Skip to main content
x

ठाकूर, भालचंद्र शिवराम

बाळ ठाकूर

हा दशकांहून अधिक काळ सातत्याने मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे करून ग्रंथनिर्मितीच्या दृश्य अंगाबद्दल कलात्मक जाण निर्माण करणारे भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचा जन्म लांजा जिल्ह्यातील भांबेड येथे झाला. सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून १९४८ मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली. जे. वॉल्टर थॉम्प्सन’, ‘अय्यर्स’, ‘उल्काअशा जाहिरातसंस्थांमधून त्यांनी काही काळ नोकरी केली.

ते १९५० नंतर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनाचे काम करू लागले. आजही ते अखंडपणे अशी कामे करीत आहेत. ठाकूर यांचे रेषेवर प्रभुत्व असल्यामुळे ते स्केचेस आणि रेखाटने अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात. जलरंगासारखे प्रवाही रंग वापरून ते कथाचित्रे आणि इलस्टे्रशन्स करतात तेव्हा अभिजात कलेचा त्याला स्पर्श झालेला असतो. त्यांना साहित्याबद्दलची उत्तम जाण आहे आणि पुस्तकाचा आशय त्याच्या प्रकृतीनुसार कधी रेखाटनाच्या माध्यमातून, कधी एखाद्या प्रतीकातून, तर कधी सुलेखनशैलीचा योग्य वापर करून ते दृश्यरूपात मांडतात.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्यातील चित्रे म्हणजे निव्वळ सजावट नव्हे, तर शब्दरूप आशयाचे ते चित्रकाराला भावलेले पूरक, पण स्वतंत्र चित्ररूप भाष्य आहे याची जाणीव दलालांपासूनच व्हायला लागली होती. सुभाष अवचटांनी ती अधिक स्पष्ट केली. ठाकूर यांनी मराठी अभिरुचीत घडत गेलेले बदल पाहिले आहेत, आणि आपल्या कामांमधून ते कळत- नकळतपणे घडवलेही आहेत. या सगळ्या बदलांमध्ये ठाकूर यांची मुखपृष्ठकला आपल्या मूळच्या अभिजात वळणाने जात राहिली आणि आजही इतर मुखपृष्ठांमध्ये ती उठून दिसते ती तिच्या अंगभूत आत्मनिष्ठेमुळे. ठाकूर यांनी सत्यकथा’, ‘मौज’, ‘ललितदिवाळी अंक अशा नियतकालिकांसाठी अनेक वर्षे इलस्ट्रेशन्स केलेली आहेत. कथाचित्रे, साहित्यिकांची आणि अन्य व्यक्तींची व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, कधी स्केचेस, तर कधी रेखाटनांच्या रूपाने रेषेच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारे हि चित्रे केलेली आहेत. जरूर पडेल तेथे ते कधीकधी जाड रेषेचा वापर करतात. अन्यथा त्यांची रेषा बारीक आणि मुक्त असते.

सुरुवातीच्या काळात पुस्तके अक्षरमुद्रण पद्धतीने मुद्रित होत होती. त्यामुळे मुखपृष्ठांचा आणि आतील चित्रांचा भर मुख्यतः लाइन ओरिजिनल्सवर असे. या पद्धतीला ठाकूर यांची रेखाटने अनुकूल होती. लक्ष्मीबाई टिळकांपासून ते बालकवी, मर्ढेकर, बा.भ. बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे लेखांच्या निमित्ताने त्यांनी केलेली आहेत. या असंख्य चित्रांपैकी काही निवडक चित्रांना व्यक्तिचित्रेम्हणून स्वतंत्र कलामूल्य आहे; कारण ती नुसती छायाचित्रांवरून रेषेच्या माध्यमात रूपांतरित केलेली चित्रे नाहीत, तर त्या साहित्यिकाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वही त्यात उतरले आहे.

ठाकूर यांनी केलेली काही रेखाटने अभिजात चित्रकलेत जाऊ शकतील अशा ड्रॉइंग्जच्या पातळीवर पोहोचतात. उदाहरणार्थ, महेश एलकुंचवारांच्या आत्मकथाआणि प्रतिबिंबया नाटकांच्या पुस्तकांसाठी केलेली दोन रेखाटने. आत्मकथाच्या सुरुवातीला लेखकाचा चेहरा आहे आणि चेहर्‍याच्या एका बाजूला वर, प्रेक्षकाकडे बोट दाखवणारा हात आहे, तर प्रतिबिंबच्या सुरुवातीला आरशाचा वाटावा असा अंडाकृती आकार आहे आणि मध्ये कोरी जागा असलेला चेहर्‍याचा आकार. भोवताली वार्‍यावर उधळणार्‍या काळ्या रेषांचे बाहेर पडू पाहणारे आकार आहेत.

