Skip to main content
x

रहिमान, अब्दुल अजीज

आबालाल रहिमान

कोल्हापूरच्या आधुनिक चित्रकलेच्या  कलापरंपरेतील आद्य चित्रकाराचा मान असणारे श्रेष्ठ चित्रकार म्हणजे आबालाल रहिमान. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत राजचित्रकार म्हणून त्यांची नेमणूक झाली. राजघराण्यातील व्यक्तिचित्रे, दरबार दृश्ये, पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांवरील चित्रे अशा व्यावसायिक चित्रांसोबतच त्यांनी स्वान्त:सुखाय हजारो चित्रे रंगविल्याची नोंद असून या  त्यांच्या चित्रांमधून काळाच्या पुढे जाऊन आकार, रंग, रेषा, व पोत यांद्वारे प्रयोग करीत त्यांनी सातत्याने दृश्यजगताचा शोध घेतला.

त्यांचा जन्म कोल्हापूरमध्येच, गुजरी भागातील कासार गल्लीतल्या लहानशा घरात झाला. त्यांचे मूळचे नाव अब्दुल अजीज रहिमान होते; पण घरी आबा म्हणत असल्याने आबालाल हे नाव रूढ झाले. वडील अब्दुल रहिमान बाबाजी कोल्हापूर संस्थानाच्या दरबारात कारकून होते. ते शेतीही करीत. कुटुंब खाऊनपिऊन सुस्थितीत होते. वडील कुराणाच्या हस्तलिखित प्रती तयार करीत. त्यांतील प्रत्येक पानाभोवतीचे नक्षीकाम आबालालही वडिलांबरोबर करीत. त्यांच्या घराजवळ जिनगर कारागिरांची गुजरी नावाने ओळखली जाणारी वसाहत होती. त्यांची सोन्याचांदीवरील कलाकुसर पाहण्यात येत असे. कौशल्य आणि कारागिरीचे संस्कार आबालालांवर सहज, नकळत होत गेले. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये त्या वेळच्या सहावी (सध्याच्या दहावी) पर्यंत झाले होते. त्यांना मराठी, संस्कृत, अरबी व इंग्रजी भाषा येत होत्या. एकदा ब्रिटिश रेसिडेन्ट साहेबांच्या पत्नीने आबालालांची चित्रे पाहिली. त्या पती-पत्नीने त्यांचे गुण हेरून आबालालांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये रीतसर कला-शिक्षण घ्यावे म्हणून त्यांच्या आई-वडिलांना प्रोत्साहित केले.

त्यानुसार ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये  दाखल झाले. १८८० ते १८८८ या काळात तेथे त्यांनी शिक्षण घेतले. तेथे शिक्षण घेणारे ते कोल्हापूरचे पहिले विद्यार्थी होते. तेथे शिकण्याची आर्थिक तरतूद रिजन्सी काउन्सिल व शाहू महाराजांकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीमधून झाली होती. ते दाखल झाले त्या वेळी तेथे जॉन ग्रिफिथ्स हे प्रिन्सिपल होते. ब्रिटिशांच्या अकॅडमिक म्हटल्या जाणार्‍या कलाशैलीचे शिक्षण तिथे दिले जाई. अत्यंत हुशार विद्यार्थी असा त्यांचा जे.जे.मध्ये नावलौकिक झाला. त्यांच्या चित्रांच्या एका संचासाठी १८८८ मध्ये त्यांना व्हाइसरॉय सुवर्णपदक मिळाले होते. विद्यार्थी असतानाची त्यांची काही व्यक्तिचित्रे आजही जे.जे.च्या संग्रहात आहेत. या चित्रांतून त्यांचे ड्रॉइंगवरील प्रभुत्व लक्षात येते. त्यांच्या रेषेला नेमकेपणा व तरलता आहे. रंगछटांवर विलक्षण ताबा आहे. व्यक्तिचित्रण करताना त्यांची रेषा बाह्यरूपाबरोबर अंतरंगाचा वेध घेऊ शकते हेच या कलाकाराचे मोठे सामर्थ्य आहे. ‘पागोटेधारी तरुण’, ‘टपोर्‍या डोळ्यांची स्त्री’ ही चित्रे त्याची उदाहरणे म्हणून सांगता येतील.

