Skip to main content
x

सेठना, होमी नसरवानजी

          डॉ. होमी सेठनांचा जन्म एका सधन पारशी कुटुंबात, मुंबईमध्ये झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स या संस्थेत झाले. त्यानंतर अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीत त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी शाखेची उच्च पदवी (एम.एस्सी.) १९४६ साली मिळवली. त्यानंतर काही काळ ते इंग्लंडमधील इंपिरियल केमिकल इंडस्ट्रीतकार्यरत होते. १९४९ साली, म्हणजे भारताच्या अणु संशोधन खात्याच्या सुरुवातीस ते भारतात परत आले व  अणु खात्यात शास्त्रज्ञ म्हणून  काम पाहू लागले.

त्यांनी केलेल्या कामाची सुरुवात, मोनोझाइट या खनिजापासून रेअर अर्थस वेगळे करणार्‍या प्रक्रिया शोधापासून झाली. मोनोझाइट हे खनिज केरळच्या किनार्‍यावर वाळूच्या स्वरूपात आढळते व त्यात युरेनियम व थोरियमबरोबर मोठ्या प्रमाणात दुर्मीळ मूलद्रव्ये असतात. या सर्वच रासायनिक मूलद्रव्यांचा वापर अणुऊर्जा कार्यक्रमासाठी होतो. त्यामुळे खनिजरूपातील ही मूलद्रव्ये शुद्ध  स्वरुपात अलग करणे महत्त्वाचे असते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान अर्थातच आयात करता येत नाही, की कोठूनही भेट म्हणून मिळत नाही. ते स्वबळावरच विकसित आणि प्रमाणित करावे लागते. भारतात प्रथमच या दुर्मीळ मूलद्रव्यांचे उत्पादन डॉ.सेठना यांनी चालू केलेल्या आल्वये येथील कारखान्यातून १९५२ साली सुरू झाले.

 त्यानंतर डॉ. सेठना यांनी तुर्भे येथील अणुशक्ती केंद्रात (आताचे भाभा अणु केंद्र) येऊन मोनोझाइटपासून शुद्ध स्वरूपात थोरियम मिळविण्याकरता लागणारी रासायनिक प्रक्रिया औद्योगिक स्तरावर विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्या प्रक्रियेद्वारे मग त्यांनी  थोरियम नायट्रेटचे उत्पादन सुरू केले. या संयुगापासून मग शुद्ध साठीची प्रक्रिया १९५९ साली सुरू झाली.

या काळातच डॉ. भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची रूपरेखा पक्की केली होती व त्याकरिता युरेनियम या धातूची गरज होती. या कामाची जबाबदारी डॉ. सेठना यांच्याकडे सोपविण्यात आली. बिहार येथील जादूगोडा या शहरानजीक युरेनियमच्या खनिजांची खाण होती व तेथेच खाणीतून निघालेल्या खनिजापासून शुद्ध स्वरूपात युरेनियम मिळविण्याची प्रक्रिया सिद्ध करण्यात आली. या खनिजातील युरेनियमची टक्केवारी एक टक्क्यापेक्षासुद्धा कमी असते व त्यातून जवळजवळ १०० टक्के शुद्धीकरिता लागणारी प्रक्रिया ही तिप्पट असते. शिवाय, ही खनिजे किरणोत्सारी असल्यामुळे या सर्व प्रक्रिया अतिशय सुरक्षित स्थितीत करण्यासाठी काही खास काळजी घ्यावी लागते. ती सर्व तयारी करून या महत्त्वाच्या इंधनाचे उत्पादन सेठना यांनी सुरू केले. या खाणीतून व शुद्धीकरण प्रकल्पातून तयार झालेले युरेनियमच भारताच्या अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते.

शास्त्रीय संशोधनाकरिता उपयुक्त अशी पहिली अणुभट्टी, ‘अप्सरा१९६५ साली भाभा अणु संशोधन केंद्रात कार्यरत झाली. या अणुभट्टीत वापरण्यात आलेल्या युरेनियम इंधनात अणुशक्तीच्या पुढच्या टप्प्याकरिता उपयोगी पडणारे प्लूटोनियम तयार होत असते. अशा प्रकारे अणुभट्टीतील जळित इंधनावर प्रक्रिया करून त्यामधून प्लूटोनियम वेगळे करण्याचे तंत्रज्ञान जगातील फक्त पाच प्रगत राष्ट्रांत उपलब्ध होते. हे काम इंधनातील हानिकारक किरणोत्साराच्या मात्रेमुळे फार क्लिष्ट असते. डॉ. सेठना यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशी बनावटीचा या प्रकारचा प्रकल्प उभा राहिला व तो १९६४ साली कार्यरत झाला.

