Skip to main content
x

आपटे, दत्तात्रेय दिनकर

चित्रकार

त्तात्रेय दिनकर आपटे यांचा जन्म महाराष्ट्रात मिरज येथे झाला. त्यांचे वडील दिनकर आपटे मिरज हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांना चित्रकला आणि संगीताची आवड होती. त्यांच्या आईचे नाव सुमती. दत्तात्रेय आपटे १९६९ मध्ये मिरज हायस्कूलमधून  एस.एस.सी. झाले. त्यानंतर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी १९७४ मध्ये ड्रॉइंग आणि पेन्टिंग (फाइन आर्ट) चा डिप्लोमा घेतला व नंतर आर्टमास्टरही (ए.एम.) केले. याचबरोबर त्यांनी पुणे विद्यापीठातून १९७४ मध्ये, इंग्रजी या विषयात बी.ए. (ऑनर्स) केले.

पुण्यात असतानाच सुप्रसिद्ध चित्रकार ज.द. गोंधळेकर यांच्या सहवासामुळे आणि पुण्याच्या मॅक्समुल्लर भवनातील मुद्राचित्रणकलेचे प्रदर्शन त्यांच्या पाहण्यात आल्यामुळे ते मुद्राचित्रणाकडे ओढले गेले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी १९८० साली मुद्राचित्रणतंत्राचा/मुद्राचित्रणकलेचा पदव्युत्तर डिप्लोमा घेतला. बडोद्यात पी.डी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अभ्यासक्रम केला. याशिवाय के.जी. सुब्रमण्यन, जयराम पटेल, ज्योती भट आदी चित्रकारांचा सहवास व मार्गदर्शनही त्यांना लाभले.

१९८० पासून त्यांचे वास्तव्य दिल्लीत असून ललित कलाच्या ‘गरी’ या स्टूडिओत ते काम करत आहेत. १९८० ते १९८२ या दरम्यान त्यांनी व्यावसायिक स्क्रीन प्रिंटिंगच्या स्टूडिओत काम करून या तंत्रावरदेखील प्रभुत्व मिळवले.

लिथोग्रफ, एचिंग, एन्ग्रेव्हिंग, मेझोटिंट, वुडकट,  स्क्रीन प्रिंटिंग इत्यादी मुद्राचित्रणातील विविध माध्यम तंत्रांतून केलेली मुद्राचित्रे त्यांनी आजवर एकल आणि समूह प्रदर्शनांतून प्रदर्शित केली आहेत. माध्यम-तंत्र आणि विषय यांची अचूक सांगड त्यांच्या मुद्राचित्रांतून नेहमीच दिसून येते. विविध पृष्ठभागांचे पोत, काहीसा शिल्पसदृश उत्थितरूप परिणाम व वास्तव आणि अमूर्त या दोहोंच्या सीमारेषेवरचे रूप त्यांच्या एकंदरच कलाकृतींतून प्रत्ययास येते.

दिल्ली या मेट्रोपोलिटन शहरातील दिखाऊ श्रीमंती, झगमगाट, ऑटोमोबाइल, तसेच दिल्लीच्या बाजारातील प्रदर्शनीय खिडक्या हे विषय त्यांनी आविष्कृत केले. ‘विरासत’ (२००४) या त्यांच्या मालिकेतून दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील भग्न अवशेष असलेल्या वास्तू, नष्ट होत चाललेली स्मारक-शिल्पे हे विषय त्यांनी एचिंगच्या तंत्राद्वारे मांडले. पाल्याचे संगोपन करताना येणार्‍या पितृत्वाचा अनुभव, तसेच लहान मुलांच्या नजरेतून निसर्ग अशा व्यक्तिगत अनुभवांना त्यांनी दृश्यरूप दिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आपटे कागदाच्या लगद्यात काम करत आहेत. सोमनाथ होर यांच्या ‘वूंड’ या चित्रमालिकेने प्रभावित होऊन त्यांनी या माध्यमात काम सुरू केले. ‘वर्क्स इन पेपर पल्प’ (२००५), ‘जॉइज ऑफ डिसेप्शन’ (२००६) या प्रदर्शनांतून त्यांनी या माध्यमातून केलेल्या कलाकृती सादर केल्या होत्या. यात ‘मोल्िंडग, कास्टिंग’ या तंत्राचा, तसेच प्रत्यक्ष हातांचा वापर करून काहीशा उठावदर्शी रूपाच्या कलाकृती त्यांनी घडवल्या होता. निसर्गातील विविध वृक्षांची पाने, फांद्या आणि काही तुटलेल्या, फुटलेल्या, निरुपयोगी  मानवनिर्मित वस्तूंमधून त्यांनी एक रचनाबंध निर्माण केला होता.

१९९९ मध्ये चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्टतर्फे प्रो. जेकी पॅरी या विख्यात ‘पेपर चित्रकर्ती’च्या मार्गदर्शनाखाली ग्लासगो स्कूल ऑफआर्ट (स्कॉटलंड) येथे काम करण्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. पॉल आर्थर लिंगहेरेन, तसेच कृष्णा रेड्डी यांनी घेतलेल्या कार्यशाळांतही त्यांनी भाग घेतला.

काही राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांबरोबरच इंटरनॅशनल बिनाले ऑफ ग्रफिक आटर्स, युगोस्लाव्हिया (१९८३), फर्स्ट इंटरनॅशनल बिनाले नेदरलँड (१९९३) आदी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतूनही त्यांचा सहभाग होता. दृश्यकला क्षेत्रातील नॅशनल अवॉर्ड (२००४), चित्रकला परिषद, बंगलोर (१९९२) इत्यादी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. दत्तात्रेय आपटेंचे वास्तव्य दिल्लीत असून ते गढी या स्टुडिओत कार्यरत आहेत.

- मेधा सत्पाळकर, माधव इमारते 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].