व्यक्तिचित्रणासाठी गुळगुळीत पावडर शेडिंग केले जाण्याच्या काळात, लाइन ड्रॉइंगला महत्त्व देऊन काम करताना, त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला होता. त्यामुळे प्रिन्सिपल व हेडमास्टरांनी (विभागप्रमुख) आपली खासगी कामे करण्यासाठी त्यांची साहाय्यक म्हणून निवड केली. त्या मोबदल्यात आबालालना पौष्टिक खाणे व प्रसंगी कापड व पैसेही मिळत. एकदा काही युरोपीय चित्रकार आले असता विद्यार्थ्यांची चित्रे दाखविताना आबालाल यांची चित्रे बघून ते आश्‍चर्यचकित झाले व ‘स्टाफची चित्रे विद्यार्थ्यांची चित्रे म्हणून दाखवता का?’ असे म्हणू लागले. हे बघून प्रिन्सिपलांनी त्यांच्या देखत चित्र काढण्यास सांगितले. आबालाल यांनी काढलेले चित्र बघून ते खूष झाले व याला युरोपला पाठवा असे म्हणू लागले. पण ‘करवीर दरबारची परवानगी घेतल्याशिवाय मी कसा जाणार?’ असे आबालाल म्हणाले व ती कल्पना बारगळली.

आबालाल शिकत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. शिक्षणानंतर ते कोल्हापूरला परतले, त्या वेळी वडिलांनी दुसरे लग्न केले होते. हे मोठे स्थित्यंतर  स्वीकारून ते घरात राहू लागले. मुंबईहून परतल्यावर त्यांची वृत्ती एकांगी व स्वतंत्र पद्धतीची झाली होती. राहणीही पाश्‍चिमात्य पद्धतीची होती. आई-वडिलांची इच्छा त्यांनी लग्न करावे अशी होती व आबालाल यांना आवडलेली मुलगी मात्र त्यांच्या सावत्र आईला पसंत नव्हती. त्यामुळे घरात मतभेद होऊ लागले व जुळवून घेणे त्यांना कठीण जाऊ लागले. घर व कोल्हापूर सोडून जवळच्या कोटितीर्थाच्या रानावनात, तलावाकाठी, ते एकांताचे जीवन व्यतीत करू लागले. या काळात देशी-परदेशी कागद, रंग-साहित्य उपलब्ध होई, ते वापरून ते चित्र काढीत. प्रसंगी खडू किंवा कोळसा वापरूनही त्यांनी निर्मिती केली.

अशी कालक्रमणा सुरू असताना १८९७ च्या दरम्यान एक दिवस अचानक शाहू महाराजांचे दूत त्यांना शोधत आले व त्यांनी राजदरबारी ताबडतोब हजर होण्याचा महाराजांचा आदेश दिला. आपले रंगवीत असलेले चित्र घेऊनच आबालाल महाराजांपाशी गेले. शाहू महाराज कलेचे दर्दी होते. त्या वेळी महाराजांचे चित्र काढण्यासाठी एक परदेशी चित्रकार आला होता. आबालालांची चित्रे पाहून तो परदेशी चित्रकारही थक्क झाला. त्याने आबालालांची प्रशंसा केली. ते ऐकून महाराज आनंदित झाले व त्यांनी विचारपूर्वक आबालालांची नेमणूक ‘सन्मान्य दरबारी चित्रकार’ म्हणून केली. त्याचबरोबर आबालाल यांना टेक्निकल स्कूलमध्ये ड्रॉइंग मास्तर म्हणून नेमले. पगार दरमहा पंचवीस रुपये होता. हेडमास्तरचा पगार पंधरा रुपये होता, पण आबालाल मुंबईत शिकून आल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांचा विशेष सन्मान केला.

आबालाल यांनी उत्साहाने एक अभ्यासक्रम तयार केला व ते मुलांना शिकवू लागले. सर्व मुले सरदारांची होती व त्यांना हा अभ्यासक्रम व शिस्त डाचू लागली. ही तक्रार शाहू महाराजांकडे गेली व त्यांनी त्यातून मार्ग काढला. मास्तरकी बंद झाली; पण पगाराचे २५ रुपये आयुष्यभर आबालालांना पोहोचविण्याची महाराजांनी आज्ञा केली. तेव्हापासून ‘आबालाल मास्तर’ ही उपाधी त्यांना कायमची मिळाली.