डॉ. होमी भाभा हे भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून सुरुवातीपासून काम पाहत होते व भाभा अणु संशोधन केंद्राचे ते संचालकही होते. १९६६ साली त्यांच्या आकस्मिक निधनानंतर भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक म्हणून डॉ.सेठना यांची नेमणूक झाली व डॉ. साराभाई हे अणु ऊर्जा विभागाचे अध्यक्ष म्हणून  काम पाहू लागले. १९६६ ते १९७२ सालापर्यंत डॉ.सेठना या केंद्राचे संचालक म्हणून काम पाहत होते.

भाभा अनु संशोधन केंद्र ही भारतातील प्रमुख संशोधन शाळा असून तेथे जवळजवळ ३५०० शास्त्रज्ञ, तसेच इतर ६५०० कामगार काम करत होते.अणुशक्ती खात्याशी निगडित सर्वच विषयांवर तेथे संशोधनकार्य चालू आहे व डॉ. सेठना यांच्या काळात या संशोधनकार्यास चालना मिळून त्याची भरभराट झाली.

१९७१ साली डॉ. साराभाई यांच्या आकस्मिक निधनानंतर अणुशक्ती खात्याची संपूर्ण जबाबदारी डॉ.सेठना यांच्याकडे आली व त्या पदावर ते १९८३ सालापर्यंत कार्यरत होते. डॉ.भाभा सोडून इतर कोणीही इतक्या दीर्घकाळ ही जबाबदारी पेलली नाही. आज अणुशक्ती खात्यामधून निवृत्तीनंतरही जवळपास २५ वर्ष डॉ.सेठना यांचे मार्गदर्शन या खात्यास मिळाले.

त्यांच्या खातेप्रमुख पदाच्या काळामध्ये भारतामध्ये, भारतात तयार झालेल्या सहा अणुभट्ट्या वीजनिर्मिती करू लागल्या. त्यांच्या या काळातच अणुशक्ती खात्याने भारताचा पहिल्या अणुचाचणीचा प्रयोग १९७४ साली राजस्थान येथील पोखरण येथे यशस्विरीत्या पार पाडला. अणुशक्ती खाते, तसेच संरक्षण विभाग यातील समन्वयाच्या जबाबदारीचे व गोपनीयतेचे काम डॉ.सेठना यांच्यासारख्या कुशल नेत्यामुळेच शक्य झाले.

डॉ.सेठना त्यांच्या विषयातील तज्ज्ञ म्हणून आजही बर्‍याच संस्थांचे मानद व आजीव सभासद होते, तसेच उद्योगक्षेत्रात संचालक पदावर ते कार्यरत होते. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांतील काही महत्त्वाचे : रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ इंजिनिअर्स’, ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स’, ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’ (इंडिया) व इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनिअर्स’, ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअर्सइत्यादी संस्थांचे ते मानद सभासद आहेत. त्यांना शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार१९६० साली मिळाला. त्यांना  पद्मश्रीकिताब १९५९ साली, ‘पद्मभूषणपुरस्कार १९६६ साली, तर पद्मविभूषणपुरस्कार १९७५ साली देण्यात आला. त्यांना मिळालेल्या इतर पुरस्कारांपैकी काही : सर बॉल्टर पुसकीपुरस्कार १९७१, ‘सर विलियम जेम्स मेमोरियलपुरस्कार, १९७४, ‘सर देव प्रसाद सरबंदीकर सुवर्णपदक१९७५, ‘दुर्गाप्रसाद खैतान पदक१९८३, ‘विश्‍व गुर्जरीपुरस्कार, १९८५, ‘दादाभाई नौरोजी स्मृती पुरस्कार’, १९८५, ‘पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार१९८९. त्यांना भारतातून एकंदरीत १२  विद्यापीठांतून मानद डी.एस्सी. व डी.लिट इत्यादी पदव्या मिळाल्या आहेत. 

डॉ.श्रीराम मनोहर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].