Skip to main content
x

जोशी, रघुनाथ कृष्ण

रामचंद्र जोशी हे भारतातील आद्य पुरातत्त्वीय भूवैज्ञानिक होते. त्यांचा जन्म कर्जत येथे झाला. फर्गसन महाविद्यालयातून १९४२ मध्ये प्रथम श्रेणीत बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून भूविज्ञान या विषयात १९४५ या वर्षी एम.एस्सी. पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण होताच ते व्याख्याता म्हणून धारवाडला नोकरी करू लागले.

लंडनच्या सुप्रसिद्ध इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी येथील पर्यावरण व पुरातत्त्व या क्षेत्रातले अग्रणी प्रा. एफ.. झॉयनर हे भारतात आले होते. प्रा. जोशींना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जोशींनी प्रा. .धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली १९५४मध्ये डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय Pleistocene Studies in the Malaprabha Basin’ असा होता. डॉक्टरेट मिळताच त्याच वर्षी कर्नाटक विद्यापीठात नव्याने स्थापन झालेल्या भूविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली.

भूविज्ञान विभागप्रमुख या पदावर तीन वर्षे उत्तम काम करून त्यांनी विभागाचा विकास केला व नंतर ते १९५७ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) या संस्थेच्या प्रागैतिहास विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले. या संस्थेत त्यांनी पंधरा वर्षे काम केले व अनेक प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांचा शोध लावला. मध्य प्रदेशात आदमगढ नावाच्या अतिशय महत्त्वाच्या प्रागैतिहासिक शैलाश्रयाचे (Rock Shelter चे) त्यांनी उत्खनन केले व या उत्खननाचा अहवाल पुस्तक स्वरूपात १९७८ मध्ये प्रसिद्ध केला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात अधिकारी असताना जोशींनी नेपाळमध्ये काठमांडूच्या परिसरात केलेले संशोधन हा तेथील पुरातत्त्वीय संशोधनात अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

एक भूवैज्ञानिक या नात्याने प्रा. जोशींनी अश्मयुगीन संस्कृतीच्या गाळाच्या निक्षेपांमध्ये मिळणार्या अवशेषांच्या अभ्यासाची पद्धत तयार केली. त्यांचे गोदावरीच्या खोर्यातील भू-पुरातत्त्वीय संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील कोकण किनार्यावर सखोल सर्वेक्षण करून तेथे मिळणारी सूक्ष्म अवजारे वापरणारी संस्कृती ( Microlithic Culture) व इतिहासपूर्व काळात समुद्राच्या पातळीत वेळोवेळी झालेले बदल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी रायगडच्या पायथ्याशी असणार्या पाचाड येथे एका शैलाश्रयाचे उत्खनन केले. दख्खनच्या पठारावर, विशेषत: महाराष्ट्रात मध्याश्मयुगात हवामान अधिक आर्द्र होते व त्यामुळे मध्याश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळे कमी प्रमाणात मिळतात, अशी सिद्धान्त कल्पना त्यांनी मांडली होती.

पुरातत्त्वीय संशोधनामध्ये पर्यावरणासंबंधी निष्कर्ष काढण्यासाठी व प्राचीन वसाहतींमध्ये विविध कामे कशी व नेमकी कोणत्या भागांमध्ये चालत असत, हे समजण्यासाठी रासायनिक पद्धतीचा अधिक वापर व्हायला हवा, असे प्रा. जोशींचे मत होते. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. ते १९७२ मध्ये डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रागैतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथूनच ते १९८१ मध्ये सहसंचालक या पदावर असताना निवृत्त झाले.

डॉ. प्रमोद जोगळेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].