आबालालांनी हजारो चित्रे काढल्याचे मानले जाते. दरबारी चित्रांखेरीज, ‘मन:पूत’ निर्मिती करणारीही अनेक चित्रे त्यांनी काढली. असे असले तरी आज त्यांची मोजकीच चित्रे उपलब्ध आहेत. राजचित्रकार म्हणून त्यांनी राजघराण्यातील व्यक्तींची, इंग्रज रेसिडेन्टची, शिकारीची, पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांची चित्रे काढली. त्यांनी महाराजांकडे असलेले सुंदर अरबी उंट, घोडे चितारले. त्याचप्रमाणे गाय, कोंबडा यांची चित्रे काढली. भोवतालचा निसर्ग, गोरगरीब ग्रमस्थ त्यांच्या चित्रांचे विषय झाले होते.

आबालाला यांच्या चित्रांवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सह्या केल्या. त्यांच्या बर्‍याच चित्रांवर तारीख नाही. त्यामुळे उत्क्रांतीच्या कालक्रमाबद्दल निश्‍चित विधाने करण्यास मर्यादा पडतात. परंतु अभ्यासाच्या सोयीसाठी स्थूलमानाने वर्गीकरण याप्रमाणे करता येईल. व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, पौराणिक, ऐतिहासिक चित्रे, दैनंदिन जीवनाशी संबंधित चित्रे, प्राणी-पक्षी व शिकारीची दृश्ये, राजवाड्यातील रंगीत काचा, हस्तिदंती, चांदीच्या वस्तू, शालू इत्यादींसाठी डिझाइन  वगैरे या सर्वांसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग त्यांनी समर्थपणे केला. जलरंग व तैलरंग माध्यमाच्या विविध शक्यता त्यांनी अजमाविल्या. कधी पातळ, प्रवाही लेपन, तर कधी एकमेकांवर पातळ थर दिले. काही चित्रांत उत्स्फूर्त फटकारे, काहींत संयत रंगलेपन, तर कधी रंगांचे विभाजन, रंग घासणे, खरडणे अशी विविध तंत्रे, पद्धती त्यांनी वापरल्या व प्रयोग करीत त्यांवर आपले प्रभुत्व निर्माण केले.

आबालाल यांच्या निसर्गचित्रणात साधारणत: तीन-चार प्रकार आढळतात. वर्णनात्मक, प्रगल्भ व उत्कट आविष्काराची, इम्प्रेशनिस्ट चित्रांची आठवण करून देणारी व निसर्गाशी तादात्म्यता दर्शविणारी चित्रे, अशा क्रमाने वाटचाल होत, निर्मितीचे उच्चतम आविष्कार त्यांच्याकडून झाले. गरिबीमुळे सामान्यत: त्यांनी लहान आकाराची चित्रे काढली. निसर्गाच्या विस्तृततेचा, भव्यतेचा आवाका लहान चित्रांतही त्यांनी सहजपणे आणला. कोल्हापूरचा पन्हाळा, रावणेश्‍वर, संध्यामठ अशा परिसराची वेगवेगळ्या वेळी, विविध कोनांतून, त्यांनी अनेक चित्रे काढली. प्रारंभीची, दृश्यांचा तपशील देणारी शैली बदलत, केवळ तपशिलांशी न थांबता ती अधिक काही व्यक्त करीत प्रगल्भ होत गेली.

रावणेश्‍वराच्या काही चित्रांत बेभान फटकारे आहेत, तर ‘संध्यामठ’च्या चित्रात सचेतन, पण शांत, संयत गूढता आहे. या चित्रात त्यांची असामान्य प्रतिभा व जोडीला सखोल तांत्रिक जाण यांचे एक एकात्म, उत्कट दिव्यदर्शन घडते. फ्रेंच चित्रकार मोने किंवा पिसारो यांनी ज्या प्रकारे रंगाचे विभाजन करून बिंदुवादाच्या  साहाय्याने प्रकाश व वस्तूवर होणारा त्याचा दृश्य परिणाम शोधला, त्याप्रमाणे आबालाल यांनी या चित्रात आकाश व पाणी छोट्या छोट्या बिंदूंच्या साहाय्याने सचेतन व थरारते करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रातील तजेलदारपणा व रंगांचे वजन आजही टिकून आहे ही त्यांच्या तंत्रकौशल्याची साक्षच म्हणावी लागेल.

