलेजमधील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व उर्दू होते. १९४४ साली इंटर सायन्समध्ये ते सर्व परीक्षार्थींमध्ये पहिले आले. १९४९ साली उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी आधुनिक वैद्यकाची पदवी घेतली.

     त्या वेळी खेडोपाडी डॉक्टर नव्हते म्हणून डॉ.लेले व त्यांचे मित्र यांनी स्वत:च ठरवले की पाच वर्षे वैद्यकीय शासकीय सेवा करायची. १९५५ साली पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. लंडन येथील ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन येथून डी.टी.एम.एच. व एडिंबरा येथून एम.आर.सी.पी. पदव्या संपादन करून १९५७ साली ते भारतात परत आले व महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी प्रवेश केला. औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकशास्त्रचे प्राध्यापक व नंतर विभाग प्रमुख म्हणून काम केले. १९७२ साली ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे अधिष्ठाता म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

     १९७३ साली जसलोक रुग्णालय व संशोधन केंद्राचे प्रमुख चिकित्सक व अणुवैद्यक विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये ते वैद्यकशास्त्र या विषयाचे सन्मान्य प्राध्यापक व सल्लागार आहेत. याशिवाय संगणकाचा वैद्यकक्षेत्रात उपयोग करण्यासही त्यांनीच प्रथम सुरुवात केली. अनेक मान्यवर नियतकालिकांच्या संपादकीय मंडळाचे सदस्य, अणुऊर्जेसंबंधी समितीचे सदस्य, भारतीय वैद्यकीय माहिती संकलन संस्थेचे अध्यक्ष, अशी अनेक पदे त्यांनी स्वीकारली.

     डॉ.लेले अणुवैद्यक शास्त्राचे भारतातील प्रवर्तक आहेत. १९६६-६७ साली अणुवैद्यक शास्त्राच्या अभ्यासासाठी ‘कोलंबो प्लॅन’ योजनेखाली ते कॅनडात गेले. ह्या विषयावर त्यांनी ‘प्रिन्सिपल्स अ‍ॅण्ड प्रॅक्टिस ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन’ व ‘कॉम्प्यूटर इन मेडिसीन’ ही पुस्तके प्रसिद्ध केली.

     भाभा अणुसंशोधन केंद्रातील आरोग्य-भौतिक शास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांनी भारतीय बनावटीच्या ‘शॅडो शील्ड होल बॉडी काउण्टर’ची उपयुक्तता दाखवली. लोह व बी १२ जीवनसत्त्वांचे शरीरातील शोषण, तसेच आतड्यातून होणारा रक्तस्राव व प्रथिन यांचा र्‍हास याच्यामुळे होतो हे दाखवून दिले. अणुवैद्यकाचा अभ्यास प्रथमच या देशात डॉ. लेलेंनी प्रस्थापित केला. ‘टेक्नेशियम ९९’ चा शिरेवाटे उपयोग करून विकिरण औषधनिर्मितीचा पाया घातला. ‘आण्विक  हृदय उपचारपद्धत’, तसेच  ‘आण्विक स्टेथॉस्कोप’ त्यांनीच विकसित केले आहेत. ‘स्पेक्ट’ (सिंगल प्रोटॉन एमिशन कॉम्प्यूटेड टोमोग्रफी) या तंत्राचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स इन इंडिया’ या संस्थेचा ‘प्रतिभासंपन्न शिक्षक’ पुरस्कार, ‘धन्वंतरी’ पुरस्कार, तसेच ‘पद्मविभूषण’ हे सन्मान त्यांना मिळाले आहेत.

     डॉक्टरांनी इंटरनेटचा वापर केला पाहिजे यावर त्यांनी सातत्याने भर दिला. इंटरनेटमुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला केव्हाही मिळू शकतो. रुग्णाला इंटरनेटमुळे डॉक्टरांशी कधीही संपर्क साधता येतो, स्वत:चे सर्व रिपोर्ट्स दाखवता येतात. डॉक्टर रुग्णाच्या हृदयाचे ठोकेपण ऐकू शकतात. त्यामुळे रुग्णाला प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जावे लागणार नाही. इंटरनेट एक उपयुक्त सुधारणा आहे व सर्व डॉक्टरांनी त्याचा वापर करायला शिकले पाहिजे, असा डॉ. लेलेंचा सल्ला आहे.

     आयुर्वेदामध्ये डॉ. लेलेंना विशेष रस होता. त्याचा आणि पाश्चात्त्य वैद्यकपद्धतीचा संयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे ‘आयुर्वेद अँड मेडिसीन’ हे पुस्तक बरेच गाजले आहे. त्याचा मराठी अनुवादही प्रकाशित झाला आहे. त्यांचे शंभराहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.

     डॉ. लेलेंनी मराठीतूनच आरोग्य शिक्षण देण्यावर भर दिला. रुग्णांना समजेल अशा भाषेत डॉक्टरांनी बोलले पाहिजे व औषधचिठ्ठ्या लिहिल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. सर्वसमावेशक उपचारपद्धती निर्माण करून सामान्यजनांच्या आरोग्यविषयक गरजा भागवाव्यात, असे त्यांना वाटते. पुरावाधिष्ठित वैद्यकाचे नियम सर्व वैद्यकप्रणालींना लागू करण्याची निकडीची गरज आहे, असे त्यांचे मत आहे.

     स्त्रियांना शिक्षण देणे व आर्थिक सवलती देणे हा कुटुंबनियोजनाचा प्रभावी मार्ग आहे. केरळमध्ये स्त्री-शिक्षणामुळे मुदतपूर्व बालजन्माचे प्रमाण हजारी १८ पर्यंत खाली आले. स्त्रीमध्ये कुटुंबाचे प्रकृतिस्वास्थ्य सांभाळण्याचे सामर्थ्य आहे, अशी डॉ. लेलेंची विचारसरणी आहे.

     ग्रमीण आरोग्य विकासावर डॉ.लेलेंचा विशेष भर आहे. बालविकास प्रकल्पात ग्रमीण भागातल्या जनतेला सहभाग घ्यायला प्रवृत्त करण्याचे काम सेवानिवृत्त नागरिक व सेवाभावी संस्था करू शकतील, असे त्यांनी ‘रूरल कन्स्ट्रक्शन चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज’ या १९९६ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटले आहे. मागासलेल्या भागात उद्योग जावेत म्हणून शासन फुकट जमीन, पाणी आणि वीजपुरवठा देते, करसूट देते, त्याच धर्तीवर या सोयी डॉक्टरांनाही मिळाव्यात, अशी महत्त्वाची व्यवहार्य सूचनाही डॉ. लेलेंनी केली. ग्रमीण आरोग्य विकासासाठी त्यांनी आरोग्य विम्याहून अधिक व्यापक संकल्पना ‘स्वास्थ्य परिरक्षक संघटना’ मांडली. यात रोगचिकित्सेपेक्षा रोगप्रतिबंधावर अधिक भर देण्याचा प्रयत्न असतो. वैद्यक व्यावसायिकांनी रुग्णाविषयी करुणा व जिव्हाळा कधी कमी पडू देऊ नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी  वैद्यक व्यावसायिकांना दिला आहे.

डॉ. शशिकांत प्रधान

लेले, रामचंद्र दत्तात्रेय