एलकुंचवार यांनी वास्तव आणि वास्तवाचे अर्थ, आरसा आणि स्वतःची ओळख यांतून जे जीवनदर्शन संहितेतून घडवले आहे, त्याचा ठाकुरांनी स्वतःच्या प्रतिभेने या रेखाटनांमधून वेगळा अर्थ लावला आहे म्हणून ती निव्वळ कथाचित्रे राहत नाहीत, त्यांना स्वतंत्र अस्तित्व लाभते.

ठाकूर यांनी मुखपृष्ठे अनेकविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांची आणि भिन्नप्रकृती लेखकांसाठी चित्रित केली. आशयानुसार त्यांची शैलीही बदलती ठेवली. तरीही ठाकुरांची एक विशिष्ट छाप या मुखपृष्ठांवर असतेच.

ठाकूर यांनी केलेल्या मुखपृष्ठांची वर्गवारी करायची तर ती तीन प्रकारांत करता येईल. कथनात्मक किंवा कथाचित्रप्रधान हा एक प्रकार, संकल्पनात्मक अथवा प्रतीकात्मक हा दुसरा प्रकार आणि सूचक अथवा अमूर्त आकारांची रचना हा तिसरा प्रकार. तिसर्‍या प्रकारातली मुखपृष्ठे संख्येने कमी असली तरी कृ.द. दीक्षितांच्या सहवासपासून ते २००८ मधील राणी दुर्वे यांच्या शब्देविण संवादुया पुस्तकापर्यंत ठाकूर यांनी अमूर्त आकारांचा आणि शैलीचा वापर केलेला आहे.

ह.मो. मराठे यांच्या बालकांडसाठी ठाकूर यांनी मराठ्यांचेच लहानपणचे व्यक्तिचित्र कल्पनेने रंगवले आहे. कथाचित्रप्रधानअसे त्याचे वर्णन करता येईल. ह.मो. मराठ्यांच्या आत्मकहाणीचा पुढचा भाग पोहराया नावाने प्रकाशित झाला आहे. त्यावर काळ्या पार्श्वभूमीवर फांद्यांच्या जाळ्यांमध्ये उठून दिसणारा पांढरा पक्षी दाखवला आहे. हे किंवा आतील चित्रे म्हटले तर निसर्गचित्रे आहेत; पण ठाकूर यांनी यात हनूला स्वगवसण्याचा प्रतीकात्मक अर्थ नेमका पकडला आहे. म्हणजेच हे मुखपृष्ठ संकल्पनात्मक आहे.

आधी उल्लेखित आत्मकथाआणि प्रतिबिंबया पुस्तकांवर अगदी मोजक्या, जाड रेषांनी माणसाचा चेहरा काढलेला आहे. डावी, उजवी बाजू एकमेकांचे प्रतिबिंब असावी अशी समतोल साधणारी रचना पुस्तकाचा आशय नेमकेपणाने सांगते. हादेखील प्रतीकात्मक वापराचा एक चांगला नमुना आहे. गणूरायाआणि चानीया चिं.त्र्यं. खानोलकरांच्या कादंबर्‍यांची मुखपृष्ठे ठाकूर यांनी परिणामकारक केलेली आहेत. त्यांतल्या विद्ध पक्ष्याचा प्रतीकात्मक उपयोग, रेषांचा प्रवाही, अर्थपूर्ण वापर वाचकाचे लक्ष वेधून घेतो.

मुखपृष्ठे करताना काही काळ रंगीत कव्हर पेपरवर स्क्रीन प्रिन्टिंगचा वापर करून ठाकूर यांनी वेगळा दृश्य अनुभव देणारी मुखपृष्ठेही केली. अक्षरमुद्रण जाऊन अक्षरप्रतिरूपमुद्रण आले, संगणकाचा वापर होऊ लागला व त्यानुसार मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे अधिक आकर्षक, चकचकीत आणि रंगीबेरंगी होऊ लागली. पुस्तकाच्या आशयाचा फारसा विचार न करता तयार प्रतिमा वापरून झटपट मुखपृष्ठे होऊ लागली. बाळ ठाकूर यांनी मात्र निष्ठापूर्वक आपली अभिजात शैली सातत्याने जपली आणि पुस्तकांना आपल्यापरीने न्याय दिला. या वृत्तीतच त्यांच्या चित्रनिर्मितीचे मर्म दडलेले आहे.

- दीपक घारे

ठाकूर, भालचंद्र शिवराम