आबालाल यांच्या ‘रावणेश्‍वर’ या चित्राबद्दल प्रा. बाबूराव सडवेलकर लिहितात, ‘रावणेश्‍वर हे एक श्रेष्ठ दर्जाचे चित्र असून त्यात मोठ्या चित्रकारांनी वेध घेतलेल्या अनेक कलामूल्यांचा समन्वय आढळतो. सिसले या चित्रकाराचा कल्पनावाद (रोमँटिसिझम), तर दुसर्‍या क्षणी टर्नरची अवकाशाची अनुभूती (व्हिजन ऑफ स्पेस) जाणवते. हे घडत असतानाच कोरोने चित्रित केलेल्या मंद वार्‍याच्या हालचालीचा अनुभव येतो व काही क्षणांतच कॉन्स्टेबलला न साधलेल्या घनात्म ऐक्याची (स्ट्रक्चरल युनिटीची) एक वेगळीच प्रचिती येते. इतक्या गुणांचा एक संमिश्र अनुभव मनाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो.’ विशेषत: निसर्गचित्रात त्यांनी समकालीन चित्रकारांच्या तुलनेत तंत्राबाबत प्रायोगिकतेची कास धरून मोठीच झेप घेतल्याचे आढळते.

अभिजात निर्मिती अथवा कलेच्या उच्चतम दर्जाप्रत येण्यामागे त्यांचा निश्‍चितच अव्याहत शोध, ध्यास, चिंतन, सातत्याने केलेला सराव असावा व त्याचबरोबर निसर्गाशी तादात्म्य पावण्याची अंत:शक्ती असावी. या प्रकारची त्यांची चित्रे फ्रान्समध्ये १८६० च्या दरम्यान झालेल्या इम्प्रेशनिस्ट चित्रांची आठवण देतात. या काळात संपर्क, दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नव्हती हे लक्षात घेतले की वाटते,  इम्प्रेशनिस्टला समांतर अशी अभिव्यक्ती त्यांनी स्वयंस्फूर्तीने केली असावी.

दरबारी कलाकार असूनही त्यांची वृत्ती फकिराची होती. १९२१ ते १९२४ दरम्यानची, त्यांच्या दैनंदिनीतील काहीच पृष्ठे उपलब्ध आहेत. यात त्यांनी दैनंदिन खर्चाच्या नोंदीसोबतच कुणाकडून, केव्हा, किती पैसे आले व कुणाकडून किती उधार घेतले हेदेखील लिहून ठेवले होते. यातच त्यांनी भूर्जी खाँ व अलादिया खाँसाहेब यांच्याकडून दोनशे बासष्ट रुपये उधार घेतल्याची प्रॉमिसरी नोट लिहून दिल्याचाही उल्लेख आहे. याशिवाय डायरीत धर्मविषयक विचार नोंदवले असून मुसलमान धर्मातील वाईट रूढी व रीतिरिवाजांचा त्यांनी कडाडून निषेध केला आहे. या सोबतच बर्‍याच वेळा त्यांनी मराठीत चित्रकलेवरील आपली मते, तंत्रविषयक गोष्टीही नोंदविल्या आहेत.

ते मुंबईहून रंग मागवत, त्याचीही नोंद असून त्याकरिता पुरेसे पैसे नसल्याची खंतही आढळते. त्यांना गरजेपुरते पैसे उभे करता येत नसत; कारण ते पेंटिंगची कामे करत तेव्हा अगदी कमी रकमेची बिले पाठवीत; पण तीदेखील त्यांना वेळच्यावेळी मिळत नसत. कित्येकदा त्यांना कामाचे अर्धवट पैसेच मिळत, तर काही वेळा उधार पैसे देणारे त्यांची चित्रे फुकटात किंवा कमी किमतीत घेऊन जात. पण त्यांच्या या डायरीमधून त्यांचे जबाबदार, सहिष्णू, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व दिसते. त्यांनी कुराणाच्या हस्तलिखित प्रती जशा सजविल्या, तसे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दाखविणारी चित्रेही काढली. ती चित्रे आजही सांगली व कोल्हापूरच्या संग्रहालयात आहेत.

वडील बंधूंना आबालाल यांनी फोटोग्रफी शिकवली होती. त्यांना स्वत:लाही ती येत होती. पण व्यवसायासाठी त्यांनी कधीही फोटोग्रफी केली नाही. वडील भाऊ आजारी पडून मरणोन्मुख झाला तेव्हा आबालालांना म्हणाला, ‘‘आबालाल, माझ्या बायको-मुलांची काळजी वाटते. तू भरपूर पैसे मिळवतोस. मुसलमान जातीप्रमाणे दोन-चार बायका करशील आणि माझ्या बायको-मुलांना विसरशील.’’ यावर आबालाल यांनी त्याला सांगितले, ‘‘तुझी बायको ती माझी बहीण व तिची मुले ही माझी भाचा व भाची. मी लग्न करणार नाही.’’ हे वचन त्यांनी पाळले. ते जन्मभर अविवाहित होते. एका लहान खोलीत त्यांचा निवास असे. चित्र काढण्याची जागाही तीच होती. वृद्धापकाळाने, मधुमेहाने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांना पुतण्याची साथ होती. आपल्या भावाच्या पश्‍चात त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आबालालांनी घेतली होती. आबालाल हे विक्षिप्त, लहरी, फकिरी वृत्तीचे व व्यसनीही होते. तसेच, त्यांच्या गरिबीबद्दलही त्यांच्या हयातीतच अनेक आख्यायिका होत्या. पण त्यात सत्याचाही अंश होता.

एकदा त्यांनी मुंबईत पांढरा रंग वापरून (चायनीज व्हाइट) जलरंगात केलेली सुंदर व प्रभावी चित्रे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात पाहिली. येताना ते पांढर्‍या रंगाच्या बर्‍याच ट्युब्ज घेऊन आले व त्या प्रकारची अनेक चित्रे त्यांनी झपाटल्यासारखी रंगविली. ती बघून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आबालाल याकडे एक प्रयोग म्हणून बघत होते. त्यानंतर त्यांनी ती चित्रे जाळून टाकली व म्हणाले, ‘‘माझे ट्रान्स्परंट रंगाचे तंत्र हेच योग्य आहे. कालांतराने कागद पिवळा पडतो व पांढरा रंग डोके वर काढतो.’’ हा त्यांनी शुद्ध ज्ञानासाठी केलेला प्रयोगच होता. ते २ × ३ इंच आकाराची चित्रे रंगवत व २२ × २८ इंचांचीही रंगवत. हळूच विद्यार्थ्यांना म्हणत, ‘‘चित्राचा आकार बदलला की तंत्रही बदलते.  २ × ३ इंचाच्या चित्रातील तंत्र २२ × २८ इंचांसाठी उपयोगी नाही.’’ चित्रामागे ते आवर्जून शिक्का मारीत व उर्दूमध्ये नोंदही करीत. पण फारच थोड्या चित्रांवर त्यांनी तारीख घातल्याचे आढळते.

अखेरच्या काळात प्रकृती ढासळत होती तरी त्यांचे चित्र काढणे नित्यनेमाने सुरूच होते. मृत्यूपूर्वी आदल्याच दिवशी त्यांनी स्वत:चे जलरंगातील व्यक्तिचित्र आरशात बघून केले. त्या वेळी आरशात पाहताना आपली प्रकृती फारच बिघडल्याचे त्यांना जाणवले होते व तसे त्यांनी बोलूनही दाखवले.

आबालाल यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे २८ डिसेंबर १९३१ या त्यांच्या मृत्युदिनी कोल्हापुरातील काही कलावंत, चहाते त्यांच्या स्मशानभूमीवर जात आणि त्यांना आदरांजली वाहत असत. पण ते थडगे व स्मशानभूमीही आता राहिली नाही. आता राहिली आहेत ती मोजकीच चित्रे, त्यांच्या आठवणी सांगणारे लेख आणि रंकाळा तलावाच्या तीरावर कोल्हापूरकरांनी या श्रेष्ठ चित्रकाराची स्मृती जपण्यासाठी उभारलेले शिल्प.

साधना बहुळकर

रहिमान, अब्दुल